-->
संपादकीय पान--अग्रलेख--१ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--
--------------------------------
शेअर बाजारातील दिवाळी कुणासाठी?
----------------------
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स नोव्हेंबर २०१० नंतर पहिल्यांदाच २१ हजारांच्या उच्चांकावर गेल्याने गुंतवणूकदारांची खर्‍या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. अर्थात या दिवाळीतल्या फटाक्यांची दारु अमेरिकन आहे. कारण अमेरिकेतील गुंतवणूकदार व विदेशी वित्तसंस्थांनी सुमारे चार अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने त्यांनी ही दिवाळी खेचून आणली आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असतानाही शेअर बाजाराचा निर्देशांक मात्र दररोज तेजीची नवी पातळी गाठत आहे. गेल्या दीड वर्षात देशातील शेअर बाजारात जबरदस्त मंदीचे वातावरण होते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्याकडील शेअर बाजारात अमेरिकन गुंतवणूकदारांनी जी गुंतवणूक केली होती ती त्यांनी काढून घेण्यास सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी घसरण झाली होती त्यामागे अमेरिकन गुंतवणूकदारांनी पैसा आपल्या मायदेशी नेल्याचे एक महत्वाचे कारण होते. अशा प्रकारे अमेरिकन गुंतवणूकदार विकसनशील देशातील शेअर बाजारात अमाप पैसा गुंतवितात आणि तेथील बाजारात तेजी खेचून आणतात. मात्र नंतर काही काळाने त्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात करुन मंदीचे वातावरण तयार करतात. अशा प्रकारचा शेअर बाजारातील हा तेजी-मंदीचा खेळ अमेरिकन वित्तसंस्था करुन त्यातून अब्जावधी रुपयांची माया जमवून हा पैसा पुन्हा मायदेशी नेतात. असे त्यांनी जवळजवळ सर्वच विकसनशील देशात केले आहे. गेल्या दोन दशकात आपण आर्थिक उदारीकरण सुरु केल्यावर आपल्याकडे शेअर बाजारात हा खेळ नित्याचा झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाचा विकास दर पाच टक्क्यांच्या खाली गेला असतानाही शेअर बाजारात मात्र दिवाळी साजरी होते कशी? असे कुणी म्हणेलही. परंतु सध्याची बाजारातील या दिवाळीतून काही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे काही लक्षण प्रतिबिंबित होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ही अमेरिकन वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करुन खेचून आणलेली तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचे तापमान मोजणारा निर्देशांक, ज्याला सेन्सेक्स म्हणतात त्यातील असलेल्या ३० समभागांपैकी केवळ ११ कंपन्यांचे समभाग चांगलेच वधारले आहेत. पाच कंपन्यांच्या समभागांची तर ५० टक्क्यांनी घसरणच झाली आहे तर १४ कंपन्यांच्या समभागात किरकोळ घसरण नोंदली आहे. त्यामुळे सेन्सेक्समध्ये असलेल्या सर्व कंपन्यांचे समभागही वधारलेले नाहीत. त्यावरुन ही तेजी परिपूर्ण देखील नाही. गेल्या तीन वर्षात आर्थिक अडचणीत असलेल्या अमेरिकन भांडवलशाहीने मंदीची एक मोठी लाट पाहिली. अनेक कंपन्यांना दिवाळी काढावी लागली. गृहकर्जाचा मोठा घोटाळा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने पाहिला. त्यात शंभर वर्षांच्या जुन्या वित्तसंस्थांनाही आपले दिवाळे काढण्याची परिस्थिती आली. शेवटी बँकांमधील भांडवल खरेदी करुन अमेरिकन सरकारला आपली अर्थव्यवस्था सावरावी लागली. म्हणजे वेगळ्या भाषेत बोलायचे तर अमेरिकेतील बँकांची मालकी अमेरिकन सरकारने खरेदी केली. गेल्या सहा महिन्यात मात्र तेथील परिस्थितीत काहीशी सुधारणा झाल्याने अमेरिकेतील गुंतवणूकदार आता पुन्हा विदेशात म्हणजे भारतासारख्या देशात गुंतवणूक करण्यास पुन्हा उत्सुक आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने भारत हा चीन व ब्राझीलपेक्षा गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित ठरावा असा आहे. त्याच्या जोडीला गेल्या सहा महिन्यात रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाल्याने त्यांची गुंतवणूक फारच स्वस्त झाली आहे. अशा प्रकारे रुपयाचे अवमूल्यन झाल्याने डॉलरमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना आपला नफा भविष्यात जास्त कमविता येणार आहे. त्याच फायदा उठविण्यासाठी विदेशी वित्तसंस्थांनी गेल्या महिन्याभरात भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. तेजी-मंदीच्या या खेळात लहान व मध्यम गुंतवणूकदाराच्या हाती फारसे काही लागले असेल असे दिसत नाही. कारण सेन्सेक्स १३ हजारांच्या निचांकावर गेला होता त्यावेळी तो आणखी खाली जाईल असा अंदाज वर्तवून अनेक जण पुढील काळात गुंतवणूक करण्याचा विचार करीत होते. मात्र डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच सेन्सेक्सने २१ हजारांची पातळी गाठली आहे. त्यामुळे आता या चढत्या दराने गुंतवणूक करणे लहान गुंतवणूकदारांसाठी धोकायदायक ठरु शकते. लहान गुंतवणूकदारांसाठी असलेल्या म्युच्युअल फंडांची गेल्या दोन वर्षातील कामगिरीही निराशाजनकच आहे. एकीकडे शेअर बाजारात तेजी असली तरीही म्युच्युअल फंडांच्या दोन तृतियांश योजनांची कामगिरी काही समाधानकारक नाही. अनेक फंडांनी ज्या समभागांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपन्यांचे समभाग न वधारल्याने तेजीचा फंडांना काहीच उपयोग झाला नाही. काही फंडांनी लहान व मध्यम आकारातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली आहे. या कंपन्या सध्याच्या तेजीत काही झळाळल्या नाहीत. त्यामुळे फंडांची कामगिरी काही चांगली झाली नाही. त्यामुळे या तेजीचा फायदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍या लहान गुंतवणूकदारांना झाला नाही. म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी ७४ टक्के रक्कम ही देशातील चार मोठ्या शहरातून येते तर अन्य रक्कम ही अन्य शहरे व ग्रामीण भागातून येते. गेल्या सहा महिन्यात विविध फंडांकडील गुंतवणूक सरासरी दहा टक्याने कमी झाली होती. गेले तीन वर्षे बाजारात मंदी असल्याने लहान गुंतवणूकदार केवळ शेअर बाजारातूनच नव्हे तर म्युच्ुअल फंडांच्या गुंतवणुकीतून काढता पाय घेत आहे. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना बाजारात सेन्सेक्स २१ हजारांवर गेलेला दिसतोय मात्र त्यांच्या खिशात काहीच नफा नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे शेअर बाजारातील सध्याची तेजी ही अमेरिकन गुंतवणूकदार व देशातील मोठ्या गुंतवणूकदार, शेअर दलालांपुरतीच मर्यादीत आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel