-->
संपादकीय पान--चिंतन--१नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--
----------------------------
विदेशात शिकलेल्या डॉक्टरांबाबत स्वागतार्ह निर्णय; मात्र...
------------------------------
विदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात येऊन प्रॅक्टीस करण्यासाठी जी परिक्षा डॉक्टरांना द्यावी लागते त्यात आता शिथीलता आणली आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने अशा डॉक्टरना आजवर भारतात जी एलिजिबिटी परिक्षा द्यावी लागत होती त्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण केल्याने आता मोठ्या संख्येने देशात डॉक्टर उपलब्ध होतील, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. मात्र विदेशात शिकलेल्या या भारतीय विद्यार्थ्यांना सध्या असलेली स्किनिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. आपल्याकडे दरवर्षी सुमारे एक लाख भारतीय विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतात. त्यापैकी सुमारे दहा हजार विद्यार्थी हे महाराष्ट्रातून असतात. चीन, मध्य अमेरिका व रशिया या देशात ते प्रामुख्याने शिक्षण घेण्यासाठी जातात.अशा प्रकारे असे विद्यार्थी आकर्षित करुन या देशांनी मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळविले आहे.
विदेशात अशा प्रकारे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जर भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करावयाची असल्यास त्यांना परिक्षा द्यावी लागत होती. ही परिक्षा १५० मार्क्सची असून त्यासाठी चार तासांचा पेपर असतो. वर्षातून दोनदा ही परिक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी अशा प्रकारे विदेशात शिकलेल्या १४,४७६ डॉक्टरांपैकी केवळ ३१५० डॉक्टरचे पास झाले होते. याचा अर्थ विदेशातील विद्यापीठांचा दर्जा चांगला नाही वा त्यांना चांगले वैद्यकीय शिक्षण मिळालेले नाही असे अजिबात नाही. तर आपल्याकडे ही परिक्षा पास करण्यासाठी लाच द्यावी लागते असे अनेकदा आढळले आहे. त्यामुळे हे डॉक्टर आन्तरराष्ट्रीय दर्ज्याचे वैद्यकीय शिक्षण घेऊनही भारतीय परिक्षा नापास होतात. या पिरक्षेत पास करण्यासाठी मोठे रॅकेट कार्यान्वित असल्याचे उघड झाले आहे. भारतातील सरकारी वैद्यकीय शिक्षण वगळता अन्य खासगी संस्थांतील वैद्यकीय शिक्षण आता फार महाग झाले आहे. म्हणजे पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी लाखोत नाही तर करोडो खर्च करावे लागतात. त्यामुळे ज्यांना खरोखरीच डॉक्टरकीची आवड आहे मात्र पैसा नाही त्यांना या शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यापेक्षा रशिया वा चीनमधील देशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतल्यास सुमारे ६० टक्के पैसे वाचतात. त्यामुळे भारतातील वैद्यकीय शिक्षण घेण्यापेक्षा विदेशात जाऊन डॉक्टर होण्याकडे गेल्या पाच वर्षात विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतलेल्या देशात वैद्यकीय प्रॅक्टीस करता येते. मात्र भारतात मात्र त्यांना परिक्षा द्यावी लागत होती आणि सर्वात वाईट बाब म्हणजे ही परिक्षा पास करण्यात मोठा भ्रष्टाचार होत होता. त्यामुळे ही परिक्षाच बंद करावी अशी मागणी होत होती. आता मात्र आपल्याला विदेशात शिक्षण घेतलेले दरवर्षी सुमारे एक लाख डॉक्टर सहजपणे उपलब्ध होतील. आपल्याला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज आहे. ही उणीव या डॉक्टरांमुळे भरुन निघण्यास मदत होऊ शकते. रशिया व चीन या दोन देशात आन्तरराष्ट्रीय दर्ज्याचे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध केले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे शिक्षण त्यांना इंग्रजीत मिळते. याचा लाभ उठविण्यासाठी जगातून विद्यार्थी या देशात येतात. असे असताना आपण मात्र तेथून शिकून आलेल्या डॉक्टरांना परिक्षा द्यायला लावून एक प्रकारे तेथील शिक्षणावर अविश्‍वास दाखवित होतो. ज्याप्रकारे डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात एक वर्ष सेवा करणे आवश्यक आहे अन्यथा दहा लाख रुपयांचा दंड भरावा लागतो त्याधर्तीवर विदेशातून आलेल्या डॉक्टरांना किमान पहिली पाच वर्षे ग्रामीण भागात सक्तीची प्रॅक्टीस करण्याची तरतूद करणे शहाणपणाचे ठरले असते. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या संख्येने डॉक्टर उपलब्ध झाले असते.
-------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel