-->
पूर्णो संगमा : हरणार नक्की, तरीही रिंगणात

पूर्णो संगमा : हरणार नक्की, तरीही रिंगणात





प्रसाद केरकर

आगामी राष्ट्रपती निवडणुकीत आपण पडलो तरी बेहत्तर; परंतु ही निवडणूक लढवायचीच, असा ठाम निर्धार माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी केला होता. त्यामुळे आता भाजप आणि (जनता दल (संयुक्त) वगळता) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असला तरीही संगमा यांचा या निवडणुकीत पराभव निश्चित दिसत आहे, तरीही ते आपल्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
  
आगामी राष्ट्रपती निवडणुकीत आपण पडलो तरी बेहत्तर; परंतु ही निवडणूक लढवायचीच, असा ठाम निर्धार माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी केला होता. त्यामुळे आता भाजप आणि (जनता दल (संयुक्त) वगळता) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असला तरीही संगमा यांचा या निवडणुकीत पराभव निश्चित दिसत आहे, तरीही ते आपल्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. 
रा ष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी संगमा यांना राष्ट्रवादी पक्षाचा त्यागही करावा लागला. कदाचित केंद्रात मंत्री असलेल्या त्यांच्या कन्येलाही आपले पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. 

संगमा हे काही वर्षांपूर्वी मेघालयाच्या राजकारणात नाइलाज म्हणून परतले होते. मात्र, त्यांचे लक्ष नेहमीच दिल्ली दरबारी असे. आता त्यांना पुन्हा दिल्लीत परतायची मोठी आस लागली होती. राष्ट्रपतींची निवडणूक ही एक मोठी संधी असल्याचे त्यांना जाणवले. निवडणुकीत हरलो तरी आपण त्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा झळकू, असा अंदाज बांधून संगमा यांनी यात उडी घेतली आहे. 
ईशान्येतील मेघालय या राज्यातील चप्पाहत्ती या आदिवासी गावात पूर्णो यांचा जन्म 1 सप्टेंबर 1947 रोजी झाला. त्यांचे गाव म्हणजे डोंगराळ आणि आदिवासी तसेच घरची गरिबी असल्याने त्यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. स्वत:ची प्रगती करण्यासाठी चांगले शिक्षण घेणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांच्यावर त्यांच्या अशिक्षित आईने ठसवले. यातून त्यांनी मोठय़ा जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. सेंट अँथनी महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यावर उच्च शिक्षणासाठी ते आसामच्या दिब्रुगड विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांनी 'कायदा व आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयात पदव्युतर शिक्षण घेतले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी प्राध्यापक, वकील आणि पत्रकार म्हणून काही काळ आपले करिअर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचे मन काही या क्षेत्रात रमेना. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1974 मध्ये त्यांची नियुक्ती मेघालय प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी झाली. त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्याचा त्यांना मोठा फायदा झाला. केवळ मेघालयच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेसचे एक तरुण, तडफदार नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. यातून 1975 मध्ये त्यांची मेघालय प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. 
1980 पर्यंत ते या पदावर होते. 1977 मध्ये संगमा यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले आणि ते राष्ट्रीय राजकारणात आले. इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा सपाटून पराभव झाला असताना संगमा सर्वात प्रथम लोकसभेवर निवडून गेले. त्या वेळी त्यांचे वय जेमतेम 30 वर्षे होते. देशात आलेले पहिले विरोधी पक्षांचे सरकार कोसळले आणि 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीतही संगमा पुन्हा निवडून आले. त्यांच्या या विजयाची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली आणि त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे संयुक्त सचिव करण्यात आले. 1980 मध्ये त्यांचा सर्वात प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. उद्योग मंत्रालयातील राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आले. दोन वर्षांनंतर त्यांना व्यापार मंत्रालयातील राज्यमंत्री करण्यात आले. 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले. त्या वेळी पंतप्रधानपदी आलेल्या राजीव गांधींनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. दोन वर्षांत त्यांच्याकडे व्यापार, गृह या खात्यांचे राज्यमंत्रिपद होते. त्यानंतर त्यांच्याकडे 1986 मध्ये कामगार मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला. एक अभ्यासू मंत्री म्हणून त्यांनी अल्पावधीत नाव कमावले. केंद्रीय राजकारणात ते असले तरीही त्यांनी संपूर्ण ईशान्य भारतातील राज्यांशी नियमित संपर्क ठेवला होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांनी आपली पावले या भागात चांगलीच रोवली. 1993 मध्ये त्यांना प्रथम कॅबिनेट दर्जा मिळाला आणि त्यांच्याकडे कामगार खाते आले. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि त्यांची नियुक्ती लोकसभा अध्यक्षपदी झाली. 
लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्टच होती. शरद पवारांनी काँग्रेस सोडली त्याबरोबर त्यांनीही काँग्रेसला रामराम केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.आठ वर्षांत ते मेघालयाच्या राजकारणात सक्रिय होते. मात्र, असे असले तरी त्यांचे डोळे सतत दिल्लीला लागले होते. राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी होती. भाजपने त्यांना आता पाठिंबा दिला असला, तरी संगमा निवडून येण्याची शक्यता अल्पच आहे. मात्र, यानिमित्ताने संगमा यांनी आपले केंद्रीय राजकारणातील अस्तित्व दाखवून दिले आहे. 

0 Response to "पूर्णो संगमा : हरणार नक्की, तरीही रिंगणात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel