-->
डिंपल यादव : गृहिणी ते  खासदार मॅडम

डिंपल यादव : गृहिणी ते खासदार मॅडम

Published on 16 Jun-2012 PRATIMA

प्रसाद केरकर
उ त्तर प्रदेशातील कनौज लोकसभा मतदारसंघातून तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या अलीकडेच बिनविरोध निवडून आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघातून अलीकडच्या काळात बिनविरोध निवडून जाणार्‍या या एकमेव महिला खासदार ठरल्या आहेत. 2009 च्या निवडणुकीत अखिलेश यादव हे कनौज व फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी फैजाबाद मतदारसंघातून राजीनामा देऊन आपल्याकडे कनौज मतदारसंघ राखला होता. मात्र, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांनी कनौजमधून राजीनामा दिला आणि आपली पत्नी डिंपल हिला उभे करण्याचे ठरवले. 2009 मध्ये डिंपल (वय वर्षे 35) यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनी केला होता. या वेळी मात्र त्यांनी थेट बिनविरोध निवडून येत लोकसभेत प्रवेश केला आहे. डिंपल यांची उमेदवारी जाहीर होताच सर्वात पहिल्यांदा काँग्रसेने आपण उमेदवार उभा करणार नाही, असे जाहीर केले होते. अर्थात काँग्रेसला आता समाजवादी पक्षाची जवळीक साधायची असल्याने त्यांनी डिंपल यांच्यासाठी मैदान मोकळे सोडले; परंतु भाजप किंवा बहुजन समाजवादी पक्ष तरी निवडणूक लढवतील, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाजही खोटा ठरला. शेवटी डिंपल यांच्या विरोधात दाखल झालेले सर्वच उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि त्यांची निवड बिनविरोध झाली.
कनौज लोकसभा मतदारसंघातून 1967 मध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे नेते राम मनोहर लोहिया निवडून गेले होते. त्यानंतर 1984 मध्ये काँग्रेसच्या शीला दीक्षित, तर अखिलेश यादव याच मतदारसंघातून 1999, 2004 व 2009 असे तीन वेळा निवडून आले होते. अशा या हायप्रोफाइल मतदारसंघातून आता निवडून आलेल्या डिंपल यादव या अखिलेश यांच्या पत्नी व मुलायमसिंग यांच्या सून हे त्यांचे मोठे भांडवल आहे. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली असली, तरीही त्यांना यश पदरात पडले नव्हते. अर्थात त्या सक्रियपणे राजकारणात नसल्या, तरीही राजकारणात आपले पाऊल ठेवण्याची त्यांनी सतत धडपड केली आहे.
डिंपलचे वडील लष्करात असल्याने भटिंडा, पुणे, लखनऊ, अंदमान निकोबार अशा अनेक ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. वडिलांच्या बदल्या जशा होत, तसे त्यांना नवीन शहरात राहण्याची संधी मिळत गेली आणि या बदलत्या वातावरणात डिंपल रमत गेल्या, असे त्यांच्या मैत्रिणी सांगतात. लखनऊ विद्यापीठात शिकत असताना डिंपल यांची सर्वात प्रथम 1990 मध्ये अखिलेश यांची भेट झाली. अखिलेश त्या वेळी ऑस्ट्रेलियातून मरिन इंजिनिअरिंग करून परतले होते. तेथे त्यांची मैत्री जमली आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. 24 नोव्हेंबर 1999 रोजी त्यांचे लग्न झाले. लखनऊ येथे झालेल्या या लग्नात अमिताभ बच्चन, राजेश खन्नांपासून अनेक सेलिब्रिटी तसेच सर्वपक्षीय राजकारणी उपस्थित होते. लग्नानंतर पुढील दहा वर्षे डिंपल राजकारणात न उतरता एक गृहिणी म्हणून राहिल्या. त्यांना गेल्या दहा वर्षांत मुलगी व त्यानंतर एक मुलगा व मुलगी असे जुळे झाले. डिंपल यांचे विविध विषयांवर भरपूर वाचन आहे. तसेच त्या उत्कृष्ट पेंटरही आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्या अखिलेश यांच्याबरोबर सक्रिय होत्या. अनेक सभांमध्ये अखिलेश यांच्यासमवेत डिंपल दिसत होत्या. आता मात्र डिंपल यांच्यासारख्या तरुण खासदार आपल्याकडून लोकसभेत गेल्याने कनौजवासीयांच्या अपेक्षा मात्र वाढल्या आहेत. 
prasadkerkar73@gmail.com 

1 Response to "डिंपल यादव : गृहिणी ते खासदार मॅडम"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel