-->
‘लातूर पॅटर्न’ला झटका

‘लातूर पॅटर्न’ला झटका

 (15/06/12) EDIT
दरवर्षी जून महिना उजाडला की दहावी-बारावीचे निकाल कधी लागणार याची टांगती तलवार विद्यार्थी व पालकांवर असते. यंदा मात्र राज्यातील दहावी व बारावीच्या नऊ विभागीय शिक्षण मंडळांचे निकाल वेळेत जाहीर केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करावयास हवे. त्याचबरोबर सरकारने कॉपीला आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या त्यालाही ब-यापैकी यश आले आहे. तसेच यंदाच्या परीक्षा पेपरफुटीपासून मुक्त राहिल्या. एकूणच निकालाची टक्केवारीही वाढली. दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असतो, तर बारावीची परीक्षा विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यातील करिअरचा पाया रचून देणारी ठरते.

त्यामुळे या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या असतात. आपल्याला करिअर घडवायचे असेल तर चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते. यात गैर काहीच नाही. मात्र, या स्पर्धेने आता जीवघेणे टोक गाठले आहे. यातून विद्यार्थी हा अभ्यासातून काही नवे शिकण्यापेक्षा मार्क्स मिळवण्याचे ‘निर्जीव यंत्र’ झाला आहे, ही सर्वात वाईट बाब आहे. यावर उपाय म्हणून यंदा सरकारने दहावीच्या परीक्षेत काही प्रयोग करण्याचे ‘धाडस’ दाखविले होते. आपल्याकडील दहावीची परीक्षा ही भरघोस गुण मिळवून देणारी ‘मशिन्स’ झाली होती. या मशिन्सना खासगी क्लासेसच्या माध्यमातून ‘वंगण’ पुरविले जाते. अर्थात विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क्स मिळविण्याचा प्रयत्न करणे यात आक्षेपार्ह काहीच नाही; परंतु ठरावीक पॅटर्नने साचेबद्ध अभ्यास केला की विद्यार्थ्यांचे गुण हे 100 टक्क्यांपर्यंत पोहोचत होते. 

या विद्यार्थ्यांना तशा चौकटीत परीक्षेच्या पलीकडे कोणताही प्रश्न आला तर ते उत्तर देऊ शकत नाहीत, अशी स्थिती होती. परिणामी चांगले मार्क्स मिळूनही हे विद्यार्थी ज्ञानाचे धनी होत नव्हते. विद्यार्थ्यांचा अभ्यास हा तथाकथित ‘ऑब्जेक्टिव्ह’ ज्ञानाच्या चौकटीत बंद झाला. मात्र, या वेळी या परीक्षा पद्धतीला थोडा छेद देऊन गणित-भूमिती आणि विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला. यंदा या दोन्ही विषयांत ‘हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स’वर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अर्थातच हे सर्व प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. याचा परिणाम असा झाला की, 90 टक्क्यांच्या वर मार्क्स मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षांच्या तुलनेत अर्ध्याहून खाली घसरली. मात्र, या अभ्यासक्रमाचा फटका 70 टक्क्यांच्या खाली मार्क्स मिळविणा-या विद्यार्थ्यांना विशेष बसलेला नाही. त्यामुळे केवळ घोकंपट्टी करून परीक्षेचा साचेबद्ध अभ्यास करून भरघोस मार्क्स मिळविणा-या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा मंडळाने त्यांची ‘जागा’ दाखविली आहे. 

मंडळाने यंदा केलेल्या या प्रयोगाची मीमांसा पुढील काळात बरीच होईल. त्यावर टीकाही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तज्ज्ञांकडून यावर आणखी विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे; परंतु परीक्षा ही केवळ मार्क्स मिळविण्यासाठी नसते, त्याद्वारे विद्यार्थ्यांची दर्जात्मक गुणवत्ता वाढली पाहिजे, हा विचार यंदाच्या परीक्षेच्या निमित्ताने अल्प प्रमाणात का होईना रुजविण्यात मंडळाला यश आले आहे. या वर्षी भरघोस मार्क्स मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या आटल्यामुळे अकरावीच्या प्रवेशाचा ‘कट ऑफ’ घसरणार आहे. अर्थात सी.बी.एस.ई. व आय.सी.एस.ई. बोर्डाच्या विद्यार्थ्यांची ‘नव्वदीची वारी’ सुरूच असल्याने एस.एस.सी. बोर्डातील मुलांना प्रवेशासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील निकालांवर एक दृष्टिक्षेप टाकल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते की, नऊही मंडळांत मुलींनी मोठ्या प्रमाणात बाजी मारली आहे. अर्थात गेल्या पाच वर्षांत दहावी-बारावीपासून ते सी.ई.टी. असो वा कोणतीही स्पर्धा परीक्षा त्यात मुलींनी आपला ठसा   उमटविण्यास सुरुवात केली आहे.

मुलींना मोफत शिक्षण देण्यास प्रारंभ झाल्यापासून गेल्या काही वर्षांत मुलींची शैक्षणिक गळती कमी झाली आहेच, शिवाय त्यांनी चांगले मार्क्स मिळविण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने शालेय मुलींना सायकल देण्यास सुरुवात केल्यावर तेथील मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले होते याची आठवण याप्रसंगी होते. असो. आपल्याकडेही राज्यातील ही ‘कोकण कन्या’ अशीच सुसाट वेगाने भविष्यातही धावणार हे नक्की. त्याचबरोबर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चांगले मार्क्स मिळविणा-यांचीही या वेळी मोठी संख्या आहे. अपंगत्वावर मात करीत, घरातील दारिद्र्याची तमा न बाळगता चांगले मार्क्स मिळविणा-या या यशवंत मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.


कोकण विभागाने यंदा बारावी तसेच दहावीतही घवघवीत यश संपादन करून ‘कोकण पॅटर्न’चा आदर्श राज्यापुढे घालून दिला आहे. एकीकडे ‘कोकण पॅटर्न’ फुलत असताना तिकडे एकीकडे गाजलेल्या ‘लातूर पॅटर्न’ला झटका बसला आहे. पुणे, मुंबईसारख्या महानगरात हायटेक शाळा व खासगी क्लासेसचे अमाप पीक असणा-या ठिकाणांना ग्रामीण भागाचे वर्चस्व असणा-या कोकणाने मागे टाकावे, यामागे तेथील मुलांची जिद्द कारणीभूत आहे. अजूनही आपल्याकडे ग्रामीण भागात मुलांना क्लास सोडा, शाळेतही धड शिक्षण मिळणे कठीण असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील मुलांचे यश ठसठशीतपणे उठून दिसते आणि भविष्यातील हाच एक आशेचा किरण ठरावा.

0 Response to "‘लातूर पॅटर्न’ला झटका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel