
Published on 16 Mar-2012 MADHURIMA | ||
देशाचे पंतप्रधानपद इंदिरा गांधींसारख्या महिलेने प्रदीर्घ काळ भूषवले असले तरी महिलांसाठी काही क्षेत्रे मात्र वज्र्य होती. बँकिंग, शेअर बाजार या क्षेत्रांत वा सीईओ किंवा एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अभावानेच महिला आढळत. आर्थिक धोक्याचे व्यवस्थापन करणे किंवा एखादी कंपनी चालवणे ही सोपी बाब नाही, असे सांगून पुरुषांनी आपले वर्चस्व या क्षेत्रात कायम राखून आपला पुरुषी अहंकार जोपासला होता; परंतु आर्थिक उदारीकरणाच्या काळात अनेक महिलांनी आर्थिक, कॉर्पोरेट क्षेत्र काबीज करून आम्हीदेखील आर्थिक धोक्याची व निधी व्यवस्थापनाची कामे यशस्वीरीत्या करू शकतो हे दाखवून दिले आहे. चंदा कोचर हे त्याचे एक उत्तम प्रतीक ठरावे. वित्तीय क्षेत्रात आज अनेक महिलांनी आपली यशाची मोहोर उमटवली आहे. जे. पी. मॉर्गनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना मोरपारिया, क्रेडिट स्विस सिक्युरिटीज इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका वेदिका भांडारकर, बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचच्या अध्यक्ष व कंट्री हेड काकू नखाते, मॉर्गन स्टॅन्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका आशिया सिक्वेरा अशा अनेक महिलांनी वित्तीय क्षेत्राला नेतृत्व दिले आहे. त्याच बरोबर वित्तीय क्षेत्रातील दुसर्या व तिसर्या फळीतील व्यवस्थापनातही महिलांचा मोठा वाटा असतो. क्रेडिट स्विसच्या भारतातील कर्मचार्यांमध्ये 24 टक्के महिला आहेत. जे. पी. मॉर्गन या कंपनीत तर ही संख्या 32 टक्के एवढी आहे. एवढेच कशाला, जेपी मॉर्गन या वित्तीय कंपनीत जगभरात असलेल्या 2.6 लाख कर्मचार्यांमध्ये 50 टक्के प्रमाण महिलांचे आहे. आर्थिक क्षेत्र हे महिलांनी आता काबीज करण्यास सुरुवात केली आहे आणि याद्वारे गेल्या दशकात देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावला आहे, असे नखाते मोठय़ा अभिमानाने सांगतात. वित्तीय क्षेत्रात काम करणार्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना कुठेही आपण महिला आहोत म्हणून आपल्यात काही कमतरता आहे असे जाणवत नाही. पुरुषांच्या बरोबरीने त्या सर्मथपणे काम करत आहेत. या क्षेत्रात काम करणार्या महिलांनी केवळ करिअर करण्यासाठी कौटुंबिक जीवनाचा त्याग केलेला नाही. अनेक जणी आपले घर सांभाळून आपले करिअर घडवत आहेत. सध्याचा काळात राजकारणात महिलांना राखीव जागा तरी आहेत, मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना कुठेही राखीव जागा नाहीत. असे असतानाही महिलांनी या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे. व्यवस्थापन वा कोणत्याही क्षेत्रातले उच्च शिक्षण असो, महिलांनी धिम्या गतीने का होईना आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. अनेक आघाडीच्या बी स्कूल्स, आयआयटी यात मुलींची संख्या वाढत चालली आहे. आयआयटीसारख्या संस्थेत जाणार्या मुलींची संख्या गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढून एकूण लोकसंख्येच्या 11 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर बी स्कूलमध्ये हे प्रमाण 10 ते 20 टक्क्यांदरम्यान आहे. दहा वर्षांपूर्वी हे प्रमाण अगदीच नगण्य होते. आता मात्र मुलींचे बी स्कूल व आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत जाईल. त्यामुळे पुढच्या दशकात कॉर्पोरेट क्षेत्रात महिला उच्च पदावर असण्याची संख्या वाढणार हे नक्की. आपण दोन दशकांपूर्वी आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली आणि आपल्याकडील कॉर्पोरेट्सचा चेहरामोहराही पार बदलण्यास सुरुवात झाली. देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या आदित्य विक्रम बिर्ला समूहात पूर्वी कंपन्यांच्या नेतृत्वपदी पुरुषांचाच भरणा असे आणि त्यातही प्रामुख्याने मारवाडी समाजातील लोकांचा भरणा जास्त असे. सध्या सुमारे 35 अब्ज डॉलर्सची उलाढाल करणार्या बिर्ला समूहाच्या नेतृत्वपदी तरुण असलेल्या कुमार मंगलम बिर्ला आल्यावर मात्र त्यांनी आपल्या समूहातील कंपन्यांच्या नेतृत्वपदी ‘व्यावसायिकांना’ नियुक्त करण्यास सुरुवात केली. आज बिर्ला समूहात अनेक महत्त्वाच्या पदावर महिला आहेत. समूहात गणल्या जाणार्या 300 एक्झिक्युटिव्हजमध्ये 50 महिला आहेत. यात मनुष्यबळ विकास विभागाच्या समूहाच्या प्रमुख प्रीती गुप्ता, कॉर्पोरेट मॅनेजमेंट सर्व्हिस विभागाच्या अध्यक्ष पिंकी मेहता, बिर्ला कार्बन कंपनीच्या मुख्य खरेदी प्रमुख मधुरिमा गुप्ता, नोव्हेलिसच्या चीफ पीपल्स ऑफिसर लिसा जॉइस, हायपर मार्केटच्या मार्केटिंग प्रमुख शिवानी शौरी यांचा समावेश आहे. बिर्ला समूहात नेतृत्वाच्या जागांमध्ये महिलांचे प्रमाण 17 टक्के आहे. बिर्ला समूहाने जसे आपला ‘मारवाडी चेहरा’ कमी करण्याचा धाडसी निर्णय घेतला, तसेच त्यांनी महिलांनाही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. महिलांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले. कॉर्पोरेट उद्योगात अशा प्रकारे अनेक मोक्याच्या जागी महिलांनी आपली छाप पाडली असताना काही उद्योग समूहांना महिलांचे नेतृत्व अलीकडेच लाभले. यात प्रामुख्याने हॉटेल लीला समूह, बिस्लेरीचे उत्पादन करणार्या चौहान कुटुंबाचा व इंडोको रेमिडीजच्या अदिती कारे पाळंदीकर यांचा समावेश आहे. कॅप्टन कृष्णन नायर यांनी स्थापन केलेल्या हॉटेल लीला समूहाच्या तिसर्या पिढीच्या हाती आता सूत्रे आली आहेत. कॅप्टन नायर यांच्या दोघी नाती ऐश्वर्या नायर (वय 27 वर्षे) व संयुक्ता नायर (वय 26 वर्षे) यांनी अलीकडेच आपल्या समूहाची धुरा स्वीकारली आहे. लीला समूहाची शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपनीला तब्बल 99 कोटी रुपयांचा तोटा असताना तसेच या समूहावर 4300 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर असताना त्यांना या दोघी तरुणींचे नेतृत्व लाभले आहे. हॉटेल उद्योगातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असताना तसेच विदेशातील अनेक हॉटेल्स भारतात येत असताना अनेक आव्हाने भारतीय हॉटेल्सपुढे आहेत. अशा परिस्थितीत नायर कुटुंबातील या दोघी तरुणींपुढे अनेक आव्हाने आहेत. याचा त्या कसा मुकाबला करतात, याकडे कॉर्पोरेट जगताचे लक्ष आहे. इंडोको रेमिडीज लि. या कारे उद्योग समूहातील औषध कंपनीच्या तिसर्या पिढीच्या हाती आता सूत्रे आली आहेत. उद्योजक सुरेश कारे यांच्या कन्या अदिती कारे पाळंदीकर या उच्चशिक्षित असून सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असणार्या या कंपनीला आता या कार्यक्षम महिलेचे नेतृत्व लाभणार आहे. गेली काही वर्षे अदिती या कंपनीत सक्रिय होत्या. आता मात्र कंपनीला अदिती यांचे नेतृत्व लाभेल. कॉर्पोरेट क्षेत्र काबीज करायला महिलांनी (मग त्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी असोत वा उद्योजिका) सुरुवात केली आहे. महिलांचे हे कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्चस्व वाढतच जाणार, यात काहीच शंका नाही. मात्र, त्यासाठी त्यांना स्वत:ला विशिष्ट पद्धतीने घडवावे लागणार आहे आणि कंपन्यांनाही महिलांना सोईची धोरणे अवलंबावी लागणार आहेत, हे निश्चित. prasadkerkar73@gmail.com |
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा