-->

योशिहिको नोडा सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा जपानी पंतप्रधान 

For Pratima Published on 10 Sep-2011
जपानचे नवनियुक्त पंतप्रधान योशिहिको नोडा हे गेल्या पाच वर्षातले सहावे पंतप्रधान आहेत. 54 वर्षीय डेमॉक्रॅटिक पक्षाच्या या नेत्यापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. अलीकडेच जपानमध्ये आलेल्या सुनामी व भूकंपामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाल्यासारखा झाला आहे. त्यातच जपानची अर्थव्यवस्थाही खिळखिळी झाली आहे. त्यांचे पाय जमिनीवर असल्याने ते लोकप्रिय आहेत. 
छिबा या गावात एका शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेल्या नोडा यांचे वडील लष्करात नोकरीला होते. लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. राजकीय विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापनातील पदवी संपादन केली. मात्र वासेडा विद्यापीठात शिकत असताना त्यांना पत्रकारितेची आवड निर्माण झाली होती. अर्थात त्यांनी आपले करिअर शेवटी राजकारणातच केले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे वर्गमित्र असलेले योशुटोमो सुझुकी हे पुढे जपानमधील एका शहराचे महापौर झाले. त्या वेळी नोडा यांनी सुझुकींना राजकारणात यशस्वी होण्यासाठीचा मंत्र विचारला. त्यावर ते म्हणाले, उत्कृष्ट राजकारणी होण्यासाठी चांगले भाषण करायला हवे. यानंतर नोडा यांनी हातात मायक्रोफोन घेतला आणि दररोज रेल्वेस्थानकासमोर उभे राहून ते भाषण करू लागले. यातून त्यांनी लोकांना आपल्या निवडणूक निधीसाठी पैसा देण्याचेही आवाहन केले आणि यातून त्यांच्याकडे निधीही उभा राहिला. 
1986 मध्ये त्यांनी रेल्वेस्थानकात उभे राहून दररोज भाषण करण्याचा आपला दिनक्रम अगदी मंत्री झाल्यावरही सोडला नाही. गेल्या वर्षीपर्यंत अगदी अर्थमंत्री असतानाही ते रेल्वेस्थानकात उभे राहून लोकांना भाषण देत किंवा सर्वसामान्यांशी संवाद साधत. नोडा 93 मध्ये सर्वात प्रथम जपानी संसदेत निवडून गेले. ते प्रथम निवडून आले त्या वेळी त्यांचे वय अवघे 29 वर्षे होते. घरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी राजकारणात घेतलेली उडी मोठी लक्षणीयच होती. त्या वेळी ते जपानमधील एक तरुण राजकीय नेते म्हणून पुढे आले. त्यानंतर 1996 साल वगळता ते नेहमीच निवडून आले. 96 मध्ये त्यांचा पराभव 105 मतांनी झाला होता. सर्वात प्रथम ते राजकारणात आले ते जपान न्यू पार्टीच्या बॅनरखाली. त्यानंतर हा पक्ष सोडून न्यू फ्रँटियर पार्टीत दाखल झाले. त्यानंतर काही काळाने ते डोमॉक्रॅटिक पार्टीत सामील झाले. 
2002 मध्ये त्यांनी या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. 2009 मध्ये त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर सुरुवातीला त्यांच्याकडे वरिष्ठ उपअर्थमंत्रीपदाची आणि नंतर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. 2006 मध्ये त्यांना खोटे ई-मेल प्रकरण भोवले आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खरे तर त्या वेळी नोडा यांनी राजीनामा द्यावयास नको होता असे अनेकांचे मत झाले होते. अर्थमंत्री असताना त्यांनी कर वाढवण्याचा कडू डोस दिला होता. जपानची अर्थव्यवस्था घसरत असताना सावरण्याचा नोडा यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता मात्र पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर ते देशातील आव्हाने कशी पेलतात याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel