-->
डिजिटल क्रांतीवर स्वार ‘आकाश’

डिजिटल क्रांतीवर स्वार ‘आकाश’

डिजिटल क्रांतीवर स्वार ‘आकाश’ 
Published on 14 Oct-2011 Article on Edit page
जगातला सर्वात स्वस्त संगणक म्हणून अलीकडेच भारतीय तंत्रज्ञांनी जन्माला घातलेल्या ‘आकाश’बाबत बर्‍याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ‘आकाश’ची किंमत 2250 रुपये (सुमारे 45 डॉलर) असून भविष्यात मागणी वाढत जाईल तशी याची किंमत आणखी दहा डॉलरने कमी होईल. नजीकच्या काळात याची किंमत किमान 10 डॉलरपर्यंत (म्हणजे सुमारे 500 रुपये) खाली येण्याचा अंदाज आज व्यक्त होत आहे.
अर्थात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किमती ज्या गतीने उतरतात ते पाहता ‘आकाश’ 10 डॉलरला उपलब्ध झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये. दहा डॉलर ही किंमत एवढय़ासाठीच की या किमतीला कुणालाही हा संगणक खरेदी करता येईल. गेल्या दहा वर्षांत मोबाइलचे असेच झाले. मोबाइल हँडसेट व कॉल्सच्या दरात अशा गतीने घसरण झाली आहे की आता मोबाइल सर्वसामान्यांच्याही खिशात दिसू लागला आणि सर्वांच्या खिशाला तो परवडूही लागला. संगणकाचेही असेच होण्याची शक्यता आहे. किंबहुना असेच व्हायला पाहिजे तरच 25 वर्षांपूर्वी राजीव गांधींनी जी संगणक क्रांती सुरू केली होती त्या क्रांतीची पाळेमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जगातला हा सर्वात स्वस्त संगणक सर्वसामान्यांपर्यंत-प्रामुख्याने तरुणांपर्यंत पोहोचावा यासाठी 50 टक्के सबसिडी देऊ केल्याने हा संगणक आता केवळ 1,125 रुपयांत मिळेल. सुरुवातीला एक लाख तरुणांना हा संगणक या किमतीला देण्यात येईल. त्यानंतर पुढील टप्प्यात दहा लाख तरुणांना याच किमतीत हा संगणक उपलब्ध केला जाणार आहे. डाटाविंड ही कंपनी याचे व्यापारी उत्पादन करीत आहे. ‘आकाश’ने अनेकांच्या आशा-अपेक्षा वाढवल्या आहेत. कारण एवढय़ा स्वस्तात हे उत्पादन उपलब्ध होईल का, यात अनेकांना शंका वाटत होती. तसेच याचा दर्जा काय असेल आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांत हा संगणक सरस ठरेल का, अशा अनेक शंका सध्या व्यक्त केल्या जात आहेत.
तांत्रिकदृष्ट्या विचार करता 366 मेगाहर्ट्झ प्रोसेसरवर चालणार्‍या या संगणकाची मेमरी 256 एम.बी.एवढी आहे. यात सुरुवातीला मिळणारी मेमरी ही दोन जी.बी. असून ती 32 जी.बी.पर्यंत वाढवण्याची यात व्यवस्था आहे. अँड्रॉइड 2.2 या प्रणालीवर हा चालणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या स्वस्त संगणकांच्या तुलनेत ‘आकाश’ आज तरी सरस वाटतो. कारण किमतीचा विचार करता ‘आकाश’च्या खालोखाल दुसरा जगातला स्वस्त संगणक सुमारे दहा हजार रुपयांचा आहे. या दोन्ही उत्पादनांमध्ये विशेष फरक नाही. प्रायोगिक तत्त्वावर ज्या विद्यार्थ्यांना ‘आकाश’ची चाचणी करावयास दिली होती त्यांना याच्या प्रोसेसर स्पीडचा विचार करता मंद वाटला आणि हा संगणक लवकर तापत असल्याचे आढळले. मात्र याचा टच स्क्रीन चांगला असल्याचे मत मुलांनी नोंदवले आहे. आयआयटी राजस्थानने हा संगणक विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावली असल्याने याबाबतच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडे पाठवून त्यानंतर ‘आकाश’मध्ये सुधारणा करण्यात येतील. अर्थात हा संगणक शहरी तरुणांनी वापरलेला असल्याने तसेच यातील ज्या तरुणांनी आयपॅड वापरले असेल त्यांना ‘आकाश’चे कौतुक वाटणार नाही. एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ‘आकाश’ हे उत्पादन प्रामुख्याने ज्यांना सध्याचे संगणक परवडणार नाहीत त्यांच्यासाठी आहे. ते काही उत्कृष्ट प्रतीचे ‘हाय एंड’प्रॉडक्ट नाही. त्यामुळे याचा ग्राहक वेगळा आहे. तो अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्याप्रमाणे चौकसपणे खरेदी करतो त्यातला नाही. त्यामुळे प्राथमिक पातळीवर असलेल्या ग्राहकासाठी ‘आकाश’ हे एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे उत्पादन ठरावे.
डिजिटल क्रांतीपासून आज जो ग्राहक दूर आहे त्याच्यासाठी ‘आकाश’ हा स्वर्ग ठरावा. त्यामुळे ‘आकाश’ची बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या अन्य उत्पादनांशी स्पर्धा करणेही व्यर्थ ठरते. कारण ‘आकाश’ ला तशी आजच्या स्थितीला कुणाशीही स्पर्धा नाही. आपल्या देशातील मोठी शहरे वगळता अन्य लहान, मोठय़ा शहरात व ग्रामीण भागात विजेची बोंब असताना ‘आकाश’पुढे अनेक आव्हाने आहेत, हा या संदर्भातील टीकेचा रोख आपल्याला मान्य करावयास हवा. कारण ‘आकाश’मध्ये केवळ तीन तास चालेल एवढय़ाच क्षमतेची बॅटरी आहे. आपल्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विजेची टंचाई असताना ‘आकाश’ यशस्वी होईल का, अशी शंका अनेकांना भेडसावत आहे. आपल्याकडे असलेल्या ग्रामीण भागातल्या हजारो शाळांमध्ये वीज नसते अशा वेळी ‘आकाश’ शाळेतल्या मुलांच्या खरोखरीच उपयोगी ठरेल का, असा सवाल आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे अनेकदा नवीन तंत्रज्ञान पोहोचवले जाते, मात्र त्याचा उपयोग होत नाही. ‘आकाश’चे असेच होईल.
आज ग्रामीण भागात शाळांमध्ये संगणक धूळ खात पडून आहेत, अशी अनेकांची टीका आहे. हा संगणक 500 रुपयांना जरी उपलब्ध झाला तरी त्यासाठी लागणार्‍या इंटरनेटचा मासिक खर्च हजार रुपयांच्या घरात जातो. हा खर्च परवडेल का, अशा प्रकारचे प्रश्न आज ‘आकाश’चे विरोधक मांडत आहेत. राजीव गांधींनी ज्या वेळी देशात संगणक क्रांतीची बीजे रोवली त्या वेळीही असेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. संगणक हा माणसांच्या रोजगारावर गदा आणेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. मात्र संगणकानेच लाखो लोकांना रोजगार दिले आहेत. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे आयुष्य अल्पजीवी असते. आपल्याकडे पेजर आले कधी आणि मोबाइलच्या लाटेत लुप्त झाले कधी ते समजलेदेखील नाही. ग्रामीण भागासाठी म्हणून खास तयार केलेल्या ‘सिम्प्युटर’चेसुद्धा असेच झाले. त्यामुळे आता डिजिटल क्रांतीवर स्वार झालेल्या ‘आकाश’मध्ये अनेक त्रुटी आढळल्या तरी त्याचे मुक्तपणाने स्वागत व्हावे. ग्रामीण भागातील तरुणांना याचा निश्चितच फायदा होईल. 

0 Response to "डिजिटल क्रांतीवर स्वार ‘आकाश’"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel