-->
लष्करी शिस्तीचा मुख्यमंत्री मेजर बी.सी. खंडुरी

लष्करी शिस्तीचा मुख्यमंत्री मेजर बी.सी. खंडुरी

 लष्करी शिस्तीचा मुख्यमंत्री मेजर बी.सी. खंडुरी
Published on 17 Sep-2011 For Pratima
एकेकाळी उत्तर प्रदेशचा भाग असलेल्या उत्तराखंड या छोट्याशा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मेजर जनरल (निवृत्त) बी.सी. खंडुरी यांचा शपथविधी चार दिवसांपूर्वी झाला. दहा वर्षांपूर्वी जन्मलेल्या या राज्याची लोकसंख्या जेमतेम दीड कोटी आणि जिल्हे 17. खरे तर याला देवळांचे राज्य असेच संबोधले पाहिजे. कारण हरिद्वार, हृषीकेश यांसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे या राज्यात येतात. लष्करातून निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश केलेले आपल्या देशात फारच कमी लोक आहेत. त्यात बी.सी. खंडुरी यांचा समावेश अग्रक्रमाने होईल.
1 ऑक्टोबर 1934 रोजी डेहराडून येथे जन्मलेले खंडुरी हे सध्या राज्यातले एक लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी ते मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्या लष्करी थाटाच्या कामामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षात बरीच नाराजी व्यक्त झाली होती. त्यामुळे त्यांना काही काळ मुख्यमंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते. मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून रमेश पोखरियाल निशंक यांना जावे लागल्याने खंडुरी यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा लष्करी शिस्तीची राजवट सुरू झाली आहे. खंडुरी यांचा जन्म देहरादून येथील असला तरी त्यांचे सर्व शिक्षण झाले अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर ते लष्करात दाखल झाले. पुण्याच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सिकंदराबाद येथील लष्कराच्या संरक्षण व्यवस्थापनाच्या संस्थेतून उच्च पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण केल्यावर ते लष्करात नोकरीसाठी दाखल झाले. 
1954 ते 1900 या काळात त्यांनी लष्करात नोकरी केली. त्यांना या दरम्यान 1982 मध्ये विशिष्ट सेवा मेडल देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केले. लष्करातून निवृत्त झाल्यावर खंडुरी यांनी राजकारणात प्रवेश केला. ते भाजपच्या तिकिटावर गढवाल मतदारसंघातून सर्वात पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 
1991 मध्ये त्यांची केंद्रात रस्ते व वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2003 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला. फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे मोठे काम केले. मंत्र्यांनी अनावश्यक सरकारी खर्च टाळण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी राज्यातील काही राजकीय नेत्यांना पुरवली जाणारी अनावश्यक सुरक्षा थांबवली. तसेच मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यांवरही निर्बंध आणले. 
मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्‍यांना शिस्त लावत असताना त्यांनी मात्र स्वत:ही त्याचे पालन केले आणि एक नवा आदर्श उभा केला. त्यांच्या या लष्करी शिस्तीमुळे अनेक मंत्री व पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र त्याची खंडुरी यांनी कधीच पर्वा केली नाही. 
जनतेचा पैसा हा चांगल्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे आणि त्या पैशाचे नियोजनही योग्यरीत्या व्हायला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. याचे आचरण त्यांनी स्वत: केले आणि आपल्या सहकार्‍यांनी तसे करावे याचा आग्रह धरला. त्यामुळे ते लोकप्रिय झाले होते. आतादेखील त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कंबर कसण्याचे ठरवले आहे. एक मजबूत लोकपाल राज्यात नियुक्त करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यात पर्यटन हा मोठा उद्योग असला तरी राज्यात उद्योगधंदे आणून रोजगार निर्मितीला हातभार लावणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. अशा प्रकारे उत्तराखंडात पुन्हा एकदा खंडुरी यांची राजवट सुरू झाली आहे. 

Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "लष्करी शिस्तीचा मुख्यमंत्री मेजर बी.सी. खंडुरी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel