
निसर्गाचा धडा...
निसर्गापुढे आपले काही चालत नाही, हे कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला पुन्हा एकदा दिसले आहे. मानवाने कितीही शोध लावले, विविध रोगांवर नियंत्रणे मिळविण्यासाठी औषधे शोधली तरीही निसर्ग आपला वरचश्मा अखेर दाखवितोच, हे सध्या आपल्याला सध्या पावलोपावली पटत आहे. गेल्या महिन्याभरातील लॉकडाऊनमुळे निसर्गाने आपला समतोलही साधला आहे तसेच मानवाला कसे जगायचे हे शिकविण्याचा प्रयत्नही केला आहे. यातून आपण किती बोध घेऊ हे आत्ताच सांगता येणार नाही. आजवर मानव जातीने आपल्या उध्दारासाठी निसर्गाची खूप हानी केली आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली आहे. त्यातून मानवाने आपला विकास जरुर केला परंतु निसर्गाचा समतोल ढासळला. परंतु निसर्गापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजणाऱ्या या विद्धान मानवाने निसर्गाच्या हाकेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. सध्या जगाचा विचार न करता आपण केवळ आपल्या देशाचा विचार केला तरी अगदी मोजकीच वाहने, सार्वजनिक वाहने सध्या रस्त्यावर आहेत. बहुतांशी कारखाने, अत्यावश्यक सेवेतील व काही आपतकालीन परिस्थितीतील कारखाने वगळता सुमारे 90 टक्के उत्पादन प्रकल्प बंद आहेत. खनिज तेलाचा वापर जगात यातून कमीत कमी झाला आहे. त्यामुळे याच्या किंमती झपाट्याने तर उतरल्याच शिवाय खनिज तेलाचा साठा कसा करावयाचा या मोठा प्रश्न उत्पादक देशांपुढे उभा राहिला. एकेकाळी ज्या खनिज तेलाच्या जीवावर आखाती देशांनी आपल्या घरावर सोन्याची कौले चढविली त्यांच्यावर फार वाईट दिवस येऊ घातले आहेत. या घडामोडींचा परिणाम म्हणून आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील प्रदूषण झपाट्याने कमी झाले. आपल्या देशातील जीवनवाहिनी म्हणून आपण ज्या नदीकडे पाहतो त्या गंगा, यमुनाचे प्रदूषण विकोपाला गेले होते. त्यासाठी आजवर सरकारने करोडो रुपये खर्च केले, अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा साफसफाईचा उल्लेख केला त्या नद्या सध्या नैसर्गिकरित्या अगदी स्वच्छ झाल्या आहेत. दक्षिण मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावर मोर दिसू लागले. मुंबईत मोर दिसणे ही एक बातमी होऊ लागली. आपण निसर्गापासून किती लांब गेलो होतो याचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे. हा निसर्गाने केलेला चमत्कार म्हटला पाहिजे, किंबहुना निसर्गाने मानवाला दिलेला धडाच म्हटले पाहिजे. याचा अर्थ मानवाने पुन्हा पूर्वीसारखे अविकसीत जीवन जगायचे का, असा सवाल निर्माण होतो. अजिबात नाही. परंतु कोणतेही निर्बंध न पाळता आपण निसर्गाच्या विरोधात जात होतो ते आता तरी थांबविले पाहिजे, असेच यातून प्रतिबिंबीत होते. निसर्गाचा समतोल पाळावयास आपल्याला शिकावे लागणार आहे. शहरी मध्यमवर्गीय नोकरदारांने आपल्याकडे घरी कामाला कामवाई बाई येते, त्या बाईच्या श्रमाचे कधीच मोल जपले नाही. परंतु त्या बाईचेही काम किती मोलाचे असते हे सध्या स्वत: घरी बसून काम करावे लागल्याने समजू लागले. कोणत्याही श्रमाची प्रतिष्ठा करण्याची आपल्याकडे संस्कृती नाही. एखादे काम कनिष्ठ दर्जाचे असेल तर त्याची अवहेलनाच केली जाते. युरोप, अमेरिकेत असलेली कमवा म्हणजेच कष्ट करा व शिका ही संस्कृती आपल्याकडे नसल्याने आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा लहान वयातूनच दिली गेली नाही. परंतु सध्याच्या काळात श्रमाची प्रतिष्ठा स्वत: काम केल्यामुळे अनेकांना समजली. आय.टी. उद्योगातील तसेच काही कामे हे घरी संगणकापुढे बसून करता येऊ लागली. त्यामुळे अनेक कंपन्यांना आपण कोरोनानंतरही अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसून काम देऊन त्यांच्याकडून काम करवून घेऊ शकतो, हे पटले. त्यात कंपन्यांचाही फायदा आहे व कर्मचाऱ्याचाही फायदा आहे हे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात पटले. मुंबई, पुणे, बंगलोर या मोठ्या आय.टी. हब असलेल्या शहरात कर्मचाऱ्यांचा प्रवासातील वेळ वाचल्याने त्यांना आपणे एवढे काळ प्रवासात किती आयुष्य फुकट घालविले याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे यातील काही कर्मचारी एक वेळ थोडा पगार कमी द्या पण घरुन काम करण्यास तयार होणार आहेत. अर्थात सर्वच उद्योगात वर्क प्रॉम होम काही शक्य नाही. जिकडे कंपनीत उत्पादन होते तेथे कामगारांना प्रत्यक्षात तेथे जावेच लागणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात कर्मचारी घरुन काम करण्याची संधी घेऊ शकतात. टी.सी.एस. या आय.टी उद्योगातील आघाडीच्या कंपनीने आपले 75 टक्के कर्मचारी कोरोनानंतरही घरुनच काम करतील अशी घोषणा केली आहे. त्यातून अनेक नवीन बदल आपल्या देशात घडणार आहेत. डिजिटलायझेशनच्या एका नव्या युगाला आता कोरोनानंतर प्रारंभ होणार आहे. उठसुठ फुटकळ कामासाठी बँकेत आज जाणारे आपल्याकडे लाखो लोक आहेत. परंतु कोरोनाच्या काळात बँकेतील व्यवहार फक्त पैसे काढणे व भरणे एवढेच मर्यादीत राहिल्याने अन्य व्यवहार डिजिटलच्या रुपाने करण्याकडे लोकांचा कल वाढला. एखादी वस्तू देखील खरेदी करण्यासाठी लोकांचा मोठ्या शहरात एखाद्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याकडे कल होता. मात्र आता त्यासाठी वेळ खर्च न करता ऑनलाईन खरेदी करुन आपण आपला वेळ वाचवू शकतो हे देखील आता लोकांना पटले आहे. त्याचबरोबर केवळ आपल्याला अत्यावश्यक वस्तूंच्या सहय्याने चांगले जीवन जगता येते हे देखील अनेकांना पटले. कारण आपण अनेकदा गरज नसताना खरेदी करतो व पैशांची उधळण करतो हे लॉकडाऊनच्या काळात लोकांना जाणवले. डिजिटलयाझेशनसाठी सरकारने इंटरनेटची चांगली सुविधा व वीज या बाबी चांगल्या रितीने पुरविल्यास हे व्यवहार भविष्यात वाढत जाणार आहेत. त्याचबरोबर आता ऑनलाईन व्यवहारातील गैरव्यवहारांना आळा घालून सर्व व्यवस्था फूल प्रुफ केल्यास हे व्यवहार वाढतील. सध्या बहुतांशी म्हणजे प्रामुख्याने पन्नाशी पार केलेल्यांना ऑनलाईन खरेदीवर विश्वास नसतो. तो त्यांच्या पिढीचा परिणाम आहे, त्या पिढीत आता बदलही होऊ शकत नाही. मात्र तरुणांचा कल बदलत जाणार आहे हे नक्की. गेल्या महिन्याभरात वृत्तपत्रांचे वितरण सर्वत्र होतेच असे नाही. मात्र त्यामुळे दुसऱ्या बाजुला वृत्तपत्रांच्या ऑनलाईन हिटस वाढल्या आहेत. हा बदल छपाई उद्योगाला कुठे नेऊन ठेवेल ते आत्ताच सांगणे कठीण असले तरी पुढील दहा वर्षात छपाई उद्योगात जे बदल होणार होतो ते कोरोनामुळे लवकर होतील हे नक्की. आपला समाज, आपले भोवतालचे वातावरण हे नेहमीच प्रवाही राहिले आहे. बदल हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरतो. आता कोरानामुळे आपल्यात अनेक बदल होऊ घातले आहेत हे बदल आपल्याला स्वीकारावे लागतील, अन्यथा आपण या प्रवाहात वाहते राहाणार नाही, हे सत्य आहे. निसर्गाने हे आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने शिकविले आहे.
0 Response to "निसर्गाचा धडा..."
टिप्पणी पोस्ट करा