-->
संपादकीय पान मंगळवार दि. २८ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नेपाळवरील संकट
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर सध्या धरणीमाता कोपली आहे. गेले दोन दिवस सलग भूकंपाचे ३८ धक्के बसले. यातील पहिला धक्का सर्वात मोठा होता. या धक्क्यात सुमारे तीन हजारांवर लोकांचे जीव गेले आहेत. जखमींचा आकडा सहा हजारांच्यावर गेला आहे. एकूणच पाहता नेपाळवरील हे नैसर्गिक संकट भयानक ठरणार आहे. अर्थात हा भूकंप नेपाळच्या बरोबरीने संपूर्ण उत्तर भारतातील दहा हून जास्त राज्यांना बसला. आपल्याकडे मनुष्यहानी फारशी नाही हे आपले सुदैव. याच दरम्यान भारतीय पर्यटक जे नेपाळला गेले होते त्यातील सर्वांना मायदेशी आणण्यात भारत सरकारला यश आले आहे. जवळपास हजाराच्यावर अशा भारतीय पर्यटकांना मायदेशी आणण्यात आले आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी उत्तराखंड राज्यावर झालेली प्रलयंकारी ढगफुटी व शनिवारी नेपाळमध्ये झालेला जबरदस्त भूकंप या दोन ठळक दुर्घटना हिमालय रांगांमध्ये झालेल्या आहेत. अशा नैसर्गिक आपत्ती या प्रदेशात येतच राहातील. कारण हा प्रदेशच भूगर्भ हालचालींच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. म्हणून मुख्य भूकंपानंतर वेगवेगळ्या तीव्रतेचे अनेक भूकंप धक्केही बसले. या भूकंपाचे मुख्य केंद्र नेपाळपासून ७५ कि.मि. अंतरावर होते. भूगर्भशास्त्राच्या सांगण्यानुसार, पृथ्वीचे भूपृष्ठ घनतेच्या फरकामुळे भारतीय, युरेशियन, आफ्रिकन, अंटार्क्टिक, अमेरिका व पॅसिफिक अशा सहा प्रमुख व छोट्या तुकड्यां (प्लेट) मध्ये विभाजित झाले आहे. भारतीय तुकडा जमीन व सागर अशा दोन घटकांपासून बनलेला आहे व हा तुकडा युरेशियन तुकड्याला मागे रेटू पाहत आहे. या रेटण्याचा वेग प्रतिवर्ष सुमारे ४५ मिलिमीटर आहे. लाखो वर्षांपासून या रेटण्यामुळे हिमालय हा टप्प्याटप्याने घडीचा पर्वत झाला आहे व त्यातून तिबेटचे पठार निर्माण झाले आहे. पृथ्वीच्या जन्मापासून विविध पर्वतमालांच्या उत्पत्तीचा विचार करता भूपृष्ठाखाली चालणार्‍या सततच्या हालचालींमुळे हिमालय पर्वताच्या रांगा सर्वात तरुण समजल्या जातात. पृथ्वीच्या गर्भात ज्या हालचाली होत असतात त्याचे पडसाद हे भूकंपाच्या रुपाने उमटत असतात. अनेकवेळा या नैसगिज्ञक बाबी आहेत. हिमालयाच्या कुशीतील या भागात वरुन बर्फ दिसत असले तरी पृथ्वीच्या गर्भात जे तप्त लाव्हासर असतात त्यांची घुसळण सर्व गणिते बिघडवित असतात. नेपाळला तडाखा यातून मिळाला आहे. भारताने एक मित्रराष्ट्र व शेजारी या नात्याने म्हणून नेपाळला ताबडतोब मदत देण्यास सुरुवात केली. या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले आहेच व मृतांचा आकडा १० हजारांहून अधिक जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काठमांडू असो वा आसपासच्या भागातील मानवी वस्ती असो, ही प्रामुख्याने माती, विटांच्या घरातच राहणारी आहे. त्यामुळे मनुष्यहानी मोठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हा भूकंप दिवसा झाला असल्यामुळे मनुष्यहानी कमी होईल. हा भूकंप जर मध्यरात्री लोक झोपेत असताना झाला असता तर मोठे नुकसान झाले असते. नेपाळ हा देश गरीब असून पारंपरिक शेती व पर्यटनावर या देशाची अर्थव्यवस्था चालत असल्याने तेथे नैसर्गिक दुर्घटनांचा सामना करणारी अशी कोणतीही यंत्रणा विकसित झालेली नाही. त्यामुळे भारत, चीन व अन्य देशांकडून मिळणार्‍या मदतनिधीवर, पुनर्वसन योजनांवर नेपाळला पुन्हा उभे राहावे लागेल. भारतापाठोपाठ नेपाळला आता चीननेही मोठी मदत देण्यास सुरुवात केली आहे. चीनला नाहीतरी राजकीयदृष्ट्या नेपाळमध्ये प्रवेश करावयाचा होताच. आता त्यानिमित्ताने एक संधी चालून आली आहे. परंतु सध्याच्या मदतकार्यात राजकारण आणता कामा नये. नेपाळच्या सर्वच्या शेजारी देशांनी नेपाळच्या पुर्नउभारणीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी आपल्याकडे उत्तराखंडात आलेली ढगफुटी व त्याने झालेले नुकसान याचा आपण चांगलाच मुकाबला केला. यातून हे धार्मिक स्थळ केवळ एका वर्षात पुन्हा उभे केले. याचा आपल्या अनुभवाचा नेपाळला चांगला उपयोग करुन देता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लातूर येथे आलेल्या भूकंपानंतर आपण तेथे केलेले पुर्नवसनही एक उत्तम नमूना ठरु शकतो. तसेच गुजरातमधील कच्छ येथील भूकंपानंतर आपण ती नगरी नव्याने वसविली. ही दोन्ही उदाहरणे नेपाळपासाठी आपण एक मॉडेलम्हणून पुढे ठेवून त्याची अंमलबजाणी करुन पुन्हा एकदा नेपाळ वसवू शकतो. आपल्यालाही यापूर्वी भूकंपाने धक्का दिला होता. पुंरतु आपण त्यावर यशस्वीरित्या मात केली. भूकंपाची आगावू सूचना देऊन प्रणहानी वाचविण्याचे अत्याधिुनक तंत्रज्ञान आपल्याकडे अद्याप नाही ही वस्तुस्थिती आपण नाकारु शकत नाही. मात्र भूकंपानंतर विस्कटलेले जनजीवन आपण पुन्हा उभे करण्यात चांगलेच तयार झालो आहोत. तसेच नेपाळ हा अत्यंत गरीब देश असल्यामुळे त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन नाही. आपण यात फार मोठी प्रगती केली नसली तरी नेपाळला यात आपण चांगले मार्गदर्शन करु शकतो. नेपाळला झपाट्याने सावरण्याची गरज आहे. कारण येथील बहुतांशी व्यवहार हे पर्यटनावर आधारित आहेत. पर्यटन लगेचच सुरु होणार नसले तरीही येत्या वर्षात पुन्हा नेपाळची उभारणी करुन नेपाळमध्ये पर्यटनाला वेग येऊ शकतो. एक आपला शेजारी देश म्हणून आपण पहिल्या टप्प्यातील मदत केली आहे. परंतु नेपाळच्या पुर्नवसनातही आपण मोलाची कामगिरी करु शकतो. नैसर्गिक आपत्ती या येतच राहातात. त्यावर मनुष्यप्राणी मात करतो आणि आपला विस्कटलेला संसार पुन्हा उभा करतो. नेपाळसाठी ही पहिलाच अनुभव असला तरीही यातून नेपाळ भारताच्या व चीनच्या सहाय्याने सावरेल यात काहीच शंका नाही.
------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel