-->
संपादकीय पान बुधवार दि. २९ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भूकंपाचे पडसाद
नेपाळसह उत्तर भारताला बसलेल्या भूकंपाच्या हादर्‍याने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी होत असलेल्या हा भूगर्भातील हालचाली चिंतादायक आहेतच शिवाय एकूणच भविष्यात पृथ्वी कोपल्यास काय होऊ शकते याचा अंदाज त्यातून येऊ शकतो. काठमांडूचा भाग हा काही मिटरने भारताच्या दिशेने सरकला आहे. गेले कित्येक वर्षे काही सेंटीमिटरने सरकण्याची ही प्रक्रिया होतच होती. परंतु पृथ्वीतल्या या प्लेटस्‌च्या सरकण्याने भूगर्भ शास्त्रज्ञांपुढे संशोधनाचे एक नवीन आव्हान येऊन ठेपले आहे. नेपाळमधील बळींची संख्या ४००० वर गेली असून, देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. भारतातील बळींची संख्या ७२ झाली आहे. सध्याची स्थिती पाहता नेपाळमधील बळींची संख्या दहा हजारांवर जाण्याची भीती आहे. शनिवारी नेपाळला पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यापाठोपाठ सलग ८०च्यावर कमी क्षमतेचे धक्के जाणतच आहेत. म्हणजे भूकंपानंतर अजूनही स्थिती सावरलेली नाही. भारत-नेपाळ सीमेवर हिमालयाच्या परिसरात भूगर्भात मोठा दाब तयार होत आहे. तो या भूकंपाच्या धक्क्यातून हा देश अजूनही बाहेर आलेला नाही. त्यातच जिओ हॅझाड्‌र्स या संस्थेने महाभूकंपाची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. यापूर्वी नेपाळला १९३४ मध्ये ८ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता. दुदैवाने त्यांच्या या अंदाजानुसार
नेपाळला महाभूकंपाचा फटका बसल्यास हा देश पूर्णपणे संपुष्टातच येण्याच धोका आहे. त्यातच आता पावसास सुरुवात झाल्याने बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज व औषधे यांच्या तीव्र टंचाईला सामोरे जाणारे आणि भीतीच्या सावटाखाली वावरणारे हजारो लोक उघडयावर मुक्कामाला आहेत. नेपाळमधील भूकंपाला ४८ तास उलटून गेले असताना अनेक ढिगार्‍यांखालून अद्याप मृतदेह सापडत आहेत. काठी ठिकाणी गावेच्या गावे गाडली गेली असल्याची भीती व्यक्त होत आहे. दहा अणूबॉम्बच्या स्फोटाएवढी या भूकंपाची क्षमता होती असे आता उघड झाले आहे. भारतासह अनेक देशांची मदत पथके काठमांडूत कार्यरत आहेत. नेपाळ हे पर्यटनाचे मोठे केंद्र असल्याने तेथे दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय जातात. यंदाही गेलेल्या भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका घकरणे हे एक मोठे आव्हान सरकारपुढे होते. राज्यातील अडकलेल्या निम्म्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात यंत्रणा कमी पडत आहेत, त्यामुळे नेपाळमधील हजारो भूकंपग्रस्त नागरिकांसोबतच तेथे अडकलेल्या भारतीय पर्यटकांची अधीरताही वाढली आहे. नेपाळमधून २५०० भारतीयांची सुटका करण्यात आली असून तेथे अडकून पडलेल्या व भारतात येऊ इच्छिणार्‍या अन्य परदेशी पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. काठमांडूची उपनगरे आणि ग्रामीण भागातही इंधन आणि औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. भारताने मदत आणि पुनर्वसनाचे काम फार मोठया प्रमाणावर हाती घेतले आहे. रामदेवबाबा आपल्या कार्यकर्त्यांसह काठमांडूत पोहोचले असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु केले आहे. लष्कराची १३ विमाने फिरती रुग्णालये, औषधे, ब्लँकेट्स, ५० टन पाणी व इतर साहित्य घेऊन गेली आहेत. नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी खासदारांनी एका महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वागतार्ह ठरावा. नेपाळच्या या भूकंपानंतर पर्यावरणवाद्यांना मात्र भरते आले आहे. जैतापूरचा प्रकल्प किती धोकादायक आहे व तो प्रकल्प का उभारु नये याचे जुनेच दळण त्यांनी लावले आहे. जैतापूर व रत्नागिरी या शहरांना यापूर्वी ५.५ रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचे धक्के बसले आहेत. भविष्यात जैतापूरमध्ये अणू ऊर्जा प्रकल्प उभा राहिल्यास व आपत्ती ओढवल्यास त्याचे भीषण परिणाम होतील, असे इशारे देण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरणवाद्यांचे हे सर्व भीतीदायक इशारे पाहता असे वाटते की देशात कुठेच विकास केला जाऊ नये. कोणताच प्रकल्प उभारणे हे देशास धोकायदायक आहे. या पर्यावरणवाद्यांनी खरे तर जपानला जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. कारण जपानसारख्या देशात दरवर्षी भूकंपाचे शेकडो धक्के बसत असतात. परंतु जपानी लोकांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. जपानमध्ये मोठ्या क्षमतेचे अणूउर्जा प्रकल्प यशस्वीरित्या चालविले जातात. तीन वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेल्या मोठ्या भूकंप व सुनामी नंतर तेथील अणूउर्जा प्रकल्प धोक्यात आला होता. तेथे काही तरी मोठा अपघात होईल अशी भीती व्यक्त झाली होती. परंतु हा प्रकल्प जपानच्या तंत्रज्ञांनी बंद करुन त्यावर मात केली. काही प्रमाणात अणू उर्त्सजन झाले होते मात्र त्यावरही मात करण्यात आली. आता हेच पर्यावरणतज्ज्ञ भारतात जैतापूरला अणू उर्जा प्रकल्प नको अशी वावटळ उठवित आहेत. देशाचा विकास जर करायचा असले तर काही प्रमाणात धोके हे पत्करावे लागतीलच, हे पर्यावरणवाद्यांनी विसरु नये. भूकंपप्रवण नसलेल्या भागातही भूकंप झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्रच हे धोकादायक आहे असे म्हणून चालणार नाही. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती कधीही व कुठेही येऊ शकते. मात्र त्यामुळे घाबरुन जाता कामा नये. त्यावर आपण कशी मात करु शकतो हे महत्वाचे जपानने याबाबत जगापुढे एक उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. त्यांच्याच अनुभवाचा फायदा घेत आपल्याला व आता नेपाळला पुढे जावे लागणार आहे.
-------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel