
लघुउद्योगनगरी धोक्यात
लघुउद्योगनगरी धोक्यात
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी जगाला ओळख असणारी धारावी सध्या कोरोनामुळे मोठ्या अडचणीत आली आहे. तेथे कोरोना झपाट्याने वाढू लागला असून तेथील ही साथ कशी आटोक्यात आणावयाची याची मोठी चिंता प्रशासनाला लागणे स्वाभाविकच आहे. कारण नऊ लाख एवढ्या मोठ्या संख्येने धारावीत लोक राहातात. एवढ्या लोकांचा एकीकडे तेथेच असलेला रोजगार धोक्यात तर आला आहेच शिवाय आरोग्यावरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खरे तर आपल्याला धारावीची ओळख ही सर्वात मोठी झोपडपट्टी ही आहे, परंतु धारावी ही केवळ झोपडपट्टीच नाही तर देशाची सर्वात मोठी लघुउद्योगनगरी आहे. येथे घराघरात छोटे-मोठे उद्योग आहेत. धारावी सुमारे दहा लाख लोकांना रोजगार देते. येथील 15 हजार सिंगल रुम्समध्ये पाच हजार नोंदविलेले उद्योग आहेत. त्याशिवाय न नोंदविलेल्या घरांतील लघुउद्योगांची गणतीच करता येणार नाही. येथे उत्कृष्ट दर्ज्याच्या उत्पादनांची निर्मीती होऊन त्यांची निर्यात होते. दरवर्षी धारावीतून एक अब्ज डॉलरच्या उत्पादनांची निर्यात होते. मुंबईतील 60 टक्के प्लॅस्टिकचा कचरा येथे रिसायकल केला जातो. त्यामुळे धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही तर ती एक लघउउद्योगनगरी आहे. तेथे लाखो लोकांना रोजगार मिळतो, अनेक जण आपल्या उद्योजकतेची बिजे येथे रोवतात. स्वस्त जागा, स्वस्त उपलब्ध रोजगार यामुळे येथे उद्योग करणे फार सोपे ठरले आहे. घराघरात येथे काही ना काही लघुउद्योग आपल्याला दिसतील. त्यादृष्टीने धारावीचे महत्व आपल्याला लपविता येणार नाही. धारावीने देशाच्या तिजोरीत कर रुपाने मोठी भर घालण्याचे काम करीत असते. कोरोनाची साथ सुरु झाली व सर्वात जास्त धोका निर्माण झाला होता तो झोपडपट्टी विभागात कारण येथे असलेली लहान घरे. तेथे लोकांना घरात राहणे मोठे मुश्कील ठरते. कारण धारावीसारख्या झोपडपट्टीत तर शंभर फुटांच्या घरात आठ-दहा लोक राहातात. त्याहून येथील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बहुतांश ठिकाणी येथे लोकांना सार्वजनिक संडासात जाऊन आपले प्रात विधी उरकावे लागतात. हेच संडास कोरोनाची लागण होण्याची प्रमुख केंद्रे ठरली आहेत. धारावीच्या 225 ब्लॉक्समध्ये सरासरी 30 ते 50 संडास आहेत. एका संडासाचा दिवसभरात सुमारे 150 ते 200 लोक सरासरी वापर करतात असा अंदाज आहे. त्यामुळे येथे एक जरी कोरोनाग्रस्त रुग्ण आल्यास त्याची लागण किती लोकांना होण्याचा धोका आहे ते आपल्याला समजू शकते. प्रत्येक जण संडासातून बाहेर आल्यावर तेथे जंतूनाशके मारुन तो संडास साफ करणे काही शक्य नाही. येथील 90 टक्क्याहून जास्त लोकसंख्या सार्वजनिक संडासांचाच वापर करते. धारावीतील हे वास्तव लक्षात घेऊन तरी निदान शौचाला जाणाऱ्यांना तरी पोलिसांनी फटके मारु नये असे आवाहन धारावी बचाव समितीने केले होते. 96 साली काही संस्थांनी येथील दहा बाय दहाच्या खोलीत संडास करुन देण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले होते. परंतु सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी येथे पाईपलाईनच नाही. त्यामुळे येथील झोपडपट्टीत संडास पुरविण्याची योजना बारगळली. सध्याच्या स्थितीवर मात करण्यासाठी काही संस्थांनी तसेच महापालिकेनेही येथील संडासात साबण व सॅनिटायझर पुरविले होते. परंतु प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होतोच असे नाही. तर काही ठिकाणचे साबण हे चोरीला देखील गेले आहेत. मुंबई महापालिकेने येथे मोठ्या संख्येने डॉक्टर्स तैनात केले आहेत. परंतु एकूणच सर्व यंत्रणा काही पुरेशी ठरणारी नाही. खासगी डॉक्टर्सही आहेत, परंतु कोरोनाच्या विरोधात काम करण्यासाठी येथे पावलोपावली अनेक अडचणी येतात. धारावीत 1 एप्रिल रोजी कोरोनाने पहिला एकाचा मृत्यू झाला, त्यापाठोपाठ 9 एप्रिल रोजी 6 जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले. त्यानंतर येथे कोरोनाने उसळी खाल्ली व संख्या काही कमी होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. सध्या कोरोना कसा नियंत्रणात आणावयाचा हे एक मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. धारावी बचाव समितीने कोरोनाचा धारावीत प्रवेश होण्यापूर्वीच सरकारला निवेदन देऊन काही उपाययोजना सुचविल्या होत्या. धारावीतील परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करावयास हवी. सोशल जिस्टंसिंगचे इमारतींमधील नियम धारावीत लागू करुन चालणार नाहीत. आज धारावीच्या एकूण लोकसंख्येपैकी 15 टक्के म्हणजे सुमारे 1.25 लाख जनतेला त्यांच्या विभागात बंद करुन ठेवण्यात आले आहे. परंतु धारावीकरांना संडासासाठी बाहेर जावेच लागते. त्यामुळे धारावीला कोरोनामुक्त करणे हे एक मोठे आव्हान ठरले आहे. ज्यांचे रोजच्या उत्पन्नावर पोट आहे अशा लोकांचे खाण्याचे हाल आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. धारावीच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेली पंधरा वर्षे चर्चिला जात आहे. येथील लोकांचे, उद्योगांचे तेथेच मोठ्या इमारतीत पुनर्वसन व्हावे यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या. आजपर्यंत तीन वेळा केवळ जागतिक पातळीवरील निविदा काढल्या गेल्या. मात्र त्यात पुढे काहीच झाले नाही. पुनर्वसनाचे हे काम वेळेत झाले असते तर तेथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असत्या. तेथील झोपडपट्टीतील लोकांना पक्या घरांचा निवासाचे स्थान मिळाले असते. तेथील लघुउद्योगाची परंपरा कायम टिकली असती व स्थानिक रोजगारही टिकले असते. प्रत्येकाच्या घरात संडास असता, त्यामुळे सध्याचे कोरोनाच्या साथीच्या काळात जे प्रश्न उदभवले आहेत त्याची तीव्रता कमी झाली असती. अर्थात या जर तर च्या गप्पा झाल्या. आज कोरोनामुळे देशाची ही सर्वात मोठी लघुउद्योगनगरी संकटात आली आहे.
0 Response to "लघुउद्योगनगरी धोक्यात"
टिप्पणी पोस्ट करा