
आरोग्याचा भ्रमनिरास
03 फेब्रुवारी अग्रलेख
आरोग्याचा भ्रमनिरास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव रक्कम आरोग्यासाठी राखून ठेवली जाईल अशी अपेक्षा जनतेने ठेवणे काही चुकीचे नव्हते. परंतु आरोग्य खात्यात अन्य विभाग समाविष्ट करुन जो आकडा फुगविण्यात आला आहे ते पाहता सरकारने जनतेची फसवणूक केली आहे असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षात कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले. परंतु सुदैवाने आपल्याकडे कोरोनाचा कहर युरोप, अमेरिकेसारखा नव्हता. तशी जर कोरनाची साथ आपल्याकडे पसरली असती तर आपल्याकडील आरोग्य व्यवस्थेचे सर्वत्र आणखीनच वाभाडेच निघाले असते. परंतु कोरोना पश्चात आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्थेवर प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. याची जबाबदारी प्रामुख्याने नागरिकांची असल्याने त्यांनी त्यासाठी जनमत संघटीत करुन ही बाब प्रत्यक्षात उतरवास भाग पाडावयास हवे. राज्यकर्त्यांना आरोग्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात जादा निधी खर्च करावासा कधी वाटला नाही. अर्थात याला कोणतेच म्हणजे भाजपापासून ते क़ॉँग्रेसच्या कोणत्याच सरकारचा अपवाद नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात वरवर पाहता सरकारने खूप मोठी तरतूद केल्याचे भासते आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. अर्थमंत्र्यांनी मोठी दिशाभूल केली आहे. याचा पर्दाफाश जनआरोग्य अभियानाचे सहआयोजक डॉ. अनंत फडके यांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अभूतपूर्व म्हणजे १३७ टक्के वाढ केल्याचे दिसते. परंतु ही वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पिण्याचे पाणी व सार्वजनिक स्वच्छता, पोषण अभियान या दोन योजनांचा निधी यंदा आरोग्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्यावरील खर्चाची तरतूद झपाट्याने वाढल्याचे चित्र दिसते. परंतु हे चित्र फसवे आहे. आजवर हा सर्व खर्च आरोग्य व कुटुंब कल्याण या नावाखाली दाखविला जात असे. परंतु आता या खर्चाचा समावेश आरोग्यात केला आणि वरती त्याचे नावही बदलले. त्यामुळे आरोग्यावरील वाढ फसवी आहे. कोरोनापश्चात आपल्याला जनतेच्या आरोग्याची किती मोठी काळजी आहे असे भासविण्याचा प्रयत्न जरी अर्थमंत्र्यांनी केला असला तरीही त्यात काही तथ्य नाही. सर्वात गंमतीचा भाग म्हणजे पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना ही खूप काही महत्वाची योजना असल्याचे भासवित त्यासाठी ६४००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु ही केवळ घोषणाच आहे, कारण त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एका नव्या पैसाची तरतूद नाही. याहून जनतेची फसवणूक ती काय, असा सवाल आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करताना केवळ निधीची तरतूत करुन भागणार नाही तर आवश्यक ते आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्सही वाढवावे लागणार आहेत. सध्या प्रत्येक दहा हजारामागे आठ डॉक्टर्स व दहा आरोग्य कर्मचारी आहेत. हे प्रमाण वाढविण्याची आवश्य़कता आहे. स्वस्थ भारत योजनेत सुमारे १७ हजार ग्रामीण आणि ११ हजार नागरी आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करणे, सर्व जिल्ह्यात एकात्मिक जनआरोग्य प्रयोगशाळा, ६०२ जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता उपचार केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. परंतु त्यासाठी खर्च कसा करणार ते कोणालाच माहित नाही. त्यामुळे या घोषणा आहेत छान परंतु त्यावर उगाचाच टिका करण्यापेक्षा पहिल्यांदा काम करुन दाखवा असे सांगण्याची वेळ आहे. सध्या ज्या डॉक्टरांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा विविध ठिकाणी रिक्त आहेत त्या भरण्याचीही आवश्यकता आहे. सध्या वैद्याकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या एक तृतियांश जागा भरल्या गेल्या पाहिजेत. सीतारामण यांनी काल सादर केलेल्या या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १३७ टक्के नव्हे तर १७ टक्केच वाढ आहे. सरकार वेळोवेळी ज्या समित्. स्थापन करते त्याचा अहवाल स्वीकारल्याचे जाहीर करते. मात्र प्रत्यक्षात तसे करायचेचे नाही असे जे आजवर कॉँग्रेसच्या सरकारने केले होते तीच परंपरा भाजपाच्या सरकारने सुरु ठेवील आहे. कोरोनावरील लसीसाठी सरकारने यंदा ३५ हजार कोटी खर्च करण्याची तरतुद केली आहे. परंतु कोरोनावरील लसासाठीचे नेमके नियोजन कसे असेल ते कधीच सांगितले जात नाही. ही लस सर्वंनाच मोफत देणार की गरीबांना देणार हे देखील स्पष्ट झालेले नाही. सर्वांसाठी मोफत लस दिल्यास त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर सुमारे एक लाख कोटी रुपये भार पडेल असा अंदाज आहे. एवढी रक्कम सरकार खर्च करणार आहे का, हा सवाल आहे. मग बिहारच्या लोकांना निवडणुकीत मोफत लस देण्याचे जे जाहीर केले होते त्याची आश्वासन पूर्वी होणार का? मग फक्त बिहारलाच का, इतर राज्यातील जनतेवला मोफत लस का नको, हे प्रश्न अनुत्तरीत राहातात. कदाचित सध्याच्या वर्षात ज्या राज्यात निवडणूक आहे तेथेही असेच मोफत लसीचे आश्वासन दिले जाईल. सध्याची लस टोचण्याची गती पाहता वर्षात केवळ दहा कोटी लोकांनाच लस टोचली जाईल. मग १२० कोटी शिल्लक राहिलेल्या लोकांना कधी लस मिळणार? सध्या आकडे फुगवून जनतेच्या हितासाठी आपण कसे काम करीत आहोत हे भासविले जात आहे. परंतु सरकारचे हे पितळ आज ना उद्या कधीतरी उघडे पडणार आहे.
0 Response to "आरोग्याचा भ्रमनिरास"
टिप्पणी पोस्ट करा