-->
पी.एम. किसानचा बोजवारा / करोना आटोक्यात न आल्यास...

पी.एम. किसानचा बोजवारा / करोना आटोक्यात न आल्यास...

शनिवार दि. 22 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पी.एम. किसानचा बोजवारा
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठा गाजावाजा करुन सुरु केलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा वर्षभरातच बोजवारा उडाला आहे. खरे तर निवडणुकीच्या अगोदर शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे टाकणे म्हणजे एक प्रकारे मतांसाठी लालूच देण्याचाच प्रकार होता. परंतु केंद्र सरकारने ही योजना निवडणुकीच्या अगोदर सुरु केली. योजना सुरू करताना जानेवारी-फेब्रुवारी 2019 मध्ये देशातील आठ कोटी 46 लाख 6 हजार 103 शेतकर्‍यांना पहिला हप्ता मिळाला. आता बरोबर एक वर्षाने जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये चौथा हप्ता दिला जात असून, अवघ्या तीन कोटी नऊ लाख 57 हजार 821 शेतकर्‍यांच्याच खात्यात तो जमा झाला आहे. म्हणजे तब्बल एका वर्षातच पाच कोटी 36 लाख 48 हजार 282 शेतकरी चौथ्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त शेतकर्‍यांसाठी वाजतगाजत ही योजना सुरु केली. प्रत्येक खातेदाराला वार्षिक 6 हजार रुपये 2 हजारांच्या तीन हप्त्यात देण्याची घोषणा केली. जानेवारी-फेब्रुवारीत पहिला हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला. नंतर ही योजना जणू दिखावच ठरु लागल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. जवळजवळ प्रत्येक राज्यात लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या घसरली आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचेही पहिल्या हप्त्याच्या तुलनेत 64 लाख 35 हजार 786 लाभार्थी घटले. राज्यात 91 लाख 6 हजार 801 लाभार्थ्यांची पी. एम. किसान पोर्टलवर नोंद झालेली आहे. त्यापैकी पहिला हप्ता 84 लाख 57 हजार 153 लाभार्थ्यांना म्हणजे सहा लाख लाभार्थी पहिल्याच हप्त्यात वंचित राहिले. दुसर्‍या हप्त्यात 16 लाख 35 हजार 211 लाभार्थी वंचित राहिले असून, 68 लाख 21 हजार 942 शेतकर्‍यांच्या खात्यात प्राप्त हप्ता झाला आहे. तर तिसर्‍या हप्त्यातही शेतकरी संख्या पहिल्या हप्त्याच्या तुलनेत 31 लाख 69 हजार 991 ने घटली. 52 लाख 87 हजार 162 शेतकर्‍यांनाच तिसरा हप्ता मिळाला आणि चौथ्या हप्ता तर अवघ्या 20 लाख 21 हजार 367 शेतकर्‍यांनाच प्राप्त झाला आहे. देशभरातील 36 राज्यांचे मिळून 8 कोटी 90 लाख 88 हजार 713 लाभार्थ्यांची पी. एम. किसानच्या पोर्टलवर नोंद झाली होती. त्यापैकी कुठलीही तांत्रिक अडचण नसलेले, कागदपत्रांची पूर्तता केलेले 8 कोटी 46 लाख 6 हजार 103 लाभार्थ्यांना 2 हजाराचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. पण दुसर्‍या हप्त्यावेळी 86 लाख 74 हजार 211 ने लाभार्थी घटल्याने 7 कोटी 59 लाख 31 हजार 892 शेतकर्‍यांनाच तो मिळाला. तिसर्‍या हप्त्यात ही संख्या पहिल्या हप्त्याच्या तुलनेत 2 कोटी 24 लाख 18 हजार 88 ने घटली. यावेळी 6 कोटी 21 लाख 88 हजार 15 शेतकर्‍यांनाच पैसे मिळाले. तर चौथ्या हप्त्यात 5 कोटी 36 लाख लाभार्थी वंचित राहिले. मात्र त्यातही केंद्र सरकार काही राज्याच्या बाबतीत कसा दुजाभाव करते हे देखील या योजनेच्या निमित्ताने दिसले. उदाहरण सांगावयाचे झाल्यास, पश्‍चिम बंगाल राज्याच्या रकान्याात एकही लाभार्थ्यांची नोंद नाही. म्हणजे या योजनेचा लाभापासून जणू ममतादिदींचे राज्य वंचित राहिल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले आहे. एका चांगल्या योजनेचे सरकारने कसे बारा वाजवले आहेत हे एक उत्तम उदाहरण ठरावे.
करोना आटोक्यात न आल्यास...
चीनमध्ये करोनाचा जबरदस्त फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. या संसर्गाने केवळ माणसांनाच नाही तर आता शेअर बाजारांपर्यंत आपला संसर्ग पोहचवला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये चीनचा वृद्धिदर 2 टक्क्याने कमी होईल असा अंदाज आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत सहा टक्के दराने वाढण्याचा अंदाज होता. आता हा अंदाज कमी करून आता चार टक्के करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूर्ण वर्षासाठी चीनच्या जीडीपी वाढीचा अंदाज घटविण्यात आला आहे. वकेवळ चीनच नव्हे तर  जगभरातील सर्व अर्थव्यवस्थांना मोठे नुकसान सहन करावे लागेल अशी भिती व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला चीन पेट्रोलियम उत्पादनांची सर्वात जास्त विक्री करणारा देश आहे. परंतु, कोरोना व्हायरसमुळे चीनच्या क्रुडची मागणी 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत दोन आठवड्यांत 16 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 20 जानेवारीला कच्या तेलाची किंमत प्रती बॅरल 65.20 डॉलर होती आता ती प्रती बॅरल 55.47 डॉलरवर घसरली आहे. तांब्याच्या किमतीत जवळपास 13 टक्के घसरण झाली. कोरोेना व्हायरसच्या संसर्गापासून शेअर बाजारही वाचू शकले नाहीत. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन सारख्या विकसित देशातील शेअर बाजार याच्या परिणामांमुळे गेल्या महिनाभरात घसरले आहेत. चीनमधील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आला नाही आणि तो अन्य देशांतही पसरल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे 78 लाख कोटी रुपयांचे(1.1 लाख कोटी डॉलर) नुकसान होऊ शकते. या संसर्गाचा चीनच्या अर्थव्यवस्थेसोबत मोठ्या कंपन्यांवरही नकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. अ‍ॅपल या तिमाहीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. एकूणच करोना लवकर आटोक्यात न आल्यास जगावर संकट कोसळू शकते.
---------------------------------------------------------------------

0 Response to "पी.एम. किसानचा बोजवारा / करोना आटोक्यात न आल्यास..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel