-->
एकाकी पडलेला पाक

एकाकी पडलेला पाक

सोमवार दि. 26 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
एकाकी पडलेला पाक
सध्या आन्तरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान एकाकी पडला आहे. मुळात दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तान जे समर्थन गेले दोन दशके करीत आहे त्यामुळे त्यांची बाजू पूर्णत: लंगडी झाली आहे. दहशतवाद्यांना आपली भूमी आंदण म्हणून देत असताना त्यांनी भारताविरोधी कारवायांसाठी ही एक चांगली संधी आहे अशी खूणगाठ बांधून राजकारण केले, परंतु हे राजकारण त्यांच्या एवढे आंगलटी आले की, पाकिस्तानात आता सर्वाधिक बॉम्बस्फोट होताना दिसतात. आपला भारतद्धेश जगजाहिर करताना त्याचा फायदा आपल्याला अमेरिका व चीनकडून होईल हा पाकचा अंदाज सफशेल फोल ठरला आहे. भारताने 370 वे काश्मीरचे विशेषाधिकाराचे कलम रद्द केल्याचे संसदेत जाहीर केले. त्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटावेत व भारताच्या विरोधात आघाडी उभी राहील असा पाकचा अंदाज होता. परंतु हा अंदाज त्यांच्याच आंगलटी आला. यात शेवटी पाकिस्तान जागतिक राजकारणात आता एकाकी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. काश्मिर प्रश्‍न संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या मंचावर आणून त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्याची पाठराखण करणा़र्‍या चीनलाही जगातील इतर राष्ट्रांची भूमिका लक्षात घेऊन पाकिस्तान विरोधी भूमिका घ्यावी लागली. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्‍न हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे व त्याला भारताची संमंत असल्याचे विधान केले होते. परंतु यासंदर्भात भारताने तातडीने खुलासा करुन आपली भूमिका स्पष्ट केली. हा प्रश्‍न दोन्ही देशांनीच सोडवावा व त्यात तिसरा कुणी मध्यस्थ नको ही पूर्वीचीच भूमिका आजही कायम असल्यचे भारताने म्हटले होते. या सर्व प्रकरणात उघडा पडला तो पाकिस्तान आणि त्यांचे पंतप्रधान इम्रान खान. 1972 साली बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळीही पाकिस्तानने अशीच आदळआपट केली होती. त्यावेळीही पाकिस्तानचा मुखभंग झाला होता आणि आताही तेच झाले आहे. इंदिरा गांधींच्या झंझावाताने बांगला देशाची निर्मिती केवळ 14 दिवसात झाली. पाकिस्तान तेव्हाही अशीच आदळ आपट करीत राहिला होता. आज सध्याची ही पाकची आदळआपट पाहिल्यावर त्याची आठवण आल्याशिवाय राहवत नाही. गेली काही वर्षे काश्मीरच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नव्हता व हा प्रश्‍न अधिकच किचकट होत चालला होता. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या मदतीने भारतात अस्वस्थता निर्माण केली जात आहे, हे आता छुपे वास्तव झाले आहे. काश्मीरी तरूणांचे माथे भडकवले जात आहे परिणामी देशाचे हे नंदनवन अशांत करण्यात पाक यशस्वी होतो असे चित्र तयार होत होते. 370 कलम रद्द केल्याने दहशतवादाचा प्रश्‍न सुटणार नाही हे देखील तेवढेच खरे असले तरी भारत आता कोणतेही टोक गाठू शकतो हे यातून पाकला समजले आहे. पाकच्या फूसमुळे व चीनच्या सूचनेनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने 370 कलमाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबत बंद दाराआड चर्चा केली. यात पाकिस्तानला अपेक्षित होती अशी फलनिष्पत्ती काही झाली नाही. प्रसार माध्यमांच्यासाठी निवेदन करावे ही चीनची मागणी होती आणि त्याला ब्रिटननेही उचलून धरले होते. मात्र 15 सदस्य देशांपैकी बहुतांश देशांनी निवेदन जारी करू नये अशी भूमिका घेतली. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या पोलंडने निवेदन जारी करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानचा मुखभंग झालाच, पण चीनलाही अद्दल घडली आहे. जर्मनी, अमेरिका, फ्रान्स आणि रशियाने भारताला पाठिंबा दिला. अमेरिकेप्रमाणेच रशिया, इंडोनेशिया दोन्ही देशांनीच चर्चा करावी अशी भूमिका घेतली. भारताने सिमला करारास आम्ही बांधील आहोत असे सांगून भारताचा मैत्रीचा हात कायम पुढे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. पण यामुळेही पाकिस्तानचे समाधान झालेले नाही. इम्रान खान यांनी ट्विटरवरून पन्नास वर्षात पहिल्यांदाच अशा मोठया मंचावर काश्मिरबाबत चर्चा झाली असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय समुदायाने ना पाकिस्तानच्या खुल्या चर्चेची मागणी स्वीकारली ना भारतावर टीका केली त्यामुळे खर्‍या अर्थाने पाकचा जगात पोपट झाला आहे. पाक जागतिक राजकारणात एकाकी पडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये गेली 70 वर्षे दोन्ही बाजूंनी चर्चा होत आलेली आहे. या चर्चेच्या मर्यादाही दोघांना माहिती आहेत आणि निर्णय करायचा झाला तर या दोन देशांनाच ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. या चर्चातून फारसे निष्पन्न निघत नसले तरीही चर्चा सुरुच असते. शेजारच्या देशाशी संबंध चांगले ठेवण्यासाठी हे आवश्यकच असते. 370 कलम रद्द करुन भारताने अनपेक्षीत आसा धक्का पाकला दिला आहे. हे कलम रद्द करणे हे योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, परंतु आन्तरराष्ट्रीय पातळीवर विचार करताना सरकारच्या निर्णयाच्या बाजूने निश्‍चितच संपूर्ण देश उभा राहील. आता जागतिक पातळीवर हसे करुन घेतल्यावर यातून पाकने धडा घेण्याची गरज आहे. निदान आता तरी अतिरेक्यांना सक्रियपणे पाठिशी घालणे सोडले पाहिजे व आशिया खंडाच्या हिताच्या दृष्टीने विचार करुन निर्णय घेतले पाहिजेत.
---------------------------------------------

0 Response to "एकाकी पडलेला पाक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel