-->
बरबादीचे पाऊल

बरबादीचे पाऊल

शनिवार दि. 19 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
बरबादीचे पाऊल 
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसाठी महाराष्ट्र सरकारने तयार केलेली नियमावली मोडीत काढली असून पूर्वीप्रमाणे आता डान्स बार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर या नियमावलीला आव्हान दिलेल्या अर्जावर राज्य सरकारने ठाम विरोधात भूमिका घेऊन न्यायालयात आपले म्हणणे ठोसपणे मांडण्याची गरज होती. परंतु तसे झाले नाही व डान्स बार विरोधात सरकारने गुळमुळीत भूमिका न्यायलयात मांडल्यानेच आता बरबादीचे पाऊल पुन्हा एकदा पडणार आहे. गेल्या काही वर्षात बंदी घातल्यावर डान्स बार उघडपणे सुरु नव्हते, परंतु अनधिकृतरित्या सुरुच होते. याचा अर्थ पोलिसांना त्याचा हाप्ता सुरु होता. राज्य सरकारने डान्स बार सुरु करण्यासाठी कडक नियम घातले होते, त्याचे त्यावेळी स्वागतही झाले. मात्र या अटी एवढ्या कडक होत्या की त्याआधारे एकही डान्स बार सुरु झाला नाही. मात्र असे असले तरी डान्स बार चोराटी प्रकारने सुरुच होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या अटी शिथील करण्याचे आदेश दिल्याने डान्स बार उघडपणे सुरु होतील. डान्सबारमुळे खेडोपाड्यातील श्रीमंताच्याबरोबरच त्यांच्या आजूबाजूला असणारी सर्वसामान्य तरुण मुलेही बरबाद होत होती. हे वास्तव तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी हेरले. त्यांनी डान्सबारची कीड समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. एक काळ असा होता की, मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये तसेच पेन-पनवेलच्या टप्प्यात डान्सबारचे पेव फुटले होते. संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर परिसर अंधारात बुडाला की डान्सबारचा दिवस सुरू होत असे. झिंगाट म्यूझिकच्या तालावर रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट. कडक-भडक रंगातील कपडे परिधान केलेल्या ललना. मद्याचा ग्लास, सोबत या ललनांचे भडक नृत्य, असा सर्वसाधारणपणे डान्सबारचा दिसणारा मुखवटा होता. यातील ललनांच्यावर होणारी पैशांची उधळण ही त्याची खासियत. यात जसे कंत्राटदार, काळा पैसा कमविणारे सरकारी नोकर, नवश्रीमंत येत तसेच तरुणही याकडे आकर्षित झाले होते. डान्स बारला जाऊन पैसे उधळण्याच्या नशेपोटी अनेकांचे संसार उध्दस्त झाले होते. यातून ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना काही करुन कोणत्याही थराला जात पैसे उधळण्यासाठी गुन्हे केले होते. आपली वडिलोपार्जित जागा विकून त्याची एका रात्रीत उधळण करणारी तरुण पिढी यातून निपजली. एवढेच कशाला पैसे उधळण्यासाठी आपल्या जन्मदात्या आईचाही खून करणारा तरुण गजाआड झाला होता. यामुळे तरुणांची एक पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर होती. दुसरी काळीकुट्ट बाजूही या डान्सबारला होती. येथे काम करणार्‍या बारबालांचे आयुष्य, त्यांच्या व्यथा हे सर्व दर्दभरेच होते. अनेकदा त्यांना परिस्थिती यात लोटत होती. तर यामुळे येणार्‍या पैशातून त्यांना चांगले दिवसही दिसत होते. यामागे थुपा वेश्याव्यवसायही होताच. हे भयाण वास्तव हे डान्सबार बंद करण्याच्या निर्णयासाठी पुरेसे होते. बारबालांच्या समस्या जेवढ्या गंभीर होत्या, त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर अशी परिस्थिती येथे येणार्‍या तरुणांची, त्यांच्या घरादाराची होत होती. हातातोंडाशी आलेली पोरं बरबाद होताना दिसत होती. रोज संध्याकाळी गाड्यातून नोटांचे बंडलच्या बंडल बारमधील ललनांच्यावर उधळण्यासाठी नेण्यात येत. बारमध्ये मद्याचा आस्वाद घेत-घेत या ललनांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडत असे. एका-एका बारमध्ये लक्षावधी रुपयांची उधळण होत असे. येणार्‍या आंबटशौकिनांना एकेका बारबालेचे जणू व्यसन लागलेले असे. ठराविक बारबालेवर अमाप पैशांची उधळण होताना दिसत होती. कष्टाचा पैसा असा बारबालांच्यावर उधळण्यातून बड्या घरांचा वासा हळू-हळू पोकळ होत होता. त्याचबरोबर मदनिका आणि मद्याच्या आहारी गेलेला तरुण आयुष्यातून उठण्याच्या मार्गावर वेगाने पुढे सरकत होता. हे अड्डे गुन्हेगारांचे होत होते. याची धास्ती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना होती. त्यातूनच कोणत्याही परिस्थितीत हे कुठेतरी थांबलेच पाहिजे, यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली आणि डान्सबार बंदीचा 2005 साली निर्णय घेतला. परंतु या कायद्याचा किस काढत व यातून पळवाटा काढत बार मालकांनी आपला हा गोरखधंदा कायम टिकावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले. कधी शासनयंत्रणा तर कधी मागच्या दरवाजाने सत्ताधारी असे या बार मालकांना मदत करीत होते. आता देखील सत्ताधार्‍यांनी मागील दरवाजाने बार मालकांना मदत केल्याचा जो आरोप होतो आहे त्यात तथ्य आहेच. डान्स बारचे समर्थन करणारे नेहमी याविषयी बोलतात की, या बारमध्ये यावे की येऊ नये हा ज्याचा त्याच वैयक्तिक प्रश्‍न आहे. यापूर्वीही देशात वेश्याव्यवसाय, मुजरा हे चालत होतेच. परंतु त्याच्यावर डान्स बारसारखी कधीच टिका झाली नाही. प्रश्‍न एवढाच होता की, या बार मध्ये जावे की न जावे हा ज्याचा त्याच वैयक्तीक प्रश्‍न होता. परंतु याच्या नशेपोटी अनेक संसार उध्दस्त झाले त्याची दखल घेणे आवश्यकच होते. ज्यावेळी एखादी बाब समाजविघातक ठरते त्यावेळी त्यावर बंदी घालणे आवश्यकच ठरते. आपल्याकडे अजून ते़वढी जनतेत जागृती नाही, आपण कोणत्या मर्यादा पाळाव्यात याचे भान नाही हे दुर्दैवच आहे. त्यामुळे डान्स बारवर बंदी आवश्यकच होती.
------------------------------------------------------------------

0 Response to "बरबादीचे पाऊल "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel