-->
नवी घोषणा, नव्या थापा...

नवी घोषणा, नव्या थापा...

बुधवार दि. 12 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
नवी घोषणा, नव्या थापा...
भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अजेय भारत, अटल भाजपा ही घोषणा देऊन आगामी पाच राज्यांच्या विधानसभा व लोकसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गेल्या वेळी कॉग्रेस सरकारच्या महागाई, काळा पैसा, बेकारी या प्रश्‍नांवर बोट ठेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. परंतु या सरकारने गेल्या चार वर्षात दिलेल्या आश्‍वासनांविषयी एकाचीही पूर्तता या सरकारने केलेली नाही. त्याचा कोणताही हिशेब न देता पुढील निवडणुकीसाठी नव्या घोषणा म्हणजे नव्या थापा मारावयास सुरुवात केली आहे. मोदी व शहा जोडगोळीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आगामी पाच वर्षासाठी पक्षाचे सर्वाधिकारी म्हणून मान्यता दिली आहे. त्यासाठी भाजपाने अध्यक्षांच्या निवडीचे सर्व संकेत दूर केले आहेत. भाजपात असा ठराव होणार हे स्पष्ट दिसत होते. आता एकूणच मैदानाची रणधुमाळी,सत्तासंघर्षाची तुतारी वाजली आहे. एकेकाळी अवघ्या दोन खासदारांचा हा पक्ष वाढता-वाढता केंद्रात स्वबळावर सत्तेत आला हे मोठे यश आहे. यासाठी मोदी व शहा यांनी जशी व्यूहरचना केली तसेच कॉग्रेसचाही नकर्तेपणा व त्यांच्यात सत्तेमुळे आलेली ढिलाई कारणीभूत होती. तसेच कॉग्रेसने जातीयवादी शक्तींना कमी लेखले होते. कॉग्रेस विरोधी जनमानसात असलेली हवा या दोघांनी शिडात भरुन घेतली व ते सत्तेत आरुढ झाले. नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी भाजपाचे राष्ट्रीय राजकारण ताब्यात घेतले तेव्हाही नवा-जुना, ज्येष्ठ-नवे असा संघर्ष दिसत होता. परंतु मोदींनी अडवाणी-जोशींसारख्या अनेक पक्षातील जुन्या जाणत्यांना घरी बसलविले, त्यात त्यांना सन्मानाने घरी बसविले नाही हे दुर्दैव होते. मात्र मोदी निष्ठूपणे कसे वागू शकतात हे पक्षातील जुन्यांना बाजूला करताना दिसले. आता तर पक्ष व सरकार पूर्णपणे मोदी व शहा हेच चालवितात. त्यांना यात एकाधिकारशाही चालते. यासंबंधी कधीतरी कुजबुज पक्षात होते, मात्र आवाज उठविला जात नाही. यसवंत सिन्हा, शत्रुघन सिन्हा यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडगळीत टाकण्यात आले. अशा प्रकारे या दोघांची पक्षात हकूमशाहीच आहे. आता देखील हे पुन्हा पक्षाला सत्तेवर आणतील या आशेवर राहून त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. खरे तर पक्षाच्या अधिवेशनात कॉग्रेससह विरोधी पक्षांचा उध्दार करण्याची भाजपाच्या नेत्यांना गरज नव्हती, परंतु आधिवेशनात त्याप्रमाणे झाले आणि सर्वांनी काँग्रेसला व काँग्रेस मित्रांना लक्ष्य करून टीकेची झोड उठवली. अजेय भाजप अशी गर्जना करण्यात आली. काँग्रेस महाआघाडी ही धूळफेक आहे. भाजप नवनिर्माणातून देश जोडतो आहे तर काँग्रेस तोडफोड करतो आहे अशा शब्दात अमित शहा, निर्मला सीतारामन वगैरेंनी हल्लाबोल केला. अलीकडेच शरद पवार, राहुल गांधी, लालू यांच्यासहे डावे व सर्वधर्मसमभाव मानणार्‍या छोट्या-मोठ्या पक्षांना एकत्र करून भाजपाविरोधी महाआघाडी करायची व्यूहरचना करण्यात आली आहे. प्रामुख्याने कर्नाटकातील यशानंतर विरोधकांचे यासंबंधी बळ वाढले होते. कधी नव्हे ते मायावती-अखिलेश हे देखील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. कर्नाटकात या नव्या समीकरणानुसार महाआघाडीने भाजपाच्या तोंडचा घास पळवला होता. हाच प्रयोग आगामी काही राज्याच्या विधानसभा व मार्च 19 मध्ये होणाऱया लोकसभेच्या निवडणुकीत करावयाचा अशा मनसुब्याने विरोधक एकवटत आहेत. अमित शहा हे एखादी कंपनी चालविल्याप्रमाणे भाजपा चालवित आहेत. भाजपाने व मोदी-शहा जोडीने 24 तास 365 दिवस राजकारण आणि त्यावर नजर ठेवूनच काम, निर्णय, घोषणा करण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्यक्षात जनतेची कामे मात्र काहीच होत नाही. फक्त प्रचारकी थाट सुरु आहे. पक्षाची वॉर रूम, सोशल मीडिया सेल, प्रसार माध्यमात चर्चा-वाद, संघटनात्मक बांधणी, जातीय समीकरणे असे अनेक विषय सदासर्वकाळ प्राधान्य देऊन हाताळले जातात आणि भाजपा त्यात सर्व गणिते व्यवस्थित जुळविली आहेत. मोदी सरकारने पाच वर्षापूर्वी सत्तेवर येताना दिलेल्या अनेक आश्‍वासनांची पूर्ती झालेली नाही. इंधनाचे चढे दर, भडकती महागाई, वाढती बेरोजगारी व आतबट्टयाची शेती यामुळे समाजातील अनेक घटक अस्वस्थ आहेत. ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा असली तरी त्यांची तळागाळापर्यंत अनुभूती येत नाही. देशात सध्या आरक्षण आणि बेरोजगारी व शेती-शेतकरी दुरवस्था हे कळीचे विषय आहेत. गेल्यावेळी भाजपाला लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. जनतेची फसवणूक झाल्याची भावना आहे. त्यामुळे नकारात्मक मते यावेळी जास्त आहेत. त्याचबरोबर गेल्या वेळी भाजपाला फक्त 31 टक्के मते पडली होती. यावेळी विरोधक एकत्र आल्याने भाजपाला विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा मिळणार नाही. पंधरा वर्षापूर्वी भाजपाने शायनिंग इंडियाचा नारा देऊन अशी हवा तयार केली होती. सर्व माध्यमे त्यावेळी खिशात घातली होती. असे असले तरी कॉग्रेसच सत्तेत आली. आता देखील मोदी भक्त वगळता जनता या सरकारवर नाराज आहे. आता देखील अजेय भारत, अटल भाजपा ही घोषणा फोल ठरणार आहे. अटलजींच्या नावाने भाजपाला मते मिळणार नाहीत, हे नक्की. आताची ही नवी घोषणा म्हणजे, नव्या थापांची नांदी ठरणार आहे. जनतेने गेल्या वेळच्या घोषणांचे काय झाले याचा जाब विचारण्याची हीच योग्य वेळ आहे. केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी या पलिकडे काहीच केलेले नाही.
-------------------------------------------------------- 

0 Response to "नवी घोषणा, नव्या थापा..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel