-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
उशीरा घेतलेला पण स्वागतार्ह निर्णय
---------------------------------------------
गेले पाच वर्षे झोपी गेलेले राज्यातील राष्ट्रवादी-कॉँग्रेसचे आघाडी सरकार आता निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्षम झाल्याचे दाखवित एक एक महत्वाचे निर्णय घेत आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सरकराला जाग येणे स्वाभाविक आहे. गेल्या दोन महिन्यात सरकारने ज्या जलद गतीने विविध निर्णय घेतले आहेत ते पाहता हे सरकार जर गेली साडेचार वर्षे काम करीत राहिले असते तर राज्यातील चित्र बदलले असते. असो. नुकताच मच्छीमार आणि त्याअनुषंगिक इतर कामगारांसाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या संदर्भातील अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्याची माहिती कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी दिली. राज्यातील गोरगरीब आणि कष्टकरी मच्छीमारांच्या हितासाठी राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील सर्व मच्छीमार आणि या व्यवसायावर आधारित इतर कामगारांना मोठा फायदा होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र मच्छीमार उद्योगातील मच्छीमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ, असे या मंडळाचे नाव असणार आहे. संपूर्ण राज्यातील मच्छीमारी करणे, मासे गोळा करणे, त्याची भराई, उतराई, मासे साफ करणे, साठवणूक करणे, वाहून नेणे, तोलणे, मापन करणे, सुकविणे अशा कामांशी संबंधित असणार्‍या रोजगारासाठी हे मंडळ कार्य करेल. अशी कामे करणार्‍या असंरक्षित कामगारांच्या नोकरीच्या अटी व शर्तींसाठी चांगल्या तरतुदी करणे, तसेच त्यांच्या कल्याणासाठी योजना आखणे, ही या मंडळाची उद्दिष्टे असणार आहेत. मच्छीमारीच्या कामावर असलेल्या कामगारांसाठी आरोग्य व सुरक्षिततेचे उपाय योजणे, कामगारकल्याण निधी उभारणे व त्याचे व्यवस्थापन करणे, भविष्य निर्वाह निधी आणि उपदान निधीची तरतूद करणे, आदी कामे या मंडळामार्फत राबविण्यात येतील. या योजनांच्या लाभासाठी मंडळामार्फत मच्छीमार कामगार आणि मालकांची नोंदणी केली जाईल. नोंदणीकृत कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येतील. नोंदणी झालेल्या प्रत्येक कामगाराला मंडळामार्फत ओळखपत्र, उपस्थितिपत्र व वेतनचिठ्ठी देण्यात येईल. मंडळासाठी अध्यक्ष, सचिव, कार्मिक अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग असेल. मंडळासाठी लागणारा निधी हा मालकांकडून लेव्ही मार्गाने जमविला जाईल. मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मोठ्या भागाला समुद्रकिनारा लाभला आहे. या भागातील म्हणजे कोकणातील अनेक लोकांचे मच्छीमारी हे उपजीविकेचे साधन आहे. राज्याच्या इतर भागांतही तलाव, नद्या आदी ठिकाणी मच्छीमारी हा मोठा व्यवसाय आहे. पण या व्यवसायात काम करणार्‍या कामगारांची आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती हलाखीची आहे. अनेक महिलाही या व्यवसायात असून, त्यांचेही जीवन मोठे कष्टमय आहे. हा समूह असंघटित असून, त्यांच्यासाठी मंडळ स्थापण्याचा शासनाचा मानस होता. त्या दृष्टीने मच्छीमारांचे, तसेच त्या आनुषंगिक काम करणार्‍या कामगारांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मच्छीमारांचे स्वतंत्र मंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळामार्फत मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाईल. सरकारने उशीरा का होईना राज्यातील एका मोठ्या घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता या मंडळाला पुरेसा निधी भविष्यात उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मासेमारी हा अजूनही एक लहान व्यवसाय म्हणून आपल्याकडे केला जातो. यातील अनेक मच्छिमारांचे दिवसावर पोट अवलंबून असते. यातील मच्छिमारी करणार्‍या कंपन्या या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा आहेत. त्यामुळे आपल्याला अजूनही मोठ्या संख्येने रोजंदारीसारखा व्यवसाय करणार्‍या मच्छिमारांचे हीत बघणे आवश्यक आहे. सरकारने आता स्थापन केलेले हे मंडळ सर्वसामान्य मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करील अशी अपेक्षा करुया.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel