-->
फ्रान्सची विश्‍वषकावर मोहर

फ्रान्सची विश्‍वषकावर मोहर

मंगळवार दि. 17 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
फ्रान्सची विश्‍वषकावर मोहर
संपूर्ण युरोपाला वेड लावणारा व इतिहासापासून ते सध्याच्या काळातील परस्परांची उणीदुणी काढणार्‍या फुटबॉलचा विश्‍वचषक अखेर फ्रान्सने जिंकून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. त्यातच दुसर्‍या क्रमाकांवर आलेल्या क्रोएशियाने तर फुटबॉलमध्ये मारलेली धडक अविस्मरणीय ठरली आहे. आपल्याकडे जसे क्रिकेटच्या सामन्यात किंवा क्रिकेटच्या विश्‍वचषकात देश हरवून जातो त्याहून जास्त नशा याविश्‍व चषकात युरोपात असते. संपूर्ण युरोप दोन वर्षातून एकदा महिनाभर केवळ फुटबॉलमय झालेले असते. युरोपात किती वाद असले तरी फुटबॉलने परस्परांना एकसंघ बांधून ठेवले आहे, हे देखील तेवढेच खरे. निर्वासीत व अल्पसंख्यांकांमुळे तणावग्रस्त असलेला फ्रान्स आणि गृहयुध्दामुळे होरपळलेल्या क्रोयेशियातील फुटबॉलच्या मैदानात रंगलेली लढाई ही हार-जीतच्या पलीकडे जाणारी ठरली. आपल्याकडे क्रिकेटचे वेड हे ब्रिटीशांनी लावले. केवळ आपल्याला नाही तर जिकडे त्यांची सत्ता होती तिकडे सर्वच देशात त्यांनी हा खेळ लोकप्रिय केला. ब्रिटीशांनी त्यामुळे केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण कॉमनवेल्थ देशांना या खेळाची देणगी दिली. परंतु ज्या ब्रिटीशांनी हा खेळ आपल्या सत्ता असलेल्या देशांना शिकविला त्यांनी आता मात्र आपल्या या खेळातील गुरुला यात धूळ चारली आहे. अर्थात खेळ यालाच म्हणतात. मात्र या क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे आपल्या देशात अन्य खेळांचे महत्व कमी झाले हे खरे असले तरीही आता आपल्याकडे फुटबॉलची लोकप्रियता वाढत आहे हे देखील तेवढेच खरे. जगात गेले महिनाभर चाललेल्या या खेळात करोडो लोक आपल्या नजरा टी.व्ही. समोर रोखून होते, त्यात भारतीयही होते, ही एक आनंदाची बाब आहे. मुळात फुटबॉल हा तसा रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो. मैदानावरील धुसमुसळेपणा आणि स्टेडियममधील हुल्लडबाजीमुळे अनेकदा हा खेळ टिकेचा विषय झालेला आहे, हे देखील तेवढेच खरे. परंतु, युध्दात व प्रेमात जसे गुन्हे माफ असतात त्याप्रमाणे खेळात देखील असे गुन्हे माफ असतात. युरोपात या निमित्ताने वर्णव्देशही उफाळून आलेला दिसतो. अगदी युरोपातील पुरोगामी म्हटले जाणाले लोक व पक्षही त्याला अपवाद नव्हते, हे विसरता येणार नाही. परंतु एक बाब या खेळात लक्षात घेतली पाहिजे की, येथे शून्यातून आलेले संघ अनेकदा विजयी ठरले आहेत. येथे एकाच संघाचे फारसे वर्ष वर्चस्व टिकत नाही, त्यामुळे यात आणखी रंगत वाढत जाते, हे ही तेवढेच खरे. या खेळात पेलेपासून ते कोणताही खेळाडू घ्या, तो देखील घरचा श्रीमंत नसताना त्याने केवळ जिद्दीच्या बळावर या खेळावर आपली मोहोर उमटवलेली आहे. असे अनेक डझनभर खेळाडू आपल्याला या यादीत सापडतील. पेले हे त्यातील जगनमान्य नाव. देशांतर्गत रक्तरंजीत वेदनांनी कण्हत असतानाच 1998च्या विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरी क्रोयेशिया पोहचला तेव्हा एक चमत्कार असल्याचे बोलले जात होते. आज दोन दशकानंतर याच चमत्काराने पुन्हा एक नवा उच्चांक गाठला आहे, भले ते व़िश्‍वचषक विजेत ठरले नाहीत, परंतु त्यांनी त्याचे दार ठोठावले हे महत्वाचे आहे. जेमतेम 40 लाखांवर लोकसंख्या असणार्‍या आणि फुटबॉलच्या फारशा पायाभूत सुविधा नसतांनाही तसेच अजूनही देशात अनेक आर्थिक, राजकीय अडचणी आ वासून उभ्या असताना या संघाची ही भरारी आश्‍चर्यकारक अशीच आहे. यामुळे भारतात फुटबॉलसाठी सुविधा नसल्याची ओरड करणार्‍यांनी यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. विश्‍वचषक फुटबॉलची लोकप्रियता बर्‍याच अंशी राष्ट्रीय अस्मितेशी निगडीत आहे. आणि ब्रेक्झिटच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंड उपांत्य फेरीत पोचल्यावर हा राष्ट्रवादी ज्वर किंवा उन्माद आयकिया ह्या स्वीडिश फर्निचरच्या एका दुकानात शिरून मोडतोड करून थोडा स्वस्थ झाला. क्रिकेटप्रमाणे फुटबॉलचा उगमही इंग्लंडमधला, आता युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यावर इंग्रजी साम्राज्याचे गतवैभव परत येईल तसा फुटबॉलचे जेतेपदही येईल अशी वेडी मानसिकता तयार करण्यात आली होती. त्यातून मग स्कॉट, वेल्श इ. इतर राष्ट्रकांची खिल्ली उडवणे वगैरे नेहमीचे प्रकार सुरु झाले. नंतर क्रोएशियाने इंग्लंडला हरवल्यानंतर कर्णधार मोड्रीच याने इंग्रजी पत्रकारांनी केलेला माज आणि क्रोएशिया दुबळा संघ आहे वगैरे केलेल्या दर्पोक्तीवर कडक टीका केली. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका येथील संघ, खेळाडू यांना अनेकदा अशी वागणूक मिळत आली आहे. मात्र लोकांशी जोडून घेणे आणि लोकानुनय यातला फरक न केल्यामुळे इंग्लंड जर विश्‍वचषक जिंकला तर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी भूमिका कॉर्बीन यांच्या मजूर पक्षाने घेतली होती. आता या सार्वजनिक सुट्टीचा अर्थ जाहीर दारू पिऊन धिंगाणा करण्याची उजव्या अतिरेकी राष्ट्रवादी धटिंगणाना सूट देणे असा होतो हे सर्वज्ञात असूनही अशी भूमिका घेणे हे विवेक सुटल्याचे लक्षण आहे. अर्थात यात कॉर्बीन एकटेच नाहीत. फ्रेंच डाव्यांचे नेते मेलेन्चोन यांनी आधी फुटबॉल ही अफूची गोळी असल्याची भूमिका घेतली होती. पण जर्मनी बाद झाल्यानंतर आनंद साजरा करत त्यांनी वक्तव्य केले मानशाफ्ट (जर्मन राष्ट्रीय संघ) बाद झाला ह्याचा मला निखळ आनंद आहे. मी फुटबॉलशिवाय कसा राहू शकेन? जर डाव्यांची ही स्थिती आहे तर उजव्या राष्ट्रवादी उन्मादाची कल्पनाच न केलेली बरी. (अर्थात आपल्याकडचा खेळपट्टी उखडणे, स्वतःच्या संघाने मिळवलेले चषक तोडणे, कॅम्पसवर विद्यार्थांना मारहाण करणे, दंगली करणे असा दीर्घ इतिहास परिचित आहेच). या फुटबॉलच्या निमित्ताने एक प्रकारे युरोपात धर्मयुध्द खेळले गेले, त्यातून वांशिक उन्मादही उफाळून आला, हे सर्वात धोकादायक म्हटले पाहिजे.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "फ्रान्सची विश्‍वषकावर मोहर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel