-->
इतिहासातील खपल्या / महिला असुरक्षीत

इतिहासातील खपल्या / महिला असुरक्षीत

गुरुवार दि. 28 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
इतिहासातील खपल्या
प्रत्येक देशाच्या इतिहासात असलेल्या खपल्या उकरुन काढणे हा शहाणपमा नसतो. कारण त्यातून प्रश्‍न सुटन नसतात, उलट उगाचच गाढलेली भूते उकरुन काढून त्यांना पुन्हा मानगुटीवर घेण्याचा हा प्रकार ठरतो. परंतु कॉग्रेस गाडायला निघालेल्या आपल्या पंतप्रधानांना इतिहासातील ही भूते उकरायची नसतात एवढेही भान राहिले नाही व त्यांनी आणीबाणीसारख्या एका संवेदनाक्षम इतिहासात डोकावले. अर्थातच सध्याच्या काळात याची आवश्यकता नव्हती. सध्या तो प्रश्‍न देखील गरजेचा नाही. परंतु सध्या जनतेपुढे असलेल्या प्रश्‍नांची दखल घेऊन त्याची सोडवणूक करणे गरजेचे ठरते. मात्र ती उकल करु न शकत असल्यामुळे मोदी व भाजपाला इतिहासातील ही भूते उकरावी लागत आहेत. सर्वात गंमतीचा भाग म्हणजे, आणीबाणीवरील आपल्या भाषणाचा शेवट करताना लोकतंत्र अमर रहे, ही घोषणा दिली. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह नागरिकांनाही त्यांनी ही घोषणा देण्यास सांगितले. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आठवणी जिवंत ठेवण्यासाठी अमर रहे ही घोषणा दिली जातेे. त्यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा मृत्यू झाला आहे का? असा प्रश्‍न सोशल मिडियात जोरदार चर्चीला गेला. मोदी एक महत्वाची बाब विसरतात की, आणीबाणी ही घटनेनी दिलेली विशेष तरतूद आहे. त्याच घटनेची पायमल्ली करण्यात आलेली नाही. आणीबाणी आवश्यक होती का, या चर्चेचा मुद्दा असू शकतो, परंतु आणीबाणी लादून घटनेची पायमल्ली करण्यात आलेली नाही. आणीबाणीचा लढा हा देशातील राजकारण्यांनी म्हणजे त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या वैचारिक मुस्कटदाबीच्या विरोधातील होता. इंदिरा गांधींनी सत्ता टिकवण्यासाठी स्वातंत्र्य नाकारणारी आणीबाणी लादली. राज्यकर्त्या म्हणून इंदिराजींमध्ये असामान्य गुण होते पण आणीबाणीमुळे त्या सामान्य सत्तालोभी राजकारणी ठरल्या. त्यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बंगालला स्वातंत्र्य मिळवून दिल्याने त्यांची प्रतिमा जगात लख्खपणे उजळली होती. इंदिरा गांधी यांनी अचानक आणीबाणी मागे घेण्याची घोषणा केली व निवडणुका घेतल्या. याचा अर्थ त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास होता. त्या हुकूमशहा नव्हत्या. आणीबाणीचे त्याकाळी जसे कडवे विरोधक होते तसे तेवढेच कट्टर समर्थकही आपल्याला पहायला मिळतात. ब्रिटीशांविरोधी असलेला स्वातंत्र्यलढा हा सर्व समाजातील उत्सुर्फ लढा होता. त्यात देशातील सर्व समाज, सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते. आणीबाणीला शिवसेनेने विरोध केला नव्हता. त्यामुळे शिवसेना नेहमीच विषयावर मूग गिळून असते. तत्कालीने सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा देऊन माफी मागितली होती, हे वास्तव संघवाले कधी सांगत नाहीत. आज देखील पंतप्रधांनी कोणाचा विरोध व कोणाचा पाठिंबा होता, त्यामागची कारणे काही सांगितली नाहीत. फक्त कॉग्रेस किती याव्दारे वाईट आहे तेवढे सांगितले. आणीबाणीच्या अगोदर देशात असलेली अराजकाची स्थिती सांगण्याचे त्यांनी टाळले. कारण जर ती स्थीती जनतेला समजली तर आणीबाणीचा विरोध कमी होऊ शकतो. अशा प्रकारे पंतप्रधानांनी अर्धसत्य जनतेपुढे ठेऊन नेहमीप्रमाणे थापा ठोकल्या आहेत. आता आणीबाणीला चार दशके झाली आहेत. आजच्या तरुण पिढीला आणीबाणाचे काही देणेघेणे नाही. त्यांना सध्याच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची अपेक्षा आहे. ती अपेक्षा त्यांनी पहिल्यांदा पूर्ण करावी नंतर इतिहासातील खपल्या काढाव्यात.
महिला असुरक्षीत
भारत हा महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी युद्धग्रस्त सीरीया आणि अफगाणिस्तानापेक्षाही असुरक्षित देश आहे. 550 विशेषज्ञांच्या टीमने हे सर्वेक्षण केलेले आहे. या यादीत अमेरिकाचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये अमेरिकेचा तिसरा क्रमांक आहे. 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगाणिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश सर्वांत असुरक्षित मानले गेले होते. परंतु, यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्‍न पाहून यावेळी भारताला सर्वांत असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
भारत मानव तस्करी करण्यात आणि महिलांना सेक्स व्यवसायासाठी परावृत्त करण्यात अव्वल आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या सर्वेच्या अहवालावर बोलण्यास नकार दिला आहे. परंतु गेल्या काही वषार्र्त महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर ज्या अत्याचाराच्या घटना झाल्या त्या अंगावर काटा आणणार्‍या आहेत. यातील काही घटना या धर्मांधतेशी निगडीत असल्याने त्या सर्वात धोकायदायक आहेत. त्यामुळे ते केवळ साधे गुन्हे नाहीत तर त्याच्यापुडे जाऊन त्याचा धार्मिकतेशी संबंध होता. त्यामुळे समाज यातून दुंभगण्याचा धोका आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, महिलांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. केवळ कायद्याच्या धाक्यातून हा प्रश्‍न सुटणारा नाही तर त्यासाठी महिलांकडे समानतेच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले पाहिजे. महिलांना कनिष्ट म्हणून पाहिले, वागविले जाते व त्यातून या गुन्ह्यांचा जन्म होतो. या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन सोडविला पाहिजे.
--------------------------------------------------------------- 

0 Response to "इतिहासातील खपल्या / महिला असुरक्षीत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel