-->
कुठे चाललो आहोत आपण?

कुठे चाललो आहोत आपण?

रविवार दि. 07 जानेवारी 2018 च्या अंकासाठी लेख- 
------------------------------------------------
कुठे चाललो आहोत आपण?
------------------------------------------
एन्ट्रो- भीमा-कोरेगावच्या हिंसाचाराच्या निमित्ताने भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व निर्विवादपणे पुढे आले आहे. त्यांनी अकोल्यात बहुजनांचा सोबत घेऊन जिल्ह्यात सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. मायावतींने जे उत्तरप्रदेशात एकेकाळी केले होते तोच प्रयोग त्यांनी जिल्हा पातळीवर केला व त्यात त्यांना यश मिळाले. आता या निमित्ताने प्रकाश आंबेडकर सर्व डाव्या व समविचारी पक्षांची मोट बांधून हा प्रयोग राज्यात यशस्वी करतील का, याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत...
------------------------------------------
भीमा-कोरेगावचा हिंसाचार सुरु असताना एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पाच-सात वर्षाचा एक मुलगा दोन्ही हातात दगड घेऊन हल्ला करण्यासाठी चालत होता. हे आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले आहेत... मी बाबासाहेबांना भेटायला चाललो आहे... हे लोक आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले आहेत...असे तो आपल्या बाल बुध्दीनुसार, सांगत होता. अर्थात हा व्हिडीओ पाहिल्यावर मनात असा विचार आला, आपण तरुण पिढीला हातात दगड घेऊन आपल्यावरील हल्ला परतविण्याचे हे काय मनात भरुन देत आहोत. यातून त्यांची मानसिकता कशी घडणार आहे? जातीपातीच्या बंधनातून आपण कधी मुक्त होणार असा महत्वाचा सवाल आहे. याच जातीने आपल्या समाजव्यवस्थेला पूर्णपणे पोखरुन टाकले. आता एकीकडे आधुनिकीकरणाची कास धरली असताना समाजात दुफळी माजविणार्‍या या जातीव्यवस्थेला आपण फेकून देणार आहोत किंवा नाही? इतिहास हा नेहमी विजेत्यांच्या बाजूने लिहला जातो. पराजितांचा इतिहास लिहीला जात नाही, हे जगाचे वास्तव आहे. त्यामुळे इतिहासाचे वाचन करताना त्यातील सर्व अंगांचा अभ्यास करुन त्यातून निष्कर्ष काढावा लागतो. अन्यथा त्यातून अनेकांची मने दुखावली जातात व त्यातून अनेक दुष्परिणाम घडतात. इतिहासातील घटनांचे मूल्यमापन कसे केले जाते त्यानुसार इतिहास हा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सांगितला जातो. त्यात अनेकदा अनेक बाबी रंगवून सांगितल्या जातात, खोट्या गोष्टीही सांगितल्या जातात व खर्‍या गोष्टींचेही योग्य मूल्यमापन केले जात नाही. असे असले तरीही इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी असतो, परंतु त्याची विकृतरित्या तोडमोड करुन जनतेपुढे मांडल्यास दंगली उसळू शकतात. सध्या कोरेगाव-भिमा येथील लढाईच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने झालेल्या हिंसाचाराचे हे प्रकरण याचे नेमके उत्तम उदाहरण ठरावे. समाजात दुफळी निर्माण करुन आपली सत्ता चालविण्याचा कार्यभाग यातून साधला जात आहे. सध्या राज्यापुढे अनेक महत्वाचे प्रश्‍न असताना याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सरकारला हे उत्तम हत्यार मिळाले आहे. अर्थात हा स्मृतिदीन काही यंदाच साजरा केला जात नाही तर, गेली कित्येक वर्षे येथे दलित बांधव जमून मानवंदना देत असतात. यावेळी तर 200 वे वर्ष असल्यामुळे येथे मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होणार हे प्रशासनाला माहित नव्हते का, जर माहित होते तर पुरेसा बंदोबस्त का ठेवला गेला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना एक वेगळाच चेव आल्यासारखा दिसत आहे. आपले म्हणणे हेच खरे आहे, अन्य लोकांना आपले मत मांडण्याचाही अधिकार नाही असे त्यांना वाटू लागले आहे. यातूनच या संघाच्या छत्राखालील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अर्थातच सत्ताधार्‍यांना या हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. या घटनेचे पडसाद तपासण्यापूर्वी इतिहासातील ही घटना नेमकी काय आहे ते पाहिले गेले पाहिजे. कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इ.स. 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर पेशवाईंच्या मराठा साम्राज्याच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीचे 500 महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशव्यांच्या सैनिकांत बहुतांश मराठा सैन्य होते, तसेच अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या मराठा साम्राज्याचा अस्त झाला. कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 20 शहिद व 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते.
आता देशद्रोही दलितांना उच्च वर्णीयांविरुध्द भडकावत आहेत आणि इंग्रजांना मदत केली म्हणून उच्चवर्णीय दलितांना गद्दार ठरवत आहेत. याबरोबर आणखी एक घटना पाहिली पाहिजे व ती म्हणजे, वडू या गावी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे व त्याला मोठा इतिहास आहे. संभाजी महाराजांचा छळ करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत देहाचे तुकडे करुन विटंबना करण्यात आली होती. त्यांच्या मृत देहाचे अंतिम संस्कार केले जाऊ नयेत यासाठी तसे करणार्‍यास देहदंडाची शिक्षा ठोठाविण्याचे जाहीर झाले होते. असे असतानाही वडू गावच्या गौतम गायकवाड या महार समाजातील तरुणाने संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे जमा केले व त्यांना शिवून सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले व तेथेच त्यांची समाधी उभारली होती. गौतम गायकवाड यांच्या या राजनिष्ठेबद्दल त्यांच्या पश्‍च्यात गावकर्‍यांनी त्यांची समाधी उभारली. मात्र सध्याच्या जातियवाद्यांना हा इतिहास फुसायचा आहे व आपल्या सोयिस्कर इतिहासाची फेरजुळवाजुवळ करावयाची आहे. त्याचाच एक भाग म्हणून गौतम गायकवाड यांची समाधी उखडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात तीन जमांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली. या घटनेच्या सुत्रधारांनीच भीमाकोरेगाव येथे दगडफेक करुन जाळपोळ केली. अशा प्रकारे जातीजातीमध्ये विष पेरुन समाजाव्यवस्था बिघडविण्याचे काम याव्दारे केले जात आहे. या निमित्ताने भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व निर्विवादपणे पुढे आले आहे. त्यांनी अकोल्यात बहुजनांचा सोबत घेऊन जिल्ह्यात सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. मायावतींने जे उत्तरप्रदेशात एकेकाळी केले होते तोच प्रयोग त्यांनी जिल्हा पातळीवर केला व त्यात त्यांना यश मिळाले. आता या निमित्ताने प्रकाश आंबेडकर सर्व डाव्या पक्षांना व समविचारी पक्षांची मोट बांधून हा प्रयोग राज्यात यशस्वी करतील का, याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.
--------------------------------------------------------------------

0 Response to "कुठे चाललो आहोत आपण?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel