-->
राजकारणात रजनीकांत

राजकारणात रजनीकांत

बुधवार दि. 03 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
राजकारणात रजनीकांत
महाराष्ट्रात जन्मलेल्या व दक्षिणेतील चित्रपट ससिकांच्या गळ्यातील ताईत शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांनी अखेर राजकारणात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपात किंवा अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाने रजनीकांतसारखा हिरो आपल्या पक्षात यावा यासाठी बरीच फिल्डिंग लावली होती. परंतु रजनीकांत काही बधले नाहीत व त्यांनी आपला स्वत:चा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. रजनीकांत हे तामीळनाडूतील जनतेचे हिरो आहेत, त्यामुळे त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्याचा राजकारणात त्यांना फायदा होतो किंवा नाही हा मुद्दा नंतरचा, परंतु रजनीकांत यांच्या प्रवेशामुळे अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडून आगामी निवडणुकीत राज्यातील सत्ता हस्तगत करण्याच्या भाजपाच्या स्वप्नाला मात्र सुरुंग लागला आहे एवढे मात्र नक्की. पुढे चालून जर रजनीकांत भाजपाच्या आघाडीचे घटक झाले तर तामीळनाडूत त्यांच्या बरोबरीने भाजपा आपले काही प्रमाणात बस्तान बसवू शकतो. आंध्रप्रदेशात एन.टी.रामाराव यांनी असाच चित्रपटसृष्टीला रामराम करुन असाच राजकारणात प्रवेश करुन सत्ता हस्तगत केली होती, त्या प्रसंगाची आता आठवण झाल्याशिवाय रहात नाही. गेल्या वर्षीपासून रजनीकांत यांनी आपल्या राजकारण प्रवेशाची नांदी सुरु केली होती. त्यांच्या चाहात्यांची जी राज्यभर 800 मंडळे आहेत त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या भेटी घेणे, आम जनतेला भेटून त्यांच्या सोबत फोटो काढणे ही प्रक्रिया सुरुच होती. त्यांचे दर्शन हजारो लोक रांगेत उभे राहून घेत होते. 31 डिसेंबरला हे कार्यक्रम आटोपल्यावर रजनीकांत यांनी आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली. यातून तामीळनाडूच्या राजकारणाला कलाटणी मिळणार हे नक्की. रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश हा अतिशय एका महत्वाच्या टप्प्यावर झाला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तामीळनाडूत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जयललितांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाला फुटीने ग्रासले आहे. अशा वेळी अण्णाद्रमुकला सध्या असलेले शशिकला यांचे नेतृत्व जयललितांची पोकळी भरुन काढू शकत नाही व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची कुवतही नाही. अशा वेळी रजनीकांत यांनी बरोबर राजकारण प्रवेशाचे टायमिंग जुळविले आहे. जयललिता यांची जनसामान्यातील प्रतिमा अतिशय एका महान व्यक्तीमत्वाशी तुलना करावी अशीच आहे. हिरो म्हणून रोल करताना तो जो मेकप करतो तो मेकप तो कायम ठेवत नाही. जनसामान्यात वावरताना तो मेकप काढून मिसळतो, त्यावेळी आपल्या टोक्याला टक्कल पडले आहे तरी त्याला त्याची काही लाज वाटत नाही. त्यामुळेच ते सर्वसामान्यांशी अधिक जवळचे होतात. चित्रपटात पाच-पंचवीस गुंडाना सजरित्या खतम करणारा रजनिकांत आता राजकारणात आपल्या या प्रतिमेचा वापर करुन समाजसेवेची झुल पांघरण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्याचे राजकारण त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. कारण सध्या तामीळनाडूच्या राजकारणातील राजकारणी हे व्हिलन असल्यासारखेच आहेत. रजनीकांत यांच्या भाषेत सांगायचे तर सध्याच्या राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सर्व काही वापरले आहे. जनतेचा ते विचार करीत नाहीत. आपण जनतेच्या भल्यासाठी म्हणूनच राजकारणात उतरत आहोत, हे त्यांचे प्रतिपादन एखाद्या हिरोला शोभणारेच आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या राजकारणावर नजर टाकल्यास एक स्पष्ट दिसते की, सध्याच्या प्रस्थापित राजकारण्यांना त्यांना बाजूला सारुन जनतेसाठी काही तरी करावयाचे आहे. अर्थात हे किती काळ करु शकतील ती शंकाच आहे. कारण रजनिकांत यांच्या भोवती जनता आहे म्हटल्यावर अण्णाद्रमुक, द्रमुक या पक्षातील सत्तेच्या भोवती सतत राहिलेले नेते रजनीकांत यांच्या भोवती गराडा घालतील, यात काहीच शंका नाही. रजनीकांत हे भाजपच्या हातातील बाहुले म्हणून राजकारण करू इच्छितात, असाच समज सध्या तरी जनमानसांत आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रजनीकांत यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्याचा संभाव्य पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असेल, भाजपचे तमिळनाडू अध्यक्ष जाहीर करतात, यातच काय ते आले. अशा समजांचा थेट संबंध हा त्या त्या राजकीय नेत्याच्या परिणामकारकतेशी असतो. असे जर असेल तर रजनीकांत यांना आगामी राजकारणाच्या पहिल्याच पावलात विश्‍वासार्हतेची ठेच लागू शकते. परंतु रजनीकांत हे कोणत्याही  एका पक्षाच्या दावणीला बांधून घेणार नाहीत, त्यांची तशी मानसिकताही नाही. जयललिता यांच्याप्रमाणे आपली सत्ता कायम राखण्यासाठी ज्याचे पारडे जर त्यांच्याशी राज्यात गठबंधन करण्याचे तंत्र ते अवलंबू शकतात. जयललिता यांनी आजवर कधी कॉग्रेस तर कधी भाजपा यांच्याबरोबरीने जाण्याचे सूत्र अवलंबिले होते. त्यामुळे केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी राज्यात आपले सरकार पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. परंतु सुरुवातीपासून जर त्यांनी ही भूमिका घेतली तर त्यांच्या विश्‍वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या प्रस्थापित सर्व पक्षांना बाजूला सारुन आपले एक स्थान निर्माण करावे लागेल, मग कदाचित सत्ता येण्यासाठी अजूनही पाच वर्षे थांबावे लागले तरी बेहत्तर अशी भूमिका त्यांना ठेवणे गरजेचे आहे. तामीळनाडूच्या राजकारणात द्रविडांचे राजकारण महत्वाचे आहे, तिकडे जातीय समिकरणे बरीच महत्वाची ठरतात. यात रजनीकांत कुठे बसत नाहीत, तरी त्यांना तेथील जनता स्वीकारेल का? हे पहावे लागेल.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "राजकारणात रजनीकांत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel