-->
राष्ट्रकुलातील सुवर्ण लूट

राष्ट्रकुलातील सुवर्ण लूट

सोमवार दि. 23 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राष्ट्रकुलातील सुवर्ण लूट
क्रीडाविश्‍वात मानाचं स्थान असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे संपली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरले आणि पदकांची लयलूट केली. बॉक्सिंग, नेमबाजी, भालाफेक, कुस्ती आणि टेबल टेनिस यासारख्या खेळात भारताने पदकांची सिल्व्हर ज्युबिली पार केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत 26 सुवर्ण, 20 रौप्य व 20 कांस्यपदकांची कमाई केली. एकूण 66 पदकांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर भारत पदतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. 2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगिरी दोन पदकांनी यावेळी सुधारली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती. 2002मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती. भारतीय नेमबाजांनी ही राष्ट्रकुल स्पर्धा चांगलीच गाजवली. नेमबाजीमध्ये भारताने सात सुवर्णपदकांसह एकून 16 पदकांची कमाई केली. अनीश भानवाला, मेहुली घोष और मनू भाकर यासारख्या युवा नेमबाजांसह हिना सिद्धू, जीतू राय आणि तेजस्विनी सावंत या अनुभवी खेळाडूंनी भारतासाठी पदके जिंकली.वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण नऊ पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्णपदाकांसह प्रत्येकी दोन रोप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताच्या कुस्तीपटूंनी देखील जबरदस्त कामगिरी केली.  या क्रीडा प्रकारात भारताने पाच सुवर्णपदकांसह एकूण 12 पदकांवर नाव कोरले. यामध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि सुमित यासाठी कुस्तीपटूंचा समावेश आहे. बॅडमिंटनमध्ये भारताने सहा पदाकांची कमाई केली. मिश्र प्रकारात भारताच्या संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संगाने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय क्रीडा क्षेत्र सातत्याने नवे कौशल्य आणि आत्मविश्‍वास साध्य करत असतानाच क्रीडा क्षितिजावर नव्या प्रतिभावंतांचादेखील उदय होत आहे. विशेषत: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. कौटुंबिक ओढाताण, लैंगिक विषमतेचा अडसर पार करत त्यांनी भारताला लौकिक मिळवून दिला. टेबल टेनिसमध्ये सिंगापूरसारख्या मजबूत संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पराभूत करणे म्हणजे जणू ऑलिंपिकमध्ये चीनवर मात केल्यासारखेच होते. जत्रेतल्या कुस्तीपासून सुरू झालेल्या राहुल आवारेच्या प्रवासाने राष्ट्रकुलात सुवर्णाला घातलेली गवसणी, सायना नेहवाल, तेजस्विनी सावंतची नेहमीप्रमाणे दमदार हजेरी, सुपर मॉम मेरी कोमचा गोल्डन पंच, बबिता फोगटने आणि इयत्ता नववीतल्या अनीश भनवालने मिळवलेले सुवर्ण ही स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरली आहेत. महत्वाचे म्हणजे, क्रीडाग्रामममधील खेळाडूंसाठी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने तयार केलेली आचारसंहितेची भली मोठी जंत्री आणि राजकारण, भ्रष्टाचाराच्या विळख्यात भारतीय क्रीडा क्षेत्र अडकलेले असताना खेळाडूंनी 66 पदके पटकावली. अनेक अडथळ्यांची शैर्यत पार करीत त्यांनी ही पदकांची लूट केली आहे, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. या स्पर्धेचे आपले लागलेले निकाल पाहता, आपल्या शिलेदारांना जर अजून चांगले प्रशिक्षण व सोयी सवलती उपलब्ध करुन दिल्यास ते अनेक बाबतीत चांगली कामगिरी करु शकतात. सध्या आपल्याकडे सर्वांचे लक्ष क्रिकेटवरच केंद्रीत झाले आहे. एक तर या खेळात पैसाही आहे व ग्लॅमर तर त्याहून जास्त आहे. अशा वेळी अन्य खेळांच्या विकासाकडे ओघाने दुर्लक्ष होतेच. किमान शासकीय पातळीवर तरी हे दुर्लक्ष होता कामा नये, परंतु तसे होत नाही. अन्य खेळ एका बाजुला तर दुसर्‍या बाजूला केवळ क्रिकेट असे समिकरण झाले आहे. असे असतानाही आपल्या खेळाडूंनी अन्य खेळात मेहनत घेऊन त्यात लक्षणीय यश मिळविणे ही महत्वाची घटणा म्हणावी लागेल. आपल्याकडे क्रीडा संघटनांमधील राजकारण, त्यातील भ्रष्टाचार यातून खेळाडूंपुढे चुकीचा संदेश जातो. यातून त्यांच्या खेळाकडे दुर्लक्ष होते हे स्वाभाविकच आहे. आता पुढील काळात या यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्याकडे ग्रामीण तसेच शहरी भागात जे खेळाडू आहेत त्यांना शोधून काढून त्यांच्या तील खेळाडू जागवावा लागेल. त्यानंतर त्याला योग्य प्रशिक्षण दिल्यास हे खेळाडू जगात नाव काढू शकतात. भविष्यात यातूनच आपल्याला नवनवीन खेळाडू मिळून ऑलिंम्पिकसाठी चांगले खेळाडू तयार केले जाऊ शकतील. यातून आपल्याकडे सध्या ऑलिंम्पिकमध्ये जे पदकांचे दारिद्य्र दिसते ते संपुष्टात येऊ शकते. त्यासाठी चीनच्या धर्तीवर आपल्याकडे खेळाडू तयार करण्याची आखणी केली पाहिजे. क्रीडा प्रकार किंवा स्पर्धा कोणतीही असो, त्याची प्रगती ही गुणवत्तेवर अवलंबून असते. गुणी खेळाडू हेरण्याचा, त्याला मार्ग दाखवण्याचा, टिकवून ठेवण्याचा प्रयत्न क्रीडा संघटना करतात का, हा खरा प्रश्‍न आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रायोजक मिळवण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, ऑलिंपिकच्या वेळी तसे झाले नाही. भारतीय क्रीडा क्षेत्राचे यश-अपयश या अर्थकारणातच दडलेले आहे, हे वास्तव असले तरी क्रीडा क्षेत्रासाठी देशभर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि लाल फितशाहीमुळे येणार्‍या अडचणी नेटाने दूर केल्या तर सर्वच स्पर्धेत भरभरून पदके मिळू शकतील.
-----------------------------------------------------

0 Response to "राष्ट्रकुलातील सुवर्ण लूट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel