-->
विज्ञानसूर्य निखळला!

विज्ञानसूर्य निखळला!

गुरुवार दि. 15 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
विज्ञानसूर्य निखळला!
दुर्धर आजाराने त्रस्त असलेला प्रज्ञावंत स्टीफन हॉकिन्स यांचा मृत्यू झाल्याने एक खगोलशास्त्रज्ञ व शतकातील विज्ञानसूर्य निखळला आहे. गॅलिलीओच्या जन्मानंतर सुमारे 300 वर्षांनी स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म झाला. तर आईनस्टाईनच्या जन्मदिनी त्यांची या जगातून एक्झिट व्हावी हा एक विचित्र योगायोग म्हटला पाहिजे.
पृथ्वीच्या आणि मानव्याच्या कल्याणाची सतत चिंता करणारा हा आपल्या काळातला महान बुद्धीवादी शास्त्रज्ञ. आपल्या संशोधनाच्या विषयांच्या बाहेर येऊन वेळोवेळी ठोस भूमिका घेणारे हॉकिंग ही जगभरातल्या अनेक सामान्य माणसांना प्रेरणा होती. आपापल्या क्षेत्रात काम करताना व्यापक सामाजिक - राजकीय व्यवहारांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकत नाही हा संदेश कृतीतून देणारे हॉकिंग सध्याच्या काळात निघून जाणं हे खूप वेदनादायी ठरणारे आहे. हॉकिंग यांना आपल्या दुर्मिळ आजाराबद्दल फारसे दुःख वाटायचे नाही. धडधाकट माणसांना लाजवील असे त्यांचे काम, अभ्यास व बुध्दी होती. ते स्वतःच म्हणायचे की मी माझ्या आजारपणाचा फारसा विचार करत नाही. त्यांच्या जन्मानंतर ते जेमतेच पाच वर्षे जगतील असे डॉक्टरांचे मत होते. परंतु त्यांनी आपल्यासोबत तब्बल 76 वर्षे काढली व जगाला बरेच काही दिले. हॉकिंग यांचे जगणे व त्यांची बुध्दीमत्ता ही मानव वंशाने नियतीला आव्हान देणारी घटना होती. मानवाची प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हॉकिंग यांच्यामध्ये दिसायची. हॉकिंग यांचा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झाला होता. लंडनवर जर्मन फौजांनी बॉम्बफेक केल्यावर अनेक रहिवासी ते शहर सोडून इतरत्र गेले होते. हॉकिंग यांचे आई वडील याच काळात ऑक्सफर्डला गेले व तेथेच त्यांचा ऑक्सफर्डमध्ये जन्म झाला. त्यांची आई ही अत्य्ंत उदारमतवादी होती. तिथल्या एका उदारमतवादी संस्थेतही तिने काम केले होते. याचा प्रभाव हॉकिंग यांच्यावर होता. यातूनच त्यांजी आयुष्यातील जडणघडण झाली होती. अलीकडे ब्रिटनने जेव्हा युरोपियन महासंघातून बाहेर पडायच्या मुद्द्यावर सार्वमत घ्यायचे ठरवले तेव्हा त्यांनी ब्रेक्झिटला जाहीर विरोध केला होता. सगळ्या जगाशी फटकून वागत एकेकट्याने जगायचे दिवस केव्हाच संपले आहेत अश्या कठोर शब्दांत त्यांनी ब्रिटनमधल्या अहंवादाला फटकारले होते. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्यावर तर हॉकिंग यांनी आक्रमक टीका केली होती. जगभरातच वाढत चाललेली असहिष्णुता म्हणजे आपण माणसे एका अत्यंत धोक्याच्या वळणावर येऊन ठेपल्याची खूण आहे, अशा कठोर शब्दांत हॉकिंग यांनी चिंता व्यक्त केली होती. आज त्यांचे हे मत आपल्याला पावलोपावली पटत आहे. असो. त्यांच्या संशोधनाविषयी जशी त्यांची ठाम मते होती तशीच त्यांची या पृथ्वीवरील माणसांनी कसे जगावे याविषयीही मते होती व ती मते ते वेळोवेळी व्यक्त करीत असत. आपल्याकडे भारतात गुणांना जास्त महत्व देतात पण ते किती फोल आहे हे स्टीफन यांच्या उदाहरणावरून आपल्याला समजते. हॉकिंग यांचे शाळेतील गुण मात्र सरासरी विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षाही कमी होते. अभ्यासात ते फारसे कधी चमकले नाहीत किंवा त्यांनी वर्गात पहिला क्रमांक कधीच पटकावला नाही. परंतु प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स हा त्यांचा प्रबंध केंब्रिजने ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. हा प्रबंध इतका हिट ठरला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला आणि केंब्रिजची वेबसाईट त्यावेळी क्रॅश झाली होती. म्हणजे शाळेत सुमार असलेल्या या मुलाची बुध्दीमत्ता कशी होती हे आपल्याकडील शिक्षणाचा अभ्यासक्रम आखणार्‍यांनी तपासले पाहिजे. विश्‍वाची निर्मिती (बिग बँग थियरी) व कृष्णविवर (ब्लॅक होल ), क्वांटम ग्राव्हिटी याबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात मांडलेली थिअरी जगाला बरेच काही ज्ञान देऊन गेली आहे. सृष्टीच्या निर्मितीचा शोध लावताना विश्‍वाच्या अथांग पसार्‍यात स्टीफन हॉकिंग यांची प्रज्ञा तळपत फिरत होती. माणसाला आता यापुढची प्रगती ही पृथ्वीच्या बाहेर जाऊनच करावी लागेल, पृथ्वीच्या बाहेर विश्‍वात मानवाइतका बुद्धिमान प्राणी असणे अशक्य नाहीतर तो आपल्यापर्यंत येऊन पोचला असता, ही आणि अशी अनेक महत्वपूर्ण विधाने परिपूर्ण अभ्यासानंतर हॉकिंग यांनी केली. ज्यावर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, विचारवंत यांच्यात खूप चर्चा झाली. वाद-प्रतिवाद झाले. आजारपणामुळे त्यांचा शरीरिक हालचाली बंद झाल्या होत्या, फक्त त्यांना एका हाताच्या काही बोटांची हालचाल करता येत होती. 2007 साली स्टीफन यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षींनी प्रथमच ते आपल्या व्हिलचेअरवरून उठले होते आणि हवेत तरंगण्याचा सुंदर अनुभव घेतला होता. एलियन्स असू शकतात असे मानणार्‍या शास्त्रज्ञांपैकी स्टीफन एक होते. त्याचबरोबर दूरवरच्या आकाशगंगांकडे सिग्नल पाठवणे मुर्खपणाचे आहे असे त्यांचे म्हणत असतं, समजा एलियन असलेच आणि आपल्यापेक्षा ते जर प्रगत निघाले तर ते पृथ्वी उडवतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती. देवाचे अस्तित्व त्यांनी कधीच मान्य केले नाही. बिग ब्यांग स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता, त्यामुळे देवाकडे विश्‍व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्‍न अडाणीपणाचा आहे, असे ते म्हणत. अर्थात प्रत्येकाला आपला विश्‍वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले होते. देवाने विश्‍व निर्माण केलेले नाही. ईश्‍वर मार्गदाता नाही. ईश्‍वर प्रेमळ काळजीवाहू नाही. ईश्‍वर मुक्तिदाता नाही. कारण तो अस्तित्वातच नाही, असे त्यांचे ठाम मत होते. आज हॉकिंग्ज आपल्यात नसले तरी त्यांचे हे विचार चिरंतर राहाणार आहेत.
---------------------------------------------------------------------

0 Response to "विज्ञानसूर्य निखळला!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel