-->
संपादकीय पान--अग्रलेख--१९ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
एका शास्त्रज्ञानाचा यथोचित गौरव
----------------------------
देशातील एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी.एन.आर. राव यांना भारत सरकारने भारतरत्न हा किताब बहाल करुन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. शनिवारी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासमवेत राव यांना हा किताब जाहीर झाल्याने तुलनेने राव यांना कमी प्रसिध्दी मिळाली. परंतु त्यामुळे त्यांचे मोठेपणा काही कमी होत नाही. सचिनची वा राव यांची परस्परांशी तुलना करणेही चुकीचे ठरेल. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत आणि त्यांच्या कार्याचा भारत सरकारने गौरव केला आहे. सचिनच्या नसानसात जसे क्रिकेट भिनलेले आहे तसे राव यांच्यात रक्तात विज्ञान आहे, त्यांचा दृष्टीकोन विज्ञानवादी आहे. सी.व्ही.रमण, अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न हा सर्वोच्च किताब मिळालेले ते तिसरे शास्त्रज्ञ आहेत. ७९ वर्षीय राव यांनी नोबेल वगळता जगातील बहुतांशी आघाडीचे पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांनी शेकडो विद्यार्थी घडविले आहेत. तसेच अनेक विज्ञान संस्थांना जन्माला घातले आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी आज अनेक संस्थांमध्ये आघाडीच्या स्थानावर आहेत आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत आहेत. सरकारच्या विज्ञान धोरणाचे ते प्रणेते आहेत. त्यांच्याशी खरे तर अनेक जण अणू भट्टीची तुलना करतात. त्यांच्याकडे असलेली काम करण्याची उर्जा व त्यांनी घडविलेली माणसे पाहता त्यांनी स्वत: काही जास्त न कमविता जास्त या समाजाला दिले आहे. त्यामुळे त्यांची अणू भट्टीची तुलना सार्थ ठरते. रसायनशास्त्रासारख्या अवघड शास्त्रात त्यांनी अल्पावधीत आपले एक स्थान निर्माण केले. मेटल ऑक्साईड वर संशोधन करुन त्याचे गुणधर्म शोधून काढणार्‍या जगातल्या काही मोजक्या शास्त्रज्ञात त्यांचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या भारतीयांना त्यांचे फारसे कौतुक वाटले नाही, पण जगाने त्यांचे महत्व केव्हाच ओळखले होते. आजही वयाच्या ८०व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना ते सकाळी ४.३० उठतात आणि सर्व तयारी आटोपून पाच वाजता संशोधनाच्या कामाला लागतात. सध्या ते एका महत्वाच्या वस्तू निर्मितीवर संशोधन करीत आहेत. ते शोधीत असलेली ग्राफेन नावाची ही वस्तू हे एक जगातील आश्‍चर्य ठरणार आहे. सकाळी ८.३० वाजता ते आपल्या संशोधन केंद्रात असतात ते पार दुपारी ४.३० वाजेपर्यंत. या वयात देखील त्यांच्यात ही उर्जा कसी येते अशी अनेकांना शंका येते. सोमवार ते शनिवार असे ते आठवडाभर काम करतात आणि रविवारी फक्त अर्धा दिवस सुट्टी घेतात. त्यांच्या रक्तात फक्त विज्ञान भिनलेले आहे आणि ते फक्त त्यासाठी जगतात. बंगलोरमध्ये जन्मलेल्या राव यांचे सर्व शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर म्हैसून विद्यापीठातून पदवी संपादन केल्यावर ते कामपूरच्या आय.आय.टी.मध्ये दाखल झाले. आजवर त्यांनी १५०० संशोधनात्मक निबंध व ४५ शास्त्रीय पुस्तके लिहिली आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या या कामाची जगाने दखल घेतली. जगातील सुमारे ६० विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेट प्रदान केली आहे. यावरुन त्यांच्या संशोधनाच्या कामाची जगात घेतलेली दखल लक्षात येते. १९९४ साली राव हे बंगलोरच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्समधून निवृत्त झाले. वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्त होत असताना बंगलोरच्या या संशोधन संस्थेला एका उच्च स्तावर नेऊन ठेवले होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स रिसर्च ही संस्था स्थापन केली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वस्त न बसता अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली आणि जवाहरलाल नेहरु संस्थेसही नावारुपाला आणले. राव यांचा प्रयत्न हा संशोधनात सरकारने गुंतवणूक वाढविण्यासाठी होता. परंतु सरकारकडून त्यांना सकारात्म प्रतिसाद मिळाला नाही त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली आहे. अगदी भारतरत्न मिळाल्यावरही त्यांनी याबाबत आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर केली होती. ऐवढेच कशाला सर्व सत्ताधारी हे मूर्ख आहेत असे म्हणण्यापर्यंत त्यांनी टीका केली होती. या टीकेमागे त्यांची तळमळ फार महत्वाची आहे. कारण राव हे स्वत: पंतप्रधानांच्या विज्ञान विषयक सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. ऐवढे असूनही त्यांनी सत्ताधार्‍यांवर थेट शरसंधान सोडले. यामागे त्यांना सत्ताधार्‍यांकडून आलेल्या कटू अनुभवात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. राव यांना राजकारणात रस नाही त्यांचे प्रेम विज्ञानावर आहे. त्या विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना व्हावा असे त्यांना वाटते. त्यामुळे याच पोटतिडकितून त्यांनी ही टीका केली आहे. आजवर जे काही संशोधन झाले त्याचा समाजास उपयोग झाला यातून सर्वसामान्यांचा जीवनस्तर वाढला. त्यामुळे विज्ञानामुळे जे संशोधन होते त्याचा आम जनतेला काही उपयोग झाला तरच त्या विज्ञानाचा फायदा आहे. त्यामुळे विज्ञानात, संशोधनात गुंतवणूक करणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण विकासाला हातभार लावीत असतो. परंतु आपले राज्यकर्ते हे विज्ञाननिष्ठ नसल्याने त्यांना राव यांचे सागंणे काही पटणारे नाही. आपल्याकडील सर्व राजकारण हे निवडणुकांवर आधारित झाले आहे. सरकारी योजनांच्या पैशातून आपल्याला निवडणुकांसाठी मत मिळविण्यासाटी कसा झटपट फायदा होतो त्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झालेले आहे. अशा वेळी विज्ञानावर खर्च करणे म्हणजे फायदेशीर नाही असे राजकारण्यांना वाटते. कारण विज्ञानात, संशोधनात गुंतवणूक करुन त्याचे लाभ हे झटपट मिळत नाही तर ते दीर्घकालीन असतात. त्यामुळे राव यांनी पोटतिडकिने राजकारण्यांना टीका करुन त्यांना मूर्ख असे संबोधिले आहे. या टीकेमागे त्यांची विज्ञाननिष्ठा व विज्ञानावरचे प्रेमच दिसते.
--------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel