-->
अखेरचा लाल सलाम!

अखेरचा लाल सलाम!

गुरुवार दि. 25 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
अखेरचा लाल सलाम!
स्वातंत्र्यसेनानी, कम्युनिस्ट नेते, लाल निशाण पक्षाचे संस्थापक, कामगार व कष्टकर्‍यांचे नेते व डावी चळवळ एकसंघ राहावी यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचे वयाच्या 98व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशातील कम्युनिस्ट चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. आपल्या देशातील कम्युनिस्ट चळवळीचे अर्ध्वुयू एस.के. डांगे, एस.के. लिमये यांच्या पुढच्या पिढीशी नाते सांगणारे कॉ. यशवंतराव चव्हाण होते. अगदी अलिकडेपर्यंत ते वाचन, विचारमंथन व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यात सक्रिय होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी लाल निशाण पक्षाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. आपण ज्या पक्षापासून आपल्या संघर्षामय जीवनाला सुरुवात केली, त्याच पक्षात आता आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते. देशातील सर्व कम्युनिस्ट विचारांच्या लोकांचा एकच पक्ष असावा यासाठी ते नेहमी कार्यरत राहिले होते. अर्थात ते काही शक्य झाले नसले तरी त्यांनी ज्या पक्षाची स्थापना केली, तो पक्ष तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन करुन सर्व कम्युनिस्टांपुढे आदर्श घालून दिला होता. 28 ऑगस्ट 1920 साली कोल्हापुरात सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल कोल्हापूर संस्थानातील न्यायाधीश होते. यशवंतरावांचा वयाच्या 16व्या वर्षीच स्वातंत्र्यचळवळीशी संबंध आला. त्याकाळी सर्वत्र स्वातंत्र्यचळवळीचे वातावरण भारलेले होते. प्रामुख्याने तरुणांचा सहभाग यात मोठा होता. स्वातंत्र्य चळवळीत ओढले जात असताना यशवंतराव कम्युनिस्ट विचारांशीही बांधले जात होते. त्या काळी कोल्हापुरात कॉ. एस.के. लिमयेंनी घेतलेल्या तरुणांच्या अभ्यास वर्गानंतर कॉ. यशवंतराव त्यांच्याकडे ओढले गेले ते शेवटपर्यंत. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी कम्युनिस्ट विचारांचा स्वीकार केला, निधनापर्यंत त्यांनी हा विचार काही सोडला नाही. आपला मुलगा कम्युनिस्ट विचारांकडे ओढला जात आहे, हे त्यांच्या वडिलांना काही अमान्य होते असे नाही परंतु त्यांच्या मनाला ते पटतही नव्हते. परंतु यशवंतरावांचा विचार पक्का होता. शिक्षणाच्या निमित्ताने ते मुंबईत दाखल झाले व त्यांनी गिरणी कामगारांना संघटीत करण्याचे काम सुरु केले. सकाळी एलफिस्टन कॉलेजमध्ये शिकत व त्यानंतर गिरणी कामगारांना संघटीत करण्याचे काम करीत. 42च्या चलेजाव आंदोलनात त्यांना अटक झाली, मात्र त्यांना या अटकेनंतर कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या अन्य तीन साथीदारांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर एस.के. लिमये, यशवंतराव चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी नवजीवन संघटना स्थापन केली. कालांतराने ही संघटना शेतकरी कामगार पक्षात विलीन करण्यात आली. मात्र त्यांचे येथे वैचारिक मतभेद झाल्याने ते शेकापमधून पुन्हा बाहेर पडले व त्यांनी लाल निशाण पक्षाची 1965 साली स्थापना केली. लाल निशाण पक्षाची ताकद राज्यात काही मोठी नसली तरीही त्यांच्याकडे तळागळातील कष्टकर्‍यांच्या संघटना होत्या व हेच त्यांचे वैशिष्टय राहिले आहे. सयुंक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लाल निशाण पक्ष एक लहान घटक म्हणून सहभागी होता. मात्र कम्युनिस्ट व समाजवादी यांच्यांशी दुजा जोडण्याचे व समिती एकसंघ कशी ठेवता येईल यासाठी यशवंतरावांनी नेहमीच कष्ट घेतले. त्यासाठी त्यांनी आपल्याला मिळणार्‍या आमदारकीच्या काही जागाही सोडल्या. लाल निशाणने लढविलेली ही शेवटची निवडणूक. त्यानंतर त्यांनी अलिकडचा एखाद-दुसरा अपवाद वगळता निवडणुका लढविल्या नाहीत. निवडणुकांच्या राजकारणापासून आपल्याला अलिप्तच ठेवले. त्यापेक्षा कामगार कष्टकर्‍यांच्या एकजुटीवर यशवंतरावांनी भर दिला होता. त्यामुळेच ग्रामीण मजुर, शेतमजुर, वन कामगार, कोतवाल, आंगणवाडी सेविका, साखर कामगार, वीटभट्टी कामगार, गरीब शेतकरी यांना संघटीत करण्यात आपली सर्व ताकद लावली. स्वत: कॉ. यशवंतरावांनी कामगारांना संघटीत करण्यात पुढाकार घेतला होता. एवढेच नव्हे तर कमानी ट्यूब्ज या मालकाने दिवाळे काढलेली कंपनी कामगारांनी सहकार तत्वावर ताब्यात घेऊन यशस्वीरित्या काही काळ चालवून दखविली. यात यशवंतरावांचा मोलाचा वाटा होता. मालक-सरकार-राजकीय पक्ष यांच्यापासून कामगार संघटना य अलिप्त असल्या पाहिजेत, यावर त्यांचा भर होता. यासाठी त्यांनी 2005 साली न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह ही संघटना स्थापन केली. त्याला बर्‍यापैकी प्रतिसाद त्यांना लाभला. त्यांनी आपल्या कामगार संघटना या पक्षाच्या दावणीला कधीच बांधल्या नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, 82 साली गिरणी कामगारांच्या एतिहासिक संपाला डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली, त्यावेळी डॉक्टरांंच्या नेतृत्वावर कामगारांनी जो विश्‍वास व्यक्त केला होता ते पाहता त्यांनी आपल्या पक्षाची कापड कामगार संघटना ही डॉ. दत्ता सामंत यांच्या युनियनमध्ये विलीन केली होती. 1989 मध्ये त्यांनी भाजपा व शिवसेना युतीचा पराभव केला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे देशात जातियता वाढीस लागण्यचा धोका आहे, हे त्यांनी त्यावेळी ओळखून सर्व डाव्या, पुरोगामी शक्तींनी एकत्र यावे व वेळ पडल्यास कॉग्रेसला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे त्यावेळी सर्वांनीच दुर्लक्ष केले. आता त्यांच्या या आवाहनाचे महत्व पटत आहे. त्याचबरोबर त्यांनी दिल्ली(भारत)-मॉस्को(रशिया)े-बिजींग(चीन) या तीन देशांनी एकत्र येण्याचे त्यांनी सुत्र मांडले होते. यातून जगाचे चित्र पालटू शकेल असा त्यांचा आशावाद होता. कॉ. यशवंतराव नेहमीच कामगार, कष्टकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले व त्यांनी कम्युनिस्ट सर्व एकाच झेंड्याखाली कसे येतील ते पाहिले. त्यांनी आपले आयुष्य हे यासाठीच वेचले. आयुष्यभर ते पक्षाच्या कम्युनमध्ये राहिले. अशा प्रकारचे नेते आताच्या पिढीत शोधून सापडणार नाहीत. कृषीवलचा या महान नेत्याला अखेरचा लाल सलाम!
-------------------------------------------------------------

0 Response to "अखेरचा लाल सलाम!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel