-->
टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर

टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर

संपादकीय पान बुधवार दि. २६ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर
सुमारे ११० अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योग समूहातील विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची त्यांच्या पदावरुन अचानक हकालपट्टी झाल्याने टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर आता उफाळून वर आले आहे. सायरस यांची या पदावर निवड होऊन जेमतेम चार वर्षे पूर्ण होत होती आणि त्यांच्यावर ही गदा आली आहे. अनपेक्षित अशीच ही घटना म्हटली पाहिजे. टाटा समूहातील टाटा आडनाव नसलेले ते अलिकडच्या काळातील पहिलेच अध्यक्ष असल्याने त्यांच्याबाबतीत बरीच चर्चा सुरु होती. मात्र व्यावसायिकदृष्ट्या हा उद्योगसमूह चालविला जात असल्याने तसेच मिस्त्री यांच्या वडिलांच्या शापूरजी पालोनजी समूहाचे टाटा सन्समध्ये १८ टक्क्यांच्या वर समभाग असल्याने सायरस आता चांगलेच स्थिरावले असे चित्र दिसत असतानाच ही घटना घडली आहे. टाटा सन्सची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी १८६८ साली रोवली. समूहात सध्या १००हून अधिक कंपन्या आहेत. पैकी ३०हून उपकंपन्या या विविध भांडवली बाजारात नोंद आहेत. समूहात ६.६० लाखांहून अधिक मनुष्यबळ आहे. टाटा नसलेले सायरस मिस्त्री दुसरे, तर १५० वर्षांंतील सहावे अध्यक्ष होते. वयाच्या पन्नाशीच्या आत टाटा समूहाचे अध्यक्षपद आल्याने खर्‍या अर्थाने या समूहास तरुण अध्यक्ष त्यांच्या रुपाने लाभला होता. परंतु अध्यक्षपदाची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिस्त्री यांना थेट समूहातूनच बाहेर जावे लागले. टाटा नाव नसलेले मिस्त्री हे या समूहाचे दुसरे अध्यक्ष होते. यापूर्वी नौरोजी साकलतवाला हे अध्यक्ष होते. मिस्त्री यांच्याप्रमाणेच साकलतवाला यांनाही अध्यक्ष म्हणून कमी कालावधी मिळाला. १९३८ मध्ये निधन झालेले साकतवाला हे टाटा समूहाचे सहा वर्षे अध्यक्ष होते. मीठाच्या उत्पादनापासून माहिती तंत्रज्ञान असे वैविध्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा समूहातील विशेषत: टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस कंपन्यांना जागतिक स्तरावर अधिक फटका बसत असल्याचे दिसत होते. चालू आर्थिक वर्षांतील दुसर्‍या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा हंगाम सुरू असतानाच टीसीएससारख्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी फारशी समाधानकारक नाही. ब्रेक्झिटमुळे टीसीएस तर चीनमुळे टाटा मोटर्स (जग्वार लँड रोव्हर) ला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कोरस ही कंपनी खरेदी करत जगातील पाचवी मोठी कंपनी बनणार्‍या टाटा स्टीलच्या युरोपातील व्यवसाय विक्रीलाही सध्या कोणी खरेदीदार नाही. टाटाांनी आपला ब्रिटनमधील पोलाद प्रकल्प विकण्याची केलेली घोषणा ही टाटा सन्सच्या संचालकांना मान्य नव्हती अशी चर्चा होती. जपानी दूरसंचार कंपनी डोकोमाने टाटा सन्सकडून १.२० अब्ज डॉलरचा दंड वसूल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियामकांची दरवाजे ठोठावली आहेत. टाटा सन्समधून रतन टाटा हे २९ डिसेंबर २०१२ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्त होताना त्यांच्या जवळच्या नात्यातील कुटुंबातील असेल्या ४८ वर्षीय सायरस मिस्त्री यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वर्षभराने पाच सदस्यांच्या निवड प्रक्रियेद्वारे मिस्त्री यांच्या नावावर अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थावर मालमत्ता, अभियांत्रिकी आदी क्षेत्रातील शापूरजी पालनजी समूहाशी संबंधित मिस्त्री हे २००६ पासून टाटा सन्सच्या संचालक मंडळात होते. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या विरोधात सहा विरुध्द चार असे मतदान झाले. यातील दोन जण अनुपस्थित होते तर चार जणांनी त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. रतन टाटा अध्यक्ष असताना टाटा समूहाचा त्यांनी झपाट्याने विस्तार केला. यासाठी त्यांनी काही तोट्यातील कंपन्या विकल्या तर काही नव्या कंपन्या ताब्यात घेऊन विस्तार केला. रतन टाटांनी आपल्या कारकिर्दीत टेटली (२०००), कोरस (२००७), जग्वार लँड रोव्हर (२००८) आदी जागतिक कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. १९९१ मध्ये उलाढाल अवघी १०,००० कोटी रुपयांची असलेला टाटा समूह यामुळे रतन टाटा निवृत्त होताना  २०११-२०१२ पर्यंत तब्बल १०० अब्ज डॉलरचा बनला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या मिस्त्री यांच्या कारकिर्दीत मात्र समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक आर्थिक फटका सहन करावा लागला. अर्थात त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरील परिस्थितीही अनुकूल लाभली नाही. गेले काही वर्षे विकसीत देशात असलेल्या मंदीमुळे टाटांच्या कंपन्.यांना बराच फटका सहन करावा लागला होता. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्ससारख्या निवडक कंपन्यांनी उत्पादनाच्या धर्तीवर काहीसा विस्तार केला. इंडिकासारखे यश न मिळवू शकलेल्या टाटा मोटर्सने मिस्त्री यांच्या कालावधी दरम्यान वर्षांला दोन वाहने सादरर करण्याचे आश्वासन दिले होते. टाटा समूहाचे जवळपास दोन दशके  २१ वर्षे अध्यक्षपद भूषविल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांचा रस माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये दाखविला. मिस्त्री यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीनंतर त्यांनी एकामागोमाग एक अशा ई-कॉमर्स कंपन्यांमधील वैयक्तिक गुंतवणूक वाढविली. टाटा समूहात मुख्य प्रवर्तक टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. तर १८.४ टक्क्यांसह शापूरजी पालनजी ही दुसरी मोठी भागीदार कंपनी आहे. टाटा समूहाचे ४१ लाख भागधारक आहेत. टाटा सन्समध्ये १८ टक्के हिस्सा असलेल्या शापूरजी पालनजीचे मुख्य प्रवर्तक शापूरजी पालनजी सायरस मिस्त्री यांचे वडिल हे भारतातील पाचवे मोठे अब्जाधीश म्हणून प्रसिद्ध आहेत. टाटा समूहात मिस्त्री यांना सहजरित्या मिळालेला प्रवेश पाहता अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. कदाचित भविष्यात टाटा हे नाव संपुष्टात येण्याची भीतीही यातून व्यक्त झाली होती. कदाचित टाटा सन्समधील याच शक्तींनी उचल खाल्ली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकूणच पाहता हे कॉर्पोरेट वॉर कोणत्या टोकार्यंत जाते किंवा याचा समूहास कितपत फटका बसेल हे भविष्यात पहावे लागेल.
-------------------------------------------------------------------

0 Response to "टाटा समूहातील कॉर्पोरेट वॉर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel