-->
धान्य उत्पादन वाढणार

धान्य उत्पादन वाढणार

संपादकीय पान शनिवार दि. १७ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
धान्य उत्पादन वाढणार
लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाचा मार सोसल्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे देशात २०१६-१७ या चालू पीक वर्षात धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठण्याची आशा असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी निवेदन केले आहे. हे जर प्रत्यक्षात उतरले तर देशातील जनतेला एक मोठा दिलासा मिळू शकेल. कारण जास्त उत्पादन झाल्यास महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. २०१३-१४ या पीक वर्षात २६ कोटी ५०.४ लाख टन एवढे धान्याचे उत्पादन झाले, तो आजवरचा विक्रमी उच्चांक होता. दुष्काळामुळे २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये उत्पादन घटून ते अनुक्रमे २५ कोटी २०.२ लाख टन आणि २५ कोटी ३२.३ लाख टनांवर आले होते. चांगल्या पावसामुळे सरकारने यावर्षी २७ कोटी १ लाख टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. धानाचे उत्पादन १० कोटी ८५ लाख टन, गहू ९ कोटी ६५ लाख टन तसेच डाळींचे उत्पादन २ कोटी ४५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. यावर्षीचा पाऊस शेतीसाठी अनुकूल आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाला असून त्याचे प्रमाणही संतुलित आहे. यावर्षी डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे कारण खरीप लागवडीचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढून १४३.९५ लाख हेक्टर झाले आहे. धान, तीळ आणि कडधान्याची लागवडही वाढली आहे. नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच खरीपाची पेरणी होत असून पुढील महिन्यात पीक येऊ लागते. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार्‍या रब्बी हंगामात डाळींची लागवड वाढविण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न झाले पाहिजेत. बर्‍याच डाळींचे उत्पादन रब्बी हंगामात होत असून त्यासाठी शेतकर्‍यांना कायम प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना डाळींचा किमान आधारभाव दिला गेला पाहिजे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरकारी संस्थांनी मुगाची खरेदी सुरू केली आहे. आवक वाढल्यानंतर तूर आणि उडदासारख्या डाळींची खरेदीही वाढविली जाणार आहे. यंदा चांगले पिक अपेक्षित असल्यामुळे डाळींसह विविध उत्पादनांच्या किंमती नियंत्रणात राहातील अशी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी सरकारने सट्टेबाज व साठेबाजांनाही अटकाव केला पाहिजे. तसे न केल्यास सर्व किंमती हे साठेबाज नियंत्रीत करण्याचा धोका आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "धान्य उत्पादन वाढणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel