-->
बाप्पांना अखेर निरोप

बाप्पांना अखेर निरोप

संपादकीय पान शनिवार दि. १७ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
बाप्पांना अखेर निरोप
अकरा दिवसांच्या मुक्कामांनतर गणपतीबाप्पांचे गुरुवारी साश्रृनयनांनी विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपतींना निरोप देण्यासाठी पावसानेही हजेरी लावली होती. पुढील वर्षी गणपती बाप्पा पंधरा दिवस अगोदरच येणार आहेत. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शांततेत विसर्जन पार पडल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र सेल्फि काढण्याच्या नादात तसेच विसर्जनाच्या वेळी बुडल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता १६वर गेली आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, ही एक चांगली बाब ठरावी. मुंबई, पुणे आणि सोलापूरसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं असल्याने भक्त मात्र नाराज झाले असले तरी त्यांचा उत्साह काही संपलेला नव्हता. पुण्यात दरवर्षीप्रमाणे मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे वेळेत विसर्जन झाले. मात्र त्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत विसर्जन सुरुच होते. विसर्जनाच्या मिरवणुकी तब्बल २४ तासाहून जास्त काळ चालल्या तरी गणेशभक्तांचा उत्साह काही संपलेला नव्हता. मुंबईतील प्रसिध्द असलेल्या लालबागच्या राज्याचं २१ तासांच्या मिरवणुकीनंतर सकाळी ८ च्या सुमारास विसर्जन करण्यात आले. अरबी समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल २० तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी केली होती. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला. त्यामुळे या अवाढव्य मूर्तीचे अलगदपणे विसर्जन करण्यात आले. कपूर कुटुंबाच्या आर.के. स्टुडिओच्या आवारातील गणपती विसर्जनावेळी रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याने अनेक फॅन्स नाराज झाले. गणपतीची आरती झाल्यावर एका पत्रकाराने रणधीर यांना प्रतिक्रिया विचारली होती, मात्र संतापलेल्या रणधीर कपूर यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. तर ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका चाहत्याला मारहाण केली. यात कपूर घराण्यातीलच व्यक्तिचा दोष आहे असे नव्हे. कारण अनेकदा या कलाकारांना वैयक्तीक आयुष्य काही न राहिल्याने त्यांना त्यांच्या चाहात्यांचा किंवा पत्रकारांचा गराडा कधीकधी नकोसा वाटतो. त्यांच्यामुळेच त्यांचे खासगी आयुष्य संपुष्टात येते. त्यामुळे त्या रागापोटी ही कृती कपूर यांच्याकडून घडली असण्याची शक्यता असते. पत्रकारांनी व त्यांच्या चाहात्यांनीही फारसे अशा कलाकारांच्या मागे न लागता त्यांना मोकळे सोडल्यास असे प्रसंग घडणार नाहीत. प्रामुख्याने अशा प्रकारचे वर्तन जे कलाकार करतात त्यांच्याशी यापुढे कोणत्याही प्रसिध्दीसाठी न गेल्यास त्याचा चांगला उपयोग होईल. असो. यंदा विसर्जन सुरळीत पार पडले असले तरी आपल्याला आगामी काळात गणपतींच्या उंच मुर्तींचा प्रश्‍न मार्गी लावाला लागणार आहे. कारण त्यांचे विसर्जन करणे ही एक मोठी समस्या होत आहे. यासाठी गणपती मंडळांनीच पुढाकार घेऊन मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत. यासाठी आत्तापासूनच गणपती मंडळांनी पुढाकार घ्यावा, त्याचे चांगले परिणाम निदान पुढच्या वर्षीतरी दिसतील.  

0 Response to "बाप्पांना अखेर निरोप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel