-->
पुढच्या वर्षी लवकर या...

पुढच्या वर्षी लवकर या...

संपादकीय पान गुरुवार दि. १५ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुढच्या वर्षी लवकर या...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात गणपतीबाप्पांना आज साश्रृनयनांनी निरोप दिला जाईल. गेले अकरा दिवस बुध्दीच्या या देवताने आपल्या घरातील व परिसरातील वातावरण पार बदलून टाकले होते. प्रत्येक जण आपल्या पदरी असलेले दुख:, निराशा, विसरुन गणरायाच्या सेवेत मग्न झाला होता. आता या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली आहे. विद्या, शक्ती, बुद्धीची ही देवता अगदी लहानपणापासून सर्वांच्या परिचयाची. आबालवृद्धांना या देवतेचं आकर्षण आहे. कितीही ऐकलं तरी या देवतेविषयी आणखी ऐकावंस वाटतं. त्याचं वर्णन श्रुती सुखावतं राहतं. गणेशाविषयी सांगावं, बोलावं आणि लिहावं तेवढं थोडंच. श्री गणेशाचं आदिकाळापासून रुप बघायचं तर त्याचे चार टप्पे आहेत. निर्माणकाळात बृहस्पती, ब्रम्हणस्पती आणि इंद्र या देवतांशी श्री गणेशाची एकरुपता मानली जाणं हा श्री गणेश दर्शनाचा पहिला टप्पा. श्री गणेश आणि विनायक या देवता आदिकाळात भिन्न होत्या असं म्हटलं जातं. या देवतांच एकीकरण म्हणजे एक स्वरुप हा दुसरा टप्पा. श्री गणेश किंवा श्री विनायक ही नावं वेगळी-वेगळी म्हटली तरी, या दोन्ही नावांनी श्री गणेशाचंच रुप डोळ्यापुढे यावं, हा श्री गणेशाचा तिसरा टप्पा. गजमुख किंवा गजवदन अशा स्वरुपाची हत्तीचं तोंड असलेली श्री गणेशाची मूर्ती पूजेसाठी वापरली जाणं, हा श्री गणेश दर्शनाचा आजचा चौथा टप्पा. बुध्दीची ही देवता असल्याने आपण या देवतेकडे आता सगळ्यांना चांगली बुध्दी देण्याची विनंती करुया. कारण सध्या केवळ आपल्याच देशात नव्हे तर सर्वच जगात निराशेचे वातावरण आहे. माणसातील माणूसकी आता संपत असल्याची भावना अनेक घटना पाहिल्यास दिसते. धर्म-जाती-पंथाच्या नावाने सुरु झालेल्या अहंममहिका, गर्वाचे वातावरण आणि त्यातून सुरु झालेले वाद आपल्या सर्वानाच निराशा आणते. परंतु अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी बाप्पाकडे आपण सर्वच मिळून प्रार्थना करुया. देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. समाजातील प्रत्येक घटक झटपट पैसा कमविण्याच्या नादात अडकत चालला आहे. अधिकारी वर्गापासून ते खालच्या थरातील चपराशापर्यंत सर्वच जण पैसे कसे खाता येतील हे पहात आहे. अर्थात यालाही काही अपवाद आहेच. मात्र केवळ दहा टक्केच लोक या अपवादात आहेत असे म्हणता येईल. हे असे गणपती बाप्पा किती काळ चालणार? आज तुम्हाला निरोप देताना आम्हाला कळकळीने सांगावेसे वाटते की, आता हे थांबवा. लोकांना सुबुध्दी द्या. पैसे कमवा, परंतु प्रामाणिकपणाने, कष्ट करुन मिळवा, हे आज सांगण्याची वेळ आली आहे. गणपती हा शंकराच्या गणांमधील एक असल्याने त्रिशूल हे गणपतीचं एक शस्त्र ठरलं. हा त्रिशूल प्रत्यक्ष शंकरानीच गणपतीला दिला. परशू हे शस्त्र मूळ परशुरामाचं. परंतु रेणुकामातेने श्रीगणेशाला ते उपनयन म्हणजे मुंजीच्या वेळी दिलं अशी पुराण कथा आहे. मुद्गल हे गणपतीच्या हातात अभावाने दिसणारं शस्त्र, तर पाश आणि अंकुश ही नेहमी दिसणारी शस्त्र आहेत. गणपतीच्या एका हातातील कमळाचा उपयोग शस्त्राप्रमाणे करुन त्याने एका राक्षसाचा वध केल्याचाही उल्लेख आढळतो. कलियुगात प्रत्येकाला हवं ते देणारी आणि सर्वकाळ दातृत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी देवता म्हणजे गणपती. सध्याच्या काळात गणपती बाप्पाला आपल्याकडील समाजविघातक शक्तींना चांगली बुध्दी देण्यास सांगण्याची वेळ आली आहे. माणूसकी मागे पडत आहे. भ्रष्टाचार हा पावलोपावली बोकाळला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे जिवन कठीण होऊन बसले आहे. अच्छे दिन आणण्याची स्वप्ने आपले पंतप्रधान देत होते. मात्र त्यांचे हे दिन कधी येणार असा प्रश्‍न आम जनतेला पडला आहे. देशातील राजकारण व अर्थकारण गेल्या काही वर्षात पार ढवळून निघाले आहे. नरेंद्र मोदींकडून देवा मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. आता पुढील अडीज वर्षात ते फार मोठे काही करु शकतील असे दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच येणार हे नक्की. आपला देश सर्वात तरुण अस्लयाचे मोठ्या उत्साहानेम्हणतो, मात्र तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे आहे. याकामात सरकार मागे पडते आहे. देशाचा झपाट्याने विकास झाला पाहिजे. त्यासाठी राजकारण न होता सर्व पक्षांनी मिळून विकासाची कास धरली पाहिजे. प्रशासनाने वेगाने कामाला लागले पाहिजे. भ्रष्टाचाराची भोके बुजविली पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा कोकणातील आमचा चाकरमनी मोठ्या-मोठ्या खड्यातून प्रवास करुन तुमच्या पायाशी आला होता. पुढील दोन वर्षात रस्ता चार पदरी पूर्ण करण्याचे आश्‍वासन नितीन गडकरींनी जे आश्‍वासन दिले आहे त्यांच्या प्रयत्नांना बाप्पा तुम्ही बळ द्या. बाप्पा आता या भूतलावरच्या प्रत्येकाला सुबुध्दी देण्याची गरज निर्माण झाली आहे. बाप्पा त्याची सल तुमच्या मनात आहेच. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला घरातून सार्वजनिक ठिकाणी आणले व स्वातंत्र्याचे स्पुलिंग जागृत केले. आता बदलत्या काळात तुम्हाला नवीन भूमिका बजावायची आहे व लोकांचे जीवन सुखकर कसे होईल यासाठी सुबुध्दी द्यावयाची आहे...या वर्षी निरोप देताना आम्ही तुमच्याकडे ऐवढेच मागणे मागतो. पुढच्या वर्षी परत येताना यातील बहुतांशी प्रश्‍न सुटलेले तुम्हाला पहायला मिळतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो, देवा...
-------------------------------------------------------------------

0 Response to "पुढच्या वर्षी लवकर या..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel