-->
बुलेट ट्रेन पेक्षा हायस्पीड रेल्वेच योग्य

बुलेट ट्रेन पेक्षा हायस्पीड रेल्वेच योग्य

रविवार दि. १८ सप्टेंबर २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
बुलेट ट्रेन पेक्षा हायस्पीड रेल्वेच योग्य
-----------------------------------------
एन्ट्रो- बुलेट टे्रनच्या उभारणीसाठी एवढा खर्च करण्यापेक्षा त्याच निधीमध्ये आपल्याकडी अनेक रेल्वेचे रखडलेले प्रकल्प उभे राहू शकतात. आपल्यासारख्या विकसीत देशाला त्यामुळे बुलेट ट्रने नको तर हायस्पीड ट्रेन आवश्यक ठरेल असेच म्हणावे लागेल. हाय स्पीड रेल्वे वापरण्यामागे काही फायदे आहेत. एक तर सध्याच्याच रुळांवरुन ही रेल्वे जाणार आहे, त्यामुळे फार मोठा भांडवली खर्च काही करण्याची आवश्यकता येणार नाही. अशा प्रकारे आपण टॅल्गोच्या रेल्वेचा उपयोग केल्यास आपण अनेक मोठ्या मार्गांवरील अंतर कमी करु शकतो. आपल्या रेल्वेचा मार्ग जगात सर्वात मोठा असला तरीही आपल्याकडे अनेक जुन्या मार्गावरुन आपला रेल्वेचा प्रवास सुरु आहे. अनेक ठिकाणी आपल्याकडे रेल्वे पोहोचलेली नाही. त्यामुळे तेथील विकास रखडलेला आहे. अशा स्थितीत मुंबई-अहमदाबाद या एकाच मार्गावर अब्जावधी रुपये खर्च करणे काही शहाणपणाचे ठरणार नाही...
--------------------------------------------
हायस्पीड टॅल्गोची अंतिम चाचणी यशस्वी झाली असून या गाडीने दिल्ली-मुंबई अंतर १२ तासांपेक्षाही कमी वेळात पार केल्याने टॅग्लोच्या गाड्या आता आपल्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टॅल्गोने ताशी १५० कि.मी. वेगाने ११ तास ४८ मिनिटांत हे अंतर पार करत मुंबई सेंट्रल स्थानक गाठले. यापूर्वीच्या चाचणीत ही गाडी निर्धारित वेळेपेक्षा १८ मिनिटे उशिराने पोहोचली होती. मात्र यावेळी ती आपल्या चाचणीत पास झाली. राजधानी एक्स्प्रेसने मुंबई दिल्ली हे १४०० कि.मी.चे अंतर कापण्यासाठी १६ तास लागतात. हा प्रवास किमान चार तासांनी कमी करण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी वेगवान टॅल्गोच्या चाचण्या सुरू होत्या. ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारी ही गाडी एप्रिलमध्ये आयात करण्यात आली आहे. टॅल्गोची पहिली चाचणी उत्तर प्रदेशातील बरेली-मुरादाबाद व त्यानंतर उत्तर-मध्य रेल्वेच्या पलवल-मथुरा पट्टयात झाली. दोन ऑगस्टला दिल्ली-मुंबई दरम्यान टॅल्गोच्या पहिल्या चाचणीत मुसळधार पावसामुळे गाडीचा वेग कमी करण्यात आला होता. यापूर्वी सहा वेळा टॅल्गोची चाचणी घेण्यात आली. वेग आणि तांत्रिक निकष यशस्वी झाल्यानंतर या गाडीचे डबे खरेदी करण्याबाबत रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करणार आहे. टॅल्गो या स्पॅनिश कंपनीने बनवलेल्या गाडीला नऊ डबे असून ते वजनाने हलके आहेत. ते अल्युमिनियमपासून बनवण्यात आले आहेत. चाळीसच्या दशकात स्थापन झालेल्या या कंपनीने आता भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. टॅल्गोची काही वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडील सध्याच्या रेल्वे गाड्यात ही वैशिष्ट्ये नाहीत. ३० टक्के विजेचा कमी वापर, हलके कोच व वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गो २५० कोच भारतीय रुळांवर वापरले जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या इंजिनाला जोडून सध्या टॅल्गोची चाचणी सुरू आहे. या ट्रेनमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह व चार चेअर कारचे कोच आहेत. तसेच खानपानासाठी स्वतंत्र कॅफेटेरिया कोचही असेल. एकूणच पाहता टॅल्गोची रेल्वे वापरण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी होणार आहे. टॅल्गो वापरण्यासाठी आपल्याला सध्याच्या रुळांमध्ये काही बदल करण्याची गरज नाही किंवा नवीन मार्ग टाकण्याचीही आवश्यकता नाही. त्यामुळे कोणताही नवीन खर्च न करता रेल्वेला प्रवासाचा वेळ कमी करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट टे्रेनचे स्वप्न भारतीयांना दाखविले. मुबंई ते अहमदाबाद ही दोन शहरे जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरु करावयाची झाल्यास एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व त्याच्या उभारणीसाठी तब्बल सात वर्षे लागतील. एवढा खर्च करुनही त्याचा फार मोठा उपयोग होणारच नाही. कारण सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावर असणार्‍या विमान सेवेपेक्षा बुलेट ट्रेनचे तिकीट जास्त असल्यास या ट्रेनने जाणार कोण असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे बुलेट ट्रेनचे जरी स्वप्न पंतप्रधानांनी दाखविले असले तरीही ते प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे व प्रत्यक्षात उतरले तरी आपल्या देशाला ते परवडणारे नाही हे नक्की. बुलेट टे्रनच्या उभारणीसाठी एवढा खर्च करण्यापेक्षा त्याच निधीमध्ये आपल्याकडी अनेक रेल्वेचे रखडलेले प्रकल्प उभे राहू शकतात. आपल्यासारख्या विकसीत देशाला त्यामुळे बुलेट ट्रने नको तर हायस्पीड ट्रेन आवश्यक ठरेल असेच म्हणावे लागेल. हाय स्पीड रेल्वे वापरण्यामागे काही फायदे आहेत. एक तर सध्याच्याच रुळांवरुन ही रेल्वे जाणार आहे, त्यामुळे फार मोठा भांडवली खर्च काही करण्याची आवश्यकता येणार नाही. अशा प्रकारे आपण टॅल्गोच्या रेल्वेचा उपयोग केल्यास आपण अनेक मोठ्या मार्गांवरील अंतर कमी करु शकतो. आपल्या रेल्वेचा मार्ग जगात सर्वात मोठा असला तरीही आपल्याकडे अनेक जुन्या मार्गावरुन आपला रेल्वेचा प्रवास सुरु आहे. अनेक ठिकाणी आपल्याकडे रेल्वे पोहोचलेली नाही. त्यामुळे तेथील विकास रखडलेला आहे. अशा स्थितीत मुंबई-अहमदाबाद या एकाच मार्गावर अब्जावधी रुपये खर्च करणे काही शहाणपणाचे ठरणार नाही. पंतप्रधानांनी बुलेट ट्रेनचे स्वप्न हे निवडणुकीच्या काळात दिले होते. तशी त्यांनी अनेक स्वप्ने आपल्याला दाखविली होती. अगदी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासनही फोल ठरले आहे. अशा स्थितीत बुलेट ट्रेनचे दिलेले आश्‍वासन हे निवडणुकीच्या काळातले असल्याने भारतीय जनता त्यांना मोठ्या मनाने माफही करील व आम्हाला नको ती बुलेट ट्रेन असे सांगेल. आपल्याकडे ब्रिटीशांनी भारतीय रेल्वेचा पाया घातला. मात्र त्यानंतर त्यात काळाच्या ओघात जे बदल व्हायला पाहिजे होते ते काही झालेले नाहीत. त्यामुळे आपली रेल्वे काळाच्या ओघात बरीच मागे पडली आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी तिला केवळ एकाच मार्गावर बुलेट ट्रेनवर नेऊन ठेवण्यापेक्षा टॅल्गोसरख्या नवीन हाय स्पीड रेल्वे आणून सुरुवातीला तिचा वेग वाढवावा. त्यानंतर सर्व मार्ग ठीकठाक झाल्यावर बुलेट ट्रेनचा विचार करावा.
------------------------------------------------------------

0 Response to "बुलेट ट्रेन पेक्षा हायस्पीड रेल्वेच योग्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel