-->
बहुजनवादी राजकारणाची नांदी

बहुजनवादी राजकारणाची नांदी

संपादकीय पान शुक्रवार दि. ०८ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बहुजनवादी राजकारणाची नांदी
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अलिबाग येथे आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणांची म्हणजेच बहुजनवादी राजकारणाची नांदी झाली. रायगड जिल्हातील पुरोगामी घराणे म्हणून नावाजलेले व त्याची उज्वल परंपरा लाभलेल्या पाटील कुटुंबियांच्या साक्षीने व राज्यातील एक दुसरे पुरोगामी घराणे कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिवार्दाने राज्यातील राजकारण बदलाची नांदी आज दिली गेली. भविष्यात याचा दीर्घकालीन परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहे. शेतकरी, कामगार कष्टर्‍यांचा कैवारी असलेल्या व सहा दशकाची परंपरा लाभलेला शेतकरी कामगार पक्ष व राज्यातील बहुजनांच्या विविध संघटना एकत्रित येऊन काम करण्याचे झालेले हे सुतोवाच या राज्याची दिशा बदलू शकतो. महाराष्ट्रात काही तरी सर्वसामान्यांचा विचार करुन बदल घडतो आहे, हेच यातून सुचित होते आहे. अर्थातच हा बदल सकारात्मक असेल व राज्यातील बहुजनांच्या हिताचा असेल यात काहीच शंका नाही. महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण नेहमी म्हणतो परंतु खर्‍या अर्थाने बहुजनांचे राजकारण आपल्याकडे कोणत्याच पक्षाने केले नाही. आजवर सत्तेत असलेल्या लोकांनी बहुजनांचा केवळ वापर केला व त्यांना फारसा सत्तेत वाटाही दिला नाही तसेच त्यांच्या हिताचे निर्णयही घेतले नाहीत. त्यामुळे आपण राज्यातील एका मोठ्या वर्गाला उपेक्षितच ठेवले. आपल्याकडे संत तुकारामांपासून सुरु झालेली ही समतेची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासली. महाराजांनी या देशात पहिल्यांदा लोकशाहीची बिजे रोवली. खर्‍या अर्थाने रयतेचा राजा कसा असावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा व समतेचा नारा दिला. छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन समतेसाठी झगडा केला. या समाजातील सर्वात खालच्या थरातील माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला व घटना लिहून या देशाने भविष्यात कशी वाटचाल करावयाची याची आखणीच करुन दिली. या नेत्यांची ही विद्रोही परंपरा कष्टकरी बहुजनांच्या राजकारणाची दिशा आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून अनेक व्याख्या बदलण्याचे व घटना बदलण्यासाठीची पावले टाकली जात आहेत. यातील एक महत्वाचे म्हणजे समतेच्या ऐवजी समरसता या शब्दाचा सुरु झालेला प्रयोग. समता म्हटली की त्यात फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांची विचारधारा येते. समरसता म्हणजे फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या जोडीला हेगडेवार व गोळवलकर हे येणार आहेत. महाराष्ट्रातील पुरोगामी शक्ती हे कदापी सहन करणार नाहीत. जे मनूची विचारधारा मानतात ते समनता कधीच आणू शकणार नाहीत. कॉँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळल्याने जनतेने एक पर्याय म्हणून भाजपाला व मोदींच्या प्रचाराला बळी पडून त्यांनी पर्याय स्वीकारला. परंतु हा पर्याय नाही, तर खरा पर्याय कष्टकरी, बहुजनांतून आला पाहिजे हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळेच मराठा सेवा संघापासून सुमारे ३३ विविध संघटनांनी आता दंड थोपटले आहे. राज्यातील कष्टकरी, बहुजन समाज विखुरलेला आहे व त्यांची ताकद मोठी आहे. ही पोकळी शेकाप भरुन काढू शकतो. शेकापची पाळेमुळे रायगड जिल्ह्यात चांगलीच रुजली आहेत. पक्षाची जिल्ह्यावर जबरदस्त पकड आहे. अशा वेळी पक्षाने बहुजनांचा विचार मांडणार्‍या संघटनानां बरोबर घेतल्यास राज्यात एक वेगळे चित्र उभे राहू शकते. सध्या राज्यातील तरुणाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. तो काहीसा दिशाहीन झाल्यासारखा वागत आहे. उदारीकरणाची प्रक्रिया होऊन आता दोन दशके लोटली आहेत. आपली अर्थव्यवस्था आता मुक्त बाजारपेठेच्या दिशेने चालली आहे. अशावेळी तरुण पिढीला आपण नेमके काय करायचे याबाबत स्पष्ट कल्पना नाही. छत्रपती शाहू महाराजांनी मोफत शिक्षण दिले. आता मात्र राज्यकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यामुळे बहुजन व कष्टकरी समाजातील तरुणांना इंजिनिअर होण्यासाठी लाखो रुपयांची फी भरावी लागते. एवढी फी भरणेे प्रत्येकाला परवडतेच असे नाही. यासाठी शिक्षणाचा हा बाजार थांबला पाहिजे. तसेच आरोग्याचे आहे. सर्वांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. हे विचार घेऊन पुडे जाण्याची आज गरज आहे. तरुण पिढी आज बजबजपुरीमुळे कंटाळलेली असताना त्यांना त्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना पुरोगामी विचाराने बांधून पुडे नेण्याची गरज आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याचा केलेला वादा पोकळ निघाला आहे. भाजपाचे हे सरकार भविष्यात आपल्यासाठी फारसे काही करु शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. तरुणांना, कष्टकर्‍यांना व बहुजन समाजाला कॉँग्रेस नको आहे, भाजपाचे पितळही उघडे पडले आहे. अशावेळी शेकापसारखा पुरोगामी विचारांचे व्रत हाती घेतलेला पक्ष यात आपली स्पेस शोधू शकतो. आजच्या अलिबागच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे रणशिंग फुंकले गेले आहे. एका बहुजनवादी राजकारणाची नांदी सुरु झाली आहे. यातून एक नवा महाराष्ट्र घडविता येईल. मात्र त्यासाठी महाराष्ट्र घुसळून काढावा लागेल. सरकारविरोधी वातावरण तापण्यास सुरु झाले असताना त्याला एक योग्य दिशा द्यावी लागेल. अर्थातच ही ऐतिहासिक जबाबदारी आता शेतकरी कामगार पक्षावर व पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्यावर येऊन ठेपली आहे.
--------------------------------------------------------------------------

0 Response to "बहुजनवादी राजकारणाची नांदी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel