-->
संपादकीय पान मंगळवार दि. १९ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एका करुण कहाणीचा अंत
मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात गेली ४२ वर्षे खितपत पडलेल्या अरुणा शानबाग हिला अखेर नैसर्गिक मृत्यूने मरण आले. तिच्या मरणाने एका करुण कहाणीचा अंत झाला आहे. अरुणा शानबाग म्हटले म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार आपल्या डोळ्यासमोर उभे राहातात. गेली कित्यक वर्षे अशा प्रकारे मृत्यू शय्येवर असलेल्या अरुणाची या जगातून सुटका व्हावी यासाठी अनेकांनी तिला दयामरण देण्यात यावे यासाठी कोर्टात अर्ज केले परंतु न्यायालयाने ते कधीच मान्य केले नाही. शेवटी आपल्या कडील कायदाच श्रेष्ठ ठरला आणि तिला दयामरण नाही तर नैसर्गिक मृत्यूने गाठले. कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्या गावातून आलेली अरूणा लोकांच्या सेवेसाठी नर्स झाली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी प्रेमसंबंध जुळले आणि लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्‍या सोहनलाल वाल्मिकीनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नाही म्हटल्याचा त्याला राग आला. २३ नोव्हेंबर १९७३ हा दिवस अरुणासाठी आयुष्यातील काळा दिवस ठरला. कपडे बदलण्यासाठी म्हणून अरुणा तळघरात गेली असताना सोहनलालने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, द्रुष्टी, संवेदना सारं काही गेलं. शिल्लक राहिला तो तिचा मेंदू आणि श्वास. सोहनलालला पुण्यात अटक झाली, सात वर्षाची शिक्षाही झाली... दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नासाठी... प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. सोहनलालला बलात्कारासाठी शिक्षा झाली नाही. कारण आपल्यावर बलात्कार झाला असे न्यायालयात सांगण्यासाठी अरुणा उभीच राहू शकत नव्हती. सात वर्षांनी तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या. तेव्हापासून तीला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलेे.
ही कथा इथे संपत नाही तर सुरू होते. माणुसकीशून्य सोहनलालने केलेल्या या क्रुत्यानंतर सुरू होते ती माणुसकीचं दर्शन घडवणारी कथा. दिसावयास देखणी असलेली एकेकाळची अरुणा शानभाग केवळ एक जिवंत मृतदेह म्हणून शिल्लक राहिली. तिचे नातेवाईक हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे होते. त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यामुळे तिचा अशा स्थितीत सांभाळ करणे त्यांनाही शक्य नव्हते. परंतु ती जेथे नोकरी करीत होती त्या के.ई.एम.ने तिची जबाबदारी मोठ्या प्रेमाने उचलली. केईएमचे व्यवस्थापन, नर्स, डॉक्टरनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं. तिच्यावर ४२ वर्षं उपचार केले. तिची सर्व सेवा केली. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही. अरूणाबरोबर काम करणार्‍या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या. अरुणाचा प्रियकर डॉक्टरही रिटायर झाला. तोही तिला भेटायला कधी येत असायचा. प्रेम, माणुसकी, आपुलकी या बळावर माणूस कितीही वर्षं जगू शकतो असे म्हणतात. अरूणा ही फक्त सोहनलालच्या माणुसकीशून्य वागणुकीची कथा नाही... ती कथा आहे तिच्या इच्छाशक्तीची... ती बरी होईल, या डॉक्टरांच्या आणि स्टाफच्या दुर्दम्य आशावादाची आणि अशा अवस्थेतही तिला भेटायला येणार्‍या त्या डॉक्टरच्या निरलस प्रेमाची... आता मात्र अरुणाच्या निधनानंतर या सर्वांच्या आशा संपल्या आहेत. मध्यंतरी तिच्यावर पिंकी विराणी हिने अरुणाज् स्टोरी हे पुस्तक लिहिले. त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्द झाला. हे पुस्तक हातोहात खपले. पुस्तक प्रकाशित झाल्यावर पिंकीने तिला दयामरण द्यावे असा अर्ज न्यायालयात केला होता. पिंकीने पुस्तक लिहीताना जे अनुभवले, जे विदाररक वास्तव अनुभवले, याचा शेवट व्हावा व मृत्यूशैय्येवर असलेल्या अरुणाला मुक्ती मिळावी या हेतूने हा अर्ज केला. त्यावेळी के.ई.एम.च्या व्यवस्थापनाने ठणकावून सांगितले होते की, आम्ही अरुणा शानबाग कितीही काळ जगो तिची सेवा करीत राहू. आम्हाला तिला पोसणे जड झालेले नाही. शेवटी न्यायालयाने तिला दयामरण द्यायला नकार दिला होता. जरी दयामरण दिले असते तरी के.ई.एम.ने तिला जगूनच दिले असते. अरुणाच्या निमित्ताने दयामरण असावे की नसावे हा मुद्दा चर्चिला गेला होता. न्यायालयाने त्यावेळी आपल्या बाजूने नाही असे उत्तर दिले असले तरीही दयामरणाचा मुद्दा पूर्णपणे निकालात लागलेला नाही. आज अरुणाच्या बाजूने के.ई.एम.सारखे रुग्णालय ठामपणे उभे राहिल्याने तिला ४२ वर्षे या अवस्थेत का होईना जगता आले. पण असे अन्य एखाद्याच्या बाबतीत होईलच असे नाही, हे वास्तव आपण विसरु शकत नाही. अरुणावर ४२ वर्षापूर्वी बलात्कार झाला आणि त्याच्या वेदना तिने ऐवढ्या काळ सोसल्या. त्याउलट तिच्यावर बलात्कार करणारा सोहनलाल वाल्मिकी मात्र सात वर्षांनी सुटला व नाव बदलून दुसर्‍या रुग्णालयात कामासही लागला. आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांशी किती निदर्यपणे वागते याचे यथार्त दर्शन यातून होते. अरुणा कोमात गेल्याने तिचा केवळ श्‍वास व मेंदू शिल्लक होता. संवेदना संपल्या होत्या. तिच्यावर बलात्कार झाला त्यावेळी तिच्या सर्व संवेदना संपल्या होत्या. मात्र वयानुसार तिच्यात बदल होत गेले. शरिरावर वार्धक्य दिसू लागले होते. तिचे केस पांढरे झाले होते, सुरकुत्यांची जाळी आली होती, तिचा श्वास आणि ह्रदय सुरू होतेे... एवढीच तिची जिवंतपणाची ओळख, बाकी तिच्यासाठी काळ थांबला होता १९७३ मध्ये... परंतु माणसाची वेडी आशा काही सुटत नव्हती. आता मात्र तिच्यासाठी काळ पूर्णपणे थांबला आहे. एका अत्याचारित महिलेचे जिणे कसे असते व त्याचा शेवट कसा होतो हे अरुणाने स्वत: दाखवून दिले आहे. आपल्या समाजातील एका करुण कहाणीचा अंत झाला आहे. तिची सेवा करणारे के.ई.एम. देखील क्षणभर स्तब्ध झाले आहे.
-----------------------------------------------------      

 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel