-->
जातीपातीचे राजकारण न करणारा नेता

जातीपातीचे राजकारण न करणारा नेता

जातीपातीचे राजकारण न करणारा नेता
आ. जयंत पाटील

सुनील तटकरे हे मला समवयस्क असले तरी माझ्यानंतर दहा वर्षांनी सक्रिय राजकारणात आले. त्यांनी ८५ साली विधानसभेची पहिली निवडणूक लढविली. त्यात त्यांचा शेकापचे भाई सावंत यांनी पराभव केला. मात्र त्या पराभवाने खचून न जाता त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरुच ठेवली. शेकापच्या चिवट व कडवट कार्यकर्त्यांच्या संघर्षात त्याच पद्धतीने आम्हाला त्यांनी झुंज दिली. त्यावेळी जिल्ह्यात शेकाप व कॉंग्रेस हे दोनच पक्ष अस्तित्वात होते. कॉंग्रेसकडे दक्षिण रायगडमध्ये मातब्बर नेते मंडळी होती. त्यांच्यासोबत कधी संघर्ष, कधी तडजोड, कधी आपल्याला बरोबर सामावून घेत तटकरे यांनी कॉंग्रेसमध्ये आपली यशस्वी वाटचाल सुरुच ठेवली. सुनील तटकरेंचे हे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. तसेच त्यांच्या स्वत:च्या जातीची अर्धा टक्केही मते नसताना जे जातीपातीचे राजकारण करीत त्यांच्यावर मात करुन त्यांनी १९९१ पासून जे यशस्वी राजकारण सुरु केले ते आजतागायत. कितीही संकटे आली, कितीही टिका झाली तरी शांतपणे त्यावर मात करणे हा त्यांचा स्वभाव आहे. हे खरोखरच उल्लेखनीय आहे. ज्या गवळी समाजाचे ते आहेत त्या समाजाचे माणगाव, रोहा या तालुक्यात दोन-तीन हजारही मते नाहीत. मात्र सर्व जातीधर्मीयांमध्ये त्यांच्या बरोबरीने राहून त्यांची कामे करुन आपले स्थान त्यांनी बळकट केले. हे कौतुकास्पद आहे. म्हणून आज जे जातीपातीचे, धर्माचे राजकारण सुरु आहे त्यावर मात करायची असेल तर अशा नेतृत्वाची समाजाला आज गरज आहे. भावनेच्या भरात राहून समाजाला आपल्या स्वार्थासाठी चुकीची दिशा दाखविणे व विकासापासून वंचित ठेवणे ही प्रवृत्ती राजकारणात वाढली आहे. ती थांबविण्यासाठी सुनील तटकरे आपल्या पुढील आयुष्यात प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे. सध्या तरुण पिढीचा भ्रमनिरास झाल्यासारखी स्थिती आहे. ते पाहिल्यावर प्रामुख्याने तरुणांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजात विष पेरुन ज्या शक्ती वाढू पाहत आहेत ते थांबविण्याचे काम सुनील तटकरे भविष्यात करतील अशी माझी अपेक्षा आहे.
तसा मी स्वत: आणि सुनील तटकरे हे राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक. अनेक वेळा आम्ही दोघांनीही परस्परांवर घणाघाती टिका केली. अनेकदा संघर्षमय वातावरणात राजकारण केले. परंतु व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध कधीही आम्ही दुरावले नाहीत. मी थोडा आक्रमक आहे असे मला वाटते. अनेक वेळा सुनील तटकरे मंत्री असताना सभागृहात शासनाच्या विरोधात मी माझ्या पद्धतीने टिका करायचो. भाषण संपल्यावर खाली बसल्यावर हेच तटकरे माझ्याकडे येऊन चॉकलेट मागायला कधीही विसरले नाहीत. सभागृह बराच वेळ चालत असल्यामुळे त्यावेळी डुलकी येऊ नये म्हणून आम्ही चॉकलेट चघळतो. सुनील तटकरेंना याची कल्पना आहे आणि ते त्यामुळेच चॉकलेट माझ्याकडे हक्काने मागायला येतात. हे पाहिल्यावर माझे सभागृहातले अन्य सहकारी म्हणायचे, अरे तुम्ही एवढे भांडता आणि एकत्र येऊन चांगली मैत्री असल्यासारखे वागता हे काही कोडे उलगडत नाही. परंतु हे खरेच आहे. राजकारण हे ठराविक मर्यादेपर्यंत ठेवण्याची परंपरा या जिल्ह्यात आमच्या आधीच्या पिढीने केली व आम्हीही ते करत आहोत व पुढील पिढीने ते करावे अशी माझी अपेक्षा आहे, तटकरेंचीही त्याला सहमती असेल.
बॅ. अंतुले साहेबांच्या तालमीत तयार झालेल्या तटकरेंनी कॉंग्रेस दुंभगल्यावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचे ठरविले तोच त्यांच्या आयुष्यातील राजकीय कलाटणी देण्याचा निर्णय ठरला. या निर्णयामुळेच त्यांचे नेतृत्व राज्य पातळीवर पोहोचले तसेच मंत्रीमंडळातही त्यांना स्थान मिळाले. शरद पवार साहेबांचा त्यांच्यावर असलेल्या आशीर्वादामुळे त्यांचे पुढील राजकीय भविष्यही उज्ज्वलच असेल असा मला विश्‍वास वाटतो. अंतुले साहेबांकडे मी महिन्यातून एखादी तरी घरी फेरी मारायचो. जुने राजकारण, जुन्या आठवणी यावरील चर्चा अंतुले साहेबांना आवडायची. अंतुले साहेब एक दिलदार, अभ्यासू राजकारणी होते. त्यांचे श्रीवर्धन मतदारसंघावर खरे प्रेम होते. मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ विभागला गेला आणि त्याचा काही भाग रोह्यापर्यंत आला. त्यानंतर सुनील तटकरे यांनी या मतदारसंघाची बांधणी अशी केली की, ती कुणालाच कळली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीपातीचे अनेक कार्यकर्ते एकत्र बांधून हा मतदारसंघ त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला. याची खंत अंतुलेंना होती. ते माझ्याकडे नेहमी म्हणायचे, माझा श्रीवर्धन मतदारसंघ हातातून गेला. सुनील तटकरेंनी कर्तबगारी व कामाच्या जोरावर या मतदारसंघाची पुर्ण बांधणी करुन हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यातील हा एक विक्रमच म्हटला पाहिजे.
राजकारणात जय-पराजय हे होतच असतात. पण त्यामुळे खचून न जाता काम करणारा नेता म्हणजे सुनील तटकरे. हे मला मनमोकळेपणाने कुठलाही मनात किंतु न ठेवता मांडावेसे वाटते. त्यांनी स्वत:च्या मुलाला व मुलीला राजकीयदृष्ट्या चांगले घडविल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करेन. त्यांच्या ६१ व्या वाढदिवसा दिवशी माझ्या त्यांना शुभेच्छा व त्यांना दीर्घायुष्य चिंतीतो.

0 Response to "जातीपातीचे राजकारण न करणारा नेता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel