-->
राजकीय सोय

राजकीय सोय

संपादकीय पान शनिवार दि. ०९ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राजकीय सोय
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या विरोधात आता जनमत तयार होण्यास सुरुवात झाल्यावर आपल्या आघाडीतील सहकारी पक्षांना जशी मंत्रिपदे बहाल केली त्याच धर्तीवर राज्यातही फडणवीस सरकारनेही आपल्या मित्र पक्षांना दोन नर्षाहून जास्त काळ झुलवत ठेवल्यावर आता मंत्रीपद दिले आहे. भाजपाने हा मंत्रिमंडळ विस्तार करताना शिवसेनेला केवळ दोनच राज्यमंत्री पदे देऊन त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. काहींना जवळ करायचे तर काहींना नाकारायचे अशी निती भाजपाने आपल्या मित्रपक्षांच्या बाबतीत आखले आहे. ६ कॅबिनेट व ५ राज्यमंत्री अशा एकूण ११ मंत्र्यांना आज शपथ देण्यात आली. त्यात शिवसेनेला दोन राज्यमंत्री पदांची भीक घालण्यात आली आहे. अर्थातच त्यात समाधान मानण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तरी देखील उद्दव ठाकरे यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत खलबते केली. ही मंत्रीपदे नाकारली तर तेलही गेले व धुपाटणेही गेले, अशा भीतीपोटी शेवटी ही खाती स्वीकारण्याचा निर्णय झाला असावा. शिवसेना गेले काही दिवस आक्रमक बनून भाजपाच्या विरोधात गरळ ओकीत होती. आपल्या अशा वागण्यामुळे आपल्याला भविष्यात काही चांगली खाती मिळतील अशी त्यांची अटकळ होती. परंतु त्यांचा हा अंदाज भाजपाने पूर्णपणे खोटा ठरविला. पाहिजे असेल तर घ्या नाही तर सोडून द्या, अशी भूमिका भाजपाने घेतल्याने शेपटी घालून ही मंत्रीपदे स्वीकारली. आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे नाराज झाले आहे. त्यामुळे ते आमदारकीची शपथ घेण्यासाठी गेले नाही. भाजपने आश्वासन पाळलं नसल्याचे मेटे यांनी आरोप केला आहे. मेटे यांचे काही चुकले नाही. त्यांना मंत्रीपद भाजपाने दिले नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. आता पुढील विस्तारापर्यंत वाट पहाणे त्यांच्या नशिबी आले आहे. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला घेऊ नये, हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय आहे. परंतु, शिवसंग्राम पक्षाला दिलेले आश्वासन भाजपने पाळलं नसल्याचे शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची लॉटरी लागली आहे. जानकर यांचे कॅबिनेट मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महादेव जानकरांनी शपथ घेण्याआधी छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, विवेकानंद आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. जानकर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकरपाटील आणि सुभाष देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपचे आमदार मदन येरावार, रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्वाभिमानी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. अशा प्रकारे या विस्ताराव्दारे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई म्हणजे डोंबिवली यांचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधीत्व वाढले आहे. भाजपाने आपल्या सहकारी पक्षांच्या मंत्रीपदाच्या मागण्या पूर्ण करण्याचा या विस्ताराव्दारे काहीसा प्रयत्न केला आहे. परंतु यातून धूसफूस वाढणार आहे. कारण सहकारी पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्या काही भाजपा सध्यातरी पूर्ण करेल असे दिसत नाही.

0 Response to "राजकीय सोय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel