-->
आय.टी. नोकर्‍यांवर गंडांतर

आय.टी. नोकर्‍यांवर गंडांतर

संपादकीय पान शनिवार दि. ०९ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आय.टी. नोकर्‍यांवर गंडांतर
माहिती-तंत्रज्ञान अर्थात आय.टी. क्षेत्र म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी. दरमहा लाखो रुपयांची नोकरी व प्रतिष्ठा देणार्‍या या क्षेत्राला सर्वाधिक बेकारीचे धक्के बसण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे येत्या पाच वर्षात ६.४ लाख कुशल अभियंत्यांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी एच.एफ.एस.ने आपला संशोधन अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतातील माहिती-तंत्रज्ञान व बीपीओ क्षेत्रातील नोकर्‍या धोक्यात येणार आहेत. कारण या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणार आहे. या क्षेत्रात स्वयंचलन पद्धतीचा वापर वाढला आहे. त्यामुळे आऊटसोर्सिंगचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील नोकर्‍यांवर मोठया प्रमाणावर गदा येण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या दोन दशकांपासून भारतात सेवा उद्योग वाढत आहे. मात्र, आता त्याला फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक बडया कंपन्यांना मोठा नफा टिकवायचा आहे. मात्र त्यासाठी ते कर्मचार्‍यांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. मात्र, भविष्यात अभियांत्रिकी सेवांना मोठी मागणी असेल. स्वयंचलन पद्धतीमुळे अमेरिकेतील ७.१ लाख व ब्रिटनमध्ये ७.२ लाख नोकर्‍या बंद होणार आहेत. प्रत्येक दशकात नोकर्‍यांचे स्वरुप हे बदलते असते. गेल्या दोन दशकात आय.टी. उद्योगाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे जसे रोजगार निर्मिती झाली तशीच रोजगारांना आळाही बसला. आपल्याकडे आता यातूनच रोजगार निर्मितीची क्षेत्रे बदलत जातील. शेती हे आपल्याकडील सर्वात जास्त रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र होते. आता त्यात मोठ्या प्रममावर आधुनिकीकरण झाल्याने येथील कामांवर मर्यादा येणार आहेत. एकेकाळी शिक्षकाची भूमिका शिकविण्यात मोठी होती. मात्र आता शिकविण्याचे ऍप निघाल्यामुळे शिक्षकांवरही बेकारीची कुर्‍हाड येऊ शकते. अजून काही काळाने शिक्षणासाठी महाविद्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. घरातच इंटरनेटव्दारे शकिता येणार आहे. अनेक कारखाने हे मोठ्या प्रमाणात रोजगार देतात. मात्र आता अनेक ठिकाणी माणसाच्या जागी रोबो येण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. जगभरात अर्थात हा ट्रेंड येण्यास अजून एक दशक लागेल. एवढेच कशाला आता ऑपरेशन हे देखील रोबो करु लागले आहेत. त्यामुळे डॉक्टरांचीही गरज काही मर्यादेपर्यंत भासेल. एकूणच रोजगाराबाबत जगाला ट्रेंड बदलत आहे. एखादा रोजगार कमी झाला तरी दुसरीकडे रोजगार निर्मिती होणार आहे. जगातील हा बदल आपल्याला अभ्यासावा लागेल व त्यानुसार आपल्याला आपल्यात बदल करावे लागतील.
----------------------------------------------------------------

0 Response to "आय.टी. नोकर्‍यांवर गंडांतर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel