-->
मानवतेचा दूत

मानवतेचा दूत

संपादकीय पान सोमवार दि. ११ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मानवतेचा दूत
भारतात जन्मलेल्या व फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ९२ वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी केवळ समाजसेवा केली. पिडीतांना आश्रय दिला. भारतात फाळणी झाली त्यावेळी त्यांचे हृदय पिळवटून निघाले. यातून मानवतेला काही बोध घेता येईल व मनुष्यातील ही दरी कमी करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यांनी आपले जीवन केवळ कोणत्या धर्माच्या उन्नतीसाठी नव्हे तर मानवजीतीच्या फायद्यासाठी वेचले. ज्याप्रकारे मदर तेसेसा यांनी आपले जीवन दीनदुबळ्यासाठी वेचले त्याच धर्तीवर ईधी यांनी समाजातील गरजवंतांना मदतीचा हात दिला. यात त्यांना अनेकदा बरे-वाईट अनुभव आले परंतु त्यातून त्यांनी कधीही माघार घेतली नाही. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या ईधी यांच्यावर कराचीतील मेडिकलमध्ये उपचार सुरू होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. १ जानेवारी १९२८ साली भारतातील बंतवा येथे जन्म झाला मात्र फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. ईधी यांनी लहान वयातच आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेत गरीबांसाठी काम सुरू केले होते. जवळपास ६० वर्षांपूर्वी त्यांनी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरूवात केली. त्यानंतर अनाथाश्रम, नर्सिंग होम, दवाखाने, वुमन शेल्टर व पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी गरजू व गरीबांची सेवा केली व त्यासाठी ईधी फाऊंडेशनचीही स्थापना केली. पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये ईधी फाऊंडेशनचे काम अव्याहतपण सुरू आहे. १९४८ साली अब्दुल सत्तार ईधी यांनी मिठादर येथे धर्मदाय दवाखाना सुरु केला. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांसाठी सेवा-सुविधा पुरवत त्याचं मोठे जाळे विणून गरजूंची अथक मदत केली. निस्वार्थ व निरलसपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी ईधींनी उभारली. भूकंप, पूर यासारखे निसर्गनिर्मित वा कोणतेही मानवनिर्मित संकट असो, संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची मदत पोहोचण्या अगोदर ईधी फाऊंडेशनचे कार्यकर्ते मदतीस पोहोचलेले असतात. ईधी फाऊंडेशनतर्फे ज्यांचे या जगात कोणीच नाहीत अशांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम हाती घेतले. विशेष बाब म्हणजे ईधी फाऊंडेशनने कोणताही राजकीय पक्ष वा नेत्यांकडून आजवर कधीच देणगी स्वीकारली नाही. मानवतेसाठी अखंड झटणार्‍या अब्दुल सत्तार ईधी यांना १९८६ साली मानाचा समजला जाणारा रॅमन मॅगेसेसे, तर १९८८ साली मलेनिन पीस प्राईज पुरस्कार देण्यात आला. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. भारतातून  
अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताला ईधी यांनीच सांभाळले होते, ते तिला आपल्या मुलीसारखेच मानत असत. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सना लाहोर रेल्वेस्थानकावर आलेल्या समझोता एक्स्प्रेसच्या एका डब्यात गीता एकटीच बसलेली आढळली होती. पोलिसांनी तिला लाहोरमधील इधी फाऊंडेशनच्या स्वाधीन केले होते आणि नंतर तिला कराचीला नेण्यात आले होते. त्यानंतर अखेर पालकांची ओळख पटल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गीता भारतात परतली होती. अशा प्रकारे मानवतेचा हा दूत जाती, धर्माच्या व जगाच्या सीमा पार करुन केवळ वंचितांसाठी काम करीत होता. ईधी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांनी करुन ठेवलेले काम अनेकांनी प्रेरणादायी ठरेल व त्यातून अनेक ईधी तयार होतील.

0 Response to "मानवतेचा दूत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel