-->
अस्वस्थ मुंबई कॉँग्रेस

अस्वस्थ मुंबई कॉँग्रेस

संपादकीय पान गुरुवार दि. ०९ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अस्वस्थ मुंबई कॉँग्रेस
माजी केंद्रीयमंत्री आणि कॉंग्रेसचे मुंबईतील बडे नेते गुरुदास कामत यांनी सोमवारी रात्री कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई कॉँग्रेसला एक मोठा धक्काच बसला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जेमतेम एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना कामत यांनी राजीनामा दिल्याने हा धक्का सर्वात मोठा समजला जातो. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे कामत हे गांधी कुटुंबियांच्या विश्‍वासातले समजले जातात. त्यांच्या राजीनाम्यापाठोपाठ मुंबईतील त्यांचे समर्थक असलेले मुंबईतील कॉँग्रेसचे २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कामत यांच्या घराबाहेर येऊन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी परत कॉंग्रेस पक्षात सक्रिय व्हावे, अशी मागणी केली. मात्र कामत अजूनतरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत व आता यापुढे समाजकारण करु असा त्यांचा निर्धार कायम आहे.  गेली ४४ वर्षे कॉंग्रेस पक्षात काम केलेले आणि पाच वेळा मुंबईतून लोकसभेवर निवडून गेलेल्या गुरुदास कामत यांची मुंबईत ताकद बर्‍यापैकी आहे. निदान त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. कामत यांनी एवढा मोठा निर्णय घेताना आपल्या समर्थक कार्यकर्त्यांनाच सोडा पण बड्या नेत्यांना थांगपत्ता लागू दिला नाही. गुरुदास कामत सध्या पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे गुजरात आणि जयपूर या राज्यांचे प्रभारीपद होते. अर्थातच त्यांच गेले वर्षभर नाराजी होती. सहसा ते जाहीर कार्यक्रमात दिसत नव्हते. राहूल गांधींच्या मुंबईतील सभेला मात्र उपस्थित होते. त्यांच्या या राजीनाम्यामुळे मुंबई कॉँग्रेसमधील अस्वस्थता उफाळून वर आली आहे, असाच त्याचा अर्थ आहे. राहुल गांधी यांनी संजय निरूपम यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद सोपविल्यापासून कामत यांच्या गटाचे खच्चीकरणाचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राजीव व सोनिया गांधी यांच्याशी जवळिक राहिलेल्या व कॉंग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेले कामत यांची सध्या पक्षात घुसमट होत होती. त्यातच येत्या काही महिन्यात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधी विराजमान होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राहुल गांधी आपल्या नविन व तरूण टीमसह पक्षाचा विस्तार करू पाहत आहेत. दीर्घकालीन विचार करून राहुल यांनी तरूणांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या व अनुभवी नेत्यांना राहुल यांच्या टीममध्ये स्थान असणार नाही. त्यामुळे कामत यांच्यासह कॉंग्रेसच्या १० सरचिटणीसांनी राजीनामे सोनिया यांच्या सोपविल्याचे बोलले जात आहे. राहुल यांच्या टीममध्येही आपल्याला फारसे भविष्य नाही तसेच मुंबईतही निर्णय घेताना पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना झाल्याने त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. मुंबई कॉँग्रेसमध्ये सध्या देवरा गट, कामत गट व आता निरुपम गट असे तीन गट प्रामुख्याने सक्रिय आहेत. यात गटातून परस्परांचे काटे काढण्याचे उद्योग सुरु असतात. त्यात केंद्रात व राज्यात सत्ता नसल्याने पक्ष दुबळा झाला आहे. पक्षातून अनेक नेते बाहेर जात आहेत. सध्याचे अध्यक्ष संजय निरुपम हे शिवसेनेतून आलेले आहेत. त्यांच्याकडे अजूनही बाहेरुन आलेले नेते म्हणून पाहिले जाते. तसेच निरुपम यांची आक्रमक शैली असल्यामुळे ते फक्त आपल्याच गटातील मंडळींना पुढे करीत असतात. अलिकडेच त्यांनी अनेक ब्लॉक समित्यांच्या नियुत्या परस्पर कोणालाही विश्‍वासात न घेता केल्या. त्यातून पक्षात नाराजी आहे. निरुपम हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते नाहीत. यापूर्वी मुरली देवरा व गुरुदास कामत यांनी गटांचे राजकारण केले असले तरीही प्रत्येक गटातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाऊन राजकारण केले आहे. अर्थात अशा प्रकारे निवृत्ती स्वीकारण्याची कामत यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी मंत्री असतानाही राजीनामा दिला होता. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचा आदर राखून ते आपला निर्णय बदलतील व आपला मुंबईतील कार्यकत्यार्ंंचा दबावगट आगामी निवडणुकांसाठी तयार करतील, असा अंदाज आहे. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, गुरुदास कामत आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर कॉँग्रेसला आगामी निवडणूक कठीण जाईल हे मात्र नक्की.

0 Response to "अस्वस्थ मुंबई कॉँग्रेस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel