-->
आश्‍वासनांची एक्स्प्रेस

आश्‍वासनांची एक्स्प्रेस

संपादकीय पान शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आश्‍वासनांची एक्स्प्रेस
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढील आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात अनेक आश्‍वासनांचीच एक्स्प्रेस वेग घेताना दिसली आहे. प्रत्यक्षात अनेक प्रकल्प अपूर्ण असाताना त्याची पूर्तता करावी व नवीन प्रकल्प हाती घ्यावेत असे करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धर्तीवर आश्‍वासनांची खैरात करण्यात आपणही कमी नाही असे प्रभूंनी दाखवून दिले आहे. खरे तर कोकणाचे सुपूत्र असलेले सुरेश प्रभू हे काही राजकारणी नाहीत, परंतु त्यांनाही रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना राजकीय आश्‍वासनांनी खैरात करण्याकडे कल दाखविला. सर्वात महत्वाची दिलासादायक बाब म्हणजे प्रभू यांनी कोणतीही करवाढ न केल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र गेल्या काही वर्षात अर्थमंत्री अर्थसंकल्पात दरवाढ करण्याऐवजी नंतर मध्येच दरवाढ करणे पसंत करतात. कदाचित प्रभूंनी देखील असाच विचार केला असावा. कारण अर्थसंकल्पात दरवाढ करुन विरोधकांच्या हाती कोलित देण्याऐवजी नंतर केलेली दरवाढ केव्हांही सरकारच्या दृष्टीने बचावात्मक ठरते. असो. मुंबईकरांना मात्र प्रभू यांनी चर्चगेट ते विरार व सी.एस.टी. ते पनवेल असा एलिव्हेटेड मार्ग सुरु करण्यास मान्यता देऊन एक मोठा दिलासा दिला आहे. अर्थात हे दोन्ही प्रकल्प खरे तर गेली दहा वर्षे गाजत आहेत. परंतु या प्रकल्पांचे घोंघडे रेल्वेच्या दरबारी भिजत पडले होते. शेवटी प्रभू हे मुंबईचे असल्याने व त्यांना मुंबईकर लोकल प्रवाशांच्या हालअपेष्टांची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविला. मात्र यासाठी कीती निधी लागणार व तो निधी कसा उभारणार हे काही स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर देशातील विविध बंदरे रेल्वेला जोडण्यासाठी जे कोणी खासगी उद्योजक येतील त्यांच्याबरोबर सहकार्य करार करुन हे प्रकल्प बी.ओ.टी. तत्वावर उभारण्याचे ठरविले हा एक निर्णय स्वागतार्ह आहे. अर्थातच याचा फायदा कोकणासह देशातील किनारपट्टीला होईल. हमसफर, तेजस, उदय, अंत्योदय अशा नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्याचा ठेवलेला प्रस्ताव चांगला असला तरीही सध्याच्या रेल्वे गाड्या अधिक कार्यक्षमतेने चालविण्याची गरज होती. दरवर्षी रेल्वेमंत्री नवीन गाड्या सुरु करतात व टाळ्या घेतात, मात्र विद्यमान चालू असलेल्या गाड्या रखडत असतात. त्यापेक्षा रेल्वेमंत्र्यांनी नवीन गाड्या सुरु करण्याचा मोह टाळून सध्याच्याच गाड्या चांगल्यारितीने कशा चलविल्या जातील हे काही काळ बघणे गरजेचे आहे. कुलींचे नव्याने केलेेले नामकरण, गरीबरथचे नाव बदलणे अशा प्रकारच्या काही दिखावू अनावश्यक बाबीही या अर्थसंकल्पात आहेत. भारतीय रेल्वे ही आता कर्मचार्‍यांचा विचार करता भारतीय लष्कराहून मोठी झाली आहे. रेल्वेची कर्मचार्‍यांची संख्या आता १३ लाखाहून जास्त झाली आहे. अर्थातच ही बाब अभिमानास्पद असली तरीही रेल्वे कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. मेक इंडियात दोन कारखाने रेल्वे उभारणार आहे. मात्र त्यासाठी निधी कुठून आणणार त्याचा विचार केलेला नाही, असेच दिसते. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचे कामकाज लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा यात करण्यात आलेली आहे. यासाठी किमान खर्च एक लाख कोटी रुपये होणार आहे. मात्र एवढा खर्च एकाच प्रकल्पावर करणे कितपत फायदेशीर आहे याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण याच एक लाख कोटी खर्चात संपूर्ण देशातील रेल्वेचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण होऊ शकते अर्थात त्याची सध्या आपल्या देशाला गरज आहे. परंतु पंतप्रधानांच्या निवडणुकीतील लोकप्रिय घोषणेची पूर्तता करण्यासाठी आता रेल्वेमंत्र्यांना हा खर्च करावा लागत आहे. बुलेट ट्रेन आपल्याला सध्या परवडू शकणार नाही. त्यापेक्षा त्याच खर्चात रेल्वेचे आधुनिकीकरण करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे. सध्या रेल्वेला केवळ लोकप्रिय घोषणांची किंवा अत्याधुनिक जगातल्या सुविधांची गरज नाही तर किमान प्राथमिक चांगल्या सुविधा पुरविणे, सध्याच्याच मार्गावर बदल करुन तेथे अधिक वेगाने कशा गाड्या धावतील ते पाहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आज आपल्या रेल्वेतील अनेक मार्गांचे विद्युतीकरण करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चातही बचत शक्य होणार आहे. तसेच अनेक मार्गांचे रुपांतर ब्रॉड गेजमध्ये करावे लागणार आहे. आजच्या भारतीय रेल्वेची ही प्राथमिकता आहे. या प्राथमिकतेला गुंडाळून उगाचच काही झटपट करुन दाखविण्याच्या नादात रेल्वे सुधारु शकणार नाही. तर ती तात्पुरती मलमपट्टी ठरेल. अशाच मलमपट्टी प्रभूंनी केली आहे. अर्थात प्रभूंसारख्या विचार करणार्‍या विद्दान माणसाला हे कळतही असेल परंतु पंतप्रधानांच्या किंवा पक्षातील राजकीय दबावामुळे त्यांना काही करता येत नसेलही. त्यामुळे अर्थमंत्र्यांची ही आश्‍वासनांची एक्स्प्रेस फार काही करुन दाखवेल असे दिसत नाही.
---------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "आश्‍वासनांची एक्स्प्रेस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel