-->
इसिसचा वाढता धोका

इसिसचा वाढता धोका

संपादकीय पान गुरुवार दि. ०४ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
इसिसचा वाढता धोका
मुंबईपासून जवळ निसर्गसंंपन्न, निर्मनुष्य, शांत असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात घातपात करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचे केंद्र उभारण्याचा इसिस या अतिरेकी संघटनेचा मनसुबा होता, अशी धक्कादायक माहिती गेल्याच आठवड्यात प्रसिध्द झाली होती. ही उपलब्ध झालेली माहिती पहाता इसिस आता आपल्या दारी पोहोचली असून त्याचा वाढता धोका ही मोठी डोकेदुखी भविष्यात ठरणार आहे. देशभरात इसिसच्या संशयित अतिरेक्यांचे अटकसत्र सुरु झाले. यात, राज्यातील व देशातील २० जण जाळ्यात आले. त्यांंची चौकशी सुरु झाल्यानंतर धक्कादायक मनसुबे समोर आले होते. यात, घनदाट जंगल, डोंगररांगा आणि कर्नाळ्याचं पक्षी अभयारण्य हा भाग इसिसने आपल्या ट्रेनिंग कॅम्पसाठी निवडल्याची माहिती तपास यंत्रणांंच्या हाती आली आहे. धक्कादायक म्हणजे उत्तरप्रदेशात अटक झालेला संशयित अतिरेकी २० वर्षांचा रिझवान हा उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरचा असून तो या जागेची पाहणी करण्यासाठी आला होता.  अटक केलेल्या इसिसच्या संशयित अतिरेक्यांनी ही माहिती तपास यंत्रणांना दिली आहे. फक्त रिझवानच नाही, तर इतर सर्वजण या जागेची पाहाणी करण्यासाठी जाणार होते. यानंतर ही जागा इसिसचं देशातील पहिलं ट्रेनिंंग सेंटर बनणार होती. रिझवाननं पाहाणी केलेेली कर्नाळा अभयारण्यातील जागा इतरही सदस्यांनाही पहायची उत्सुकता होती. त्यात मुंब्र्यातून पकडला गेलेला मुदब्बीर शेख, औरंगाबादेतून पकडलेला इमरान पठाण यांचाही समावेश होता. या अतिरेक्यांना इथे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घ्यायचे होते आणि त्यासाठीच त्यांंना ही जागा हवी होती. इसिस भारतात आपली पाळंमुळं मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मुंबईचं प्रवेशद्वार असलेलं पनवेल हशहरात यापूर्वीं कधीही अतिरेकी कारवायांमुळे तणाव नव्हता. अतिरेकी कारवायांसाठी मुंबईच्या आसपास जागा निश्चित करण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अतिरेक्यांनी मुंबईच्या आसपास आसरा घेतला होता. इसिसला भारतामध्ये मोठ्याप्रमाणात घातपात करायची योजना आहे. त्यासाठीच एका गुप्त जागेची गरज होती आणि त्यासाठीच या जागेची निवड झाली होती, हे आता उघड झाले आहे. देशातील तपास यंत्रणा वेळीच सावध झाल्या असून त्यांनी खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. इसिस ही जागतिक पातळीवर हातपाय पसरलेली अतिरेक्यांची संघटना जगभरातील मुस्लिम तरुणांची धर्माच्या प्रश्‍नावर माथी भडकावून आपल्या संघटनेत त्यांची भरती करीत आहे. भारतात अतिरेकी कारवाया करावयाच्या असल्या तर येथील तरुण मुले आपल्या ताफ्यात पाहिजेत हे त्यांनी ओळखून अनेक मुस्लिम तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जात आहेत. यात काही तरुण निश्‍चतपणे ओढले जातात. परंतु यासंबंधी जर मुस्लिम तरुणांमध्ये वेळीच जनजागृती केल्यास तरुणांना वास्तव समजेल व त्यांचे चुकीचे पाऊल पडणार नाही. यासाठी एटीएसने हाती घेतलेले विविध उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. सर्वात प्रथम म्हणजे मुस्लिम वस्ती असलेल्या भागात ए.टी.एस.चे अधिकारी तरुणांचे जनजागृतीसाठी चक्क वर्ग घेत आहेत. मौलाना, इमामांच्या मदतीने मस्जिद, मदरसा, शाळा व महाविद्यालयातून प्रवचने करुन तरुणांमध्ये जागृती केली जात आहे. भिवंडी या मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या भागात अशा प्रकारच्या बैठका घेऊन तरुणांना विश्‍वासात घेतले जात आहे. या कामी मौलाना व इमामांची फार मोठी मदत मिळते आहे. इसिसचे नेमके धोके काय आहेत, याचे परिणाम काय भोगायला लागतात याविषयी प्रबोधन केले जात आहे. गेले तीन महिने हा उपक्रम राबविला जात असून त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. अतिरेकी संघटना या प्रामुख्याने इंटरनेटव्दारे संपर्क साधत असल्यामुळे इंटरनेट कसे हाताळावे, फेसबुकवरुन कोणाला लाईक व अनलाईक करायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. ए.टी.एस.चा हा उपक्रम जरा हटके असला तरीही स्तुत्य म्हटला पाहिजे. अशाच प्रकारे प्रबोधनातून आपण तरुणांना अशा संघटनांपासून वेगळे ठेवू शकतो. त्याचबरोबर इसिस कर्नाळा अभयारण्यात केंद्र उभारणार ही बातमी येताच तेथील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना आपल्या सोबत नेहमी ओळख पत्र ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच या भागातील सी.सी. टी.व्हीं.ची संख्याही वाढविली जाणार आहे. ९२च्या बॉम्बफोटकांची स्फोटके ही कोकणाच्या किनारपट्टीवरच उतरली होती. त्यावेळी आपण सावध राहिलो असतो तर पुढील बॉम्बस्फोटाची मालिका कदाचित झाली नसती. असो. परंतु यापासून बोध घेऊन आपण आता इसिसचा मुकाबला वेगळ्या प्रकारे करीत आहोत व भारतातून तेथे भरती होणार नाही याची खात्री घेतली जात आहे आणि यासाठीचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.
---------------------------------------------------------------------------  

0 Response to "इसिसचा वाढता धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel