-->
कुंभमेळ्यातून पर्यटन फ्लॉप

कुंभमेळ्यातून पर्यटन फ्लॉप

रविवार दि. ०६ सप्टेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कुंभमेळ्यातून पर्यटन फ्लॉप
-------------------------------------------
कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणार्‍या विभत्सतेचे दर्शन हे आपल्यासारख्या नवशिक्षित वर्गास पटणारे नाही. धर्म हा कुणीही आपल्या घरात पाळावा त्याचे रस्त्यावर प्रदर्शन तेही साध्ाू ज्या प्रकारचे वर्तन करतात ते टाळलेच पाहिजे, अशी समजूत लोकांची झाली ही बाब स्वागतार्हच म्हटली पाहिजे. शिस्तीने चालणार्‍या पंढरपूरची गर्दी वारीगणिक वाढत असताना महाराष्ट्रात तब्बल बारा वर्षांतून एकदा भरणार्‍या कुंभमेळ्याची गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटत असेल तर कुठेतरी काहीतरी नक्कीच बिनसले आहे. कुंभमेळा हा पर्यटनांच्या दृष्टीने पाहिल्यास एक उत्तम संधी होती. देशी-विदेशी पर्यटकांना त्याकडे आकर्षित करुन घेण्यास जर राज्यातील पर्यटन विभाग यशस्वी झाला असता तर एक मोठा व्यवसाय साध्य करता आला असता. याकडे केवळ धार्मिक भावनेने न पाहता, ही एक पर्यटनासाठी उत्तम संधी असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले असते तर राज्य सरकार याव्दारे चांगली कमाई करु शकले असते. आपल्याला केवळ हिंदू धर्माची टिमकी वाजवून व दुसर्‍या धर्मावर टीका करु भागणार नाही. तर आपला धर्म विज्ञानवादी कसा होईल व यातून आपल्या समाजातील सर्व घटकांचा अध्यात्मिक विकास कसा होईल याचा विचार या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करण्याची वेळ आली आहे...
--------------------------------------------------------
गेले वर्ष-दीड वर्षापासून कुंभमेळ्याचे नियोजन करूनही येथील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला अपेक्षेहून खूपच कमी भाविकांनी उपस्थिती लावल्याने नियोजनातील त्रुटींचा जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला. सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांनी कुंभमेळ्याकडे पाठ फिरवल्याचे आता सरकारच्या लक्षात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निवडक अधिकार्‍यांकडून पहिल्या शाही स्नानाला भाविकांनी अपेक्षित हजेरी न लावल्याचा कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सिंहस्थाचा पहिला टप्पा तरी फ्लॅपच गेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते. त्या अनुषंगाने प्रशासनाला युद्धपातळीवर तयारी करावी लागते, हे देखील खरे आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठीची अतिदक्षताच पोलीस-प्रशासनाच्या अंगलट येऊन भाविकांनी सारे नियोजन फोल ठरविले. ८० लाख ते १ कोटी इतके भाविक येण्याची शक्यता गृहीत धरलेली असताना प्रत्यक्ष १० लाखांच्या आतच म्हणजे अंदाजे सात लाख भाविकांनी हजेरी लावली. कुंभमेळ्याचा मूळ उद्देश हा धार्मिक आणि सांस्कृतिक संघटन हा आहे. संघटनशक्तीच्या प्रदर्शनासाठी गर्दीसारखा दुसरा मार्ग नाही. साहजिकच लाखो-करोडोंच्या संख्येने होणारी गर्दी ही कुंभमेळ्याचे खरे आकर्षण ठरते. सध्या अतिरेकी कारवाया वाढल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवणे प्रशासनाला गरजेचे वाटत होते. नाशिक शहरापासून दहा कि.मी. अंतरावर एकही वाहन उभे न करु देण्याच्या अतिरेकी निर्णयाचा फटका मात्र या देवधर्माच्या पर्यटनाला बसला. कुंभमेळ्यातून जर चांगले पर्यटन आयोजित केले असते तर एकूण १५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकला असता. वाईन-वर्कशीप-वायफाय असे त्याचे स्वरुप ठरविण्यात आले होते. परंतु त्याचे योग्य पर्यटन व मार्केटिंग न झाल्याने कुंभमेळ्यातून साधली जाणारी व्यवसायाची संधी सध्यातरी गमावली गेली आहे. आपल्याकडे यावेळी जास्त लोक न येण्याचे आणखी एक कारण म्हणजे लोकांच्या मनात अतिरेकी कारवायांमुळे मनात एक प्रकारची भीती बसली आहे. अतिरेकी नेहमीच अशी गर्दीची ठिकाणे निवडतात त्यामुळे आपण अशा गर्दीच्या ठिकाणी कशाला जावे असाही विचार काही जमांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षितता ही आवश्यकच आहे मात्र त्याच अतिरेकही करण्याची गरज नव्हती, हे लक्षात घेऊन आता पुढेतरी प्रशासनाने सावधानगिरी बाळगावी.
अर्थात कारण जास्त गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी वा तत्सम अप्रिय घटनांचा धोका वाढणार होता. परिणामी साफ चुकलेले नियोजन आणि त्याची जाणीव होऊनही वेळीच ते सुधारण्याऐवजी रेटून नेण्याच्या पोलिसांच्या मुजोरीमुळे स्थानिकांना पर्वणीच्या अगोदर दोन दिवसांपासून जो प्रचंड जाच सहन करावा लागला. पर्वणीतील गर्दी आटण्यामागे उपरोल्लेखित कारणांचा जाणवण्याइतपत परिणाम असला तरी कुंभमेळ्याचे आजवरचे स्वरूप पाहता गर्दीबाबत त्याहीपुढे जाऊन विचार करावा लागेल. कारण शेकडो वर्षांची अव्याहत परंपरा असलेल्या कुंभमेळ्याला असे अडथळे वा आपत्ती नव्या नाहीत. म्हणूनच आटलेल्या गर्दीची चिकित्सा व्यापक व डोळसपणे करायला हवी. ज्या विविधपंथीय साधुसमाजाला केंद्रस्थानी ठेवून या उत्सवाची आखणी होते, त्या साधुसमाजानेसुद्धा या निमित्ताने आपल्या अंतरंगात डोकावून पाहणे गरजेचे आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कुंभनगरीत दाखल झालेल्या बहुसंख्य साधुमंडळींचे वर्तन आजच्या काळातील कोणत्याही समंजस माणसाच्या बुद्धीस न पटणारे आहे. कालौघात समाज किती बदलत आहे याच्याशी कोणतेही देणेघेणे न ठेवता केवळ आपल्या सोयीच्या तेवढ्याच रूढी-परंपरांच्या धुंदीत वावरणार्‍या साधुमंडळींची नाळ सर्वसामान्यांपासून तुटली आहे. एका विशिष्ट वर्गाला साधुमंडळींच्या तर्‍हांचे, विक्षिप्त वागण्याचे कौतुक असले तरी बहुसंख्य लोक आणि विशेषत: तरुण, नवमध्यमवर्गीय असल्या थेरांपासून दूर राहणेच पसंत करतात. कुंभमेळ्याचे कर्तेधर्ते म्हणवणार्‍या साधुमहंतांनी हे लक्षात घेऊन स्वत:मध्ये बदल घडवायला हवा. कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणार्‍या विभत्सतेचे दर्शन हे आपल्यासारख्या नवशिक्षित वर्गास पटणारे नाही. धर्म हा कुणीही आपल्या घरात पाळावा त्याचे रस्त्यावर प्रदर्शन तेही साध्ाू ज्या प्रकारचे वर्तन करतात ते टाळलेच पाहिजे, अशी समजूत लोकांची झाली ही बाब स्वागतार्हच म्हटली पाहिजे. शिस्तीने चालणार्‍या पंढरपूरची गर्दी वारीगणिक वाढत असताना महाराष्ट्रात तब्बल बारा वर्षांतून एकदा भरणार्‍या कुंभमेळ्याची गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटत असेल तर कुठेतरी काहीतरी नक्कीच बिनसले आहे. कुंभमेळा पर्वणीच्या मुहूर्तावरच पैठण, कावनई वगैरे अन्य तीर्थांवर स्नानासाठी होणारी गर्दीदेखील का घटली, याचे उत्तरही शोधायला हवे. त्यासाठी आधुनिक समाजमनाचा ठाव घेत साधुमंडळींनी आपल्या आचरणात आवश्यक ते बदल करायला हवेत. एरवी, रूढी- परंपरांच्या नावे अकांडतांडव करणारी साधुमंडळी सोयीनुसार जेव्हा स्मार्टफोन, इंटरनेट, टॅब, लॅपटॉप, आलिशान मोटारी अन् वातानुकूलित शामियाने अशा आधुनिक सुविधा सहजतेने आपल्याशा करताना दिसतात, तेव्हा त्यातील बेगडीपण प्रकर्षाने समोर येते. आधुनिक समाजाशी फटकून राहण्याऐवजी त्याच्याशी अधिकाधिक जवळीक कशी साधता येईल, हे आता प्रमुख महंतांनी पाहायला हवे. कुंभमेळा हा पर्यटनांच्या दृष्टीने पाहिल्यास एक उत्तम संधी होती. देशी-विदेशी पर्यटकांना त्याकडे आखर्षित करुन घेण्यास जर राज्यातील पर्यटन विभाग यशस्वी झाला असता तर एक मोठा व्यवसाय साध्य करता आला असता. याकडे केवळ धार्मिक भावनेने न पाहता, ही एक पर्यटनासाठी उत्तम संधी असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले असते तर राज्य सरकार याव्दारे चांगली कमाई करु शकले असते. आपल्याला केवळ हिंदू धर्माची टिमकी वाजवून व दुसर्‍या धर्मावर टीका करु भागणार नाही. तर आपला धर्म विज्ञानवादी कसा होईल व यातून आपल्या समाजातील सर्व घटकांचा अध्यात्मिक विकास कसा होईल याचा विचार या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करण्याची वेळ आली आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "कुंभमेळ्यातून पर्यटन फ्लॉप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel