-->
हृदयद्रावक घटना

हृदयद्रावक घटना

संपादकीय पान बुधवार दि. ०३ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हृदयद्रावक घटना
पुण्याहून सहलीला आलेल्या अबिदा इनामदार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपैकी १३ जणांवर मुरुड समुद्रकिनार्‍यावर काळाने घाला घातल्याची सोमवारची घटना अतिशय ह्ृदयद्रावक अशीच आहे. पुण्यातील कॅम्प विभागातील ११ व १२ शिकणारे १२६ विद्यार्थी मोठ्या उत्साहाने निसर्गरम्य मुरुडच्या किनारी आले होते. आता परताना आपल्या सहकार्‍यांपैकी १३ साथीदार आपल्यासोबत नाहीत अशी हृदय हेलकावणारी आठवण हे विद्यार्थी घेऊन जात आहेत. मृतांमध्ये १० मुली व ३ मुलगे आहेत. अलिकडच्या काळात मुरुडच्या किनारी घडलेली ही सलग दुसरी घटना आहे. २०१४ मध्ये महिंद्र कंपनीतील सहलीला आलेल्या २५ जणांपैकी ६ जणांना जलसमाधी मिळाली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्याच ठिकाणी सोमवारी १३ मुले बुडाली आहेत. गेल्या दोन वर्षात मुरुडच्या किनार्‍यावर सुमारे ३० जण बुडाले आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील असलेला धोका फार गंभीर आहे. केवळ मुरुडच नव्हे तर काशिद, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर या किनार्‍यावरही बुडालेल्यांची संख्या मोठी आहे. रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी येणारा पर्यटक हा प्रामुख्याने मुंबई, पुण्यातून येतो. पर्यटनावर येथील अनेकांची रोजीरोटी असल्याने पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असताना अशा प्रकारे जलसमाधीच्या घटना घडल्यास येथील पर्यटनाला भीतीपोटी आळा बसू शकतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुढे आले पाहिजे. खरे तर मुरुडच्या किनार्‍यावर धोकादायक भाग असलेल्या ठिकाणी तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे व तशा सूचना लिहिण्यात आलेल्या आहेत. मात्र हे सर्व वाचूनही गांभीर्य न समजल्याने पर्यटक भरतीच्यावेळी समुद्रात घुसतात. सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी अशा घटना घडलेल्या असताना तेथील संवेदनाक्षम भागात खास व्यवस्था ठेेवण्याची आवश्यकता आहे. सोमवारी झालेल्या दुर्घटनेतील महाविद्यालयीन मुले होती, परंतु इतर वेळी झालेल्या अपघातात मद्यपान करुन पर्यटक नशेच्या अंमलाखाली असताना समुद्र स्नानाचा आनंद लुटण्याच्या इराद्याने पाण्यात घुसतात व तेथे त्यांना जलसमाधी मिळते. त्यामुळे जसे प्रशासनाने जसे सर्व सुरक्षिततेचे उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच पर्यटकांनीही स्वत:हून काही पथ्ये पाळली पाहिजेत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात वाळूची उंचसखलता वारंवार बदलत असते. या घडामोडी प्रत्येक मिनिटाला बदलत असतात. प्रामुख्याने खाडीचे पाणी जिकडे समुद्रात येते तेथे एक मोठा खड्डा तयार होत असतो. तसेच पाणी त्यावेळी कोणलाही भरतीच्या वेळी आतमध्ये खेचत असते. पर्यटक तिथेच फसतो व त्याची मृत्यूची गाठ भेट होते. मुरुडला समुद्रकिनारी गेल्या काही वर्षात जे अपघात झाले आहेत ते याच खाडी समुद्राला मिळते त्याखड्यात झालेले आहेत व सर्वच वेळी भरती होती. यापूर्वी आपण अनुभव घेतले असतानाही त्यातून काही बोध घ्यायला शिकलेलो नाही, असेच दुदैवाने म्हणावेसे वाटते. आता अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने केवळ सूचना फलक दिले की आपले काम झाले असे न समजता सक्रियपणे यात उतरले पाहिजे. याकामी ग्रामस्तांनीही पुढे आले पाहिजे. कारण ज्या पर्यटनावर आपले सर्वस्वी अवलंबून आहे तो उद्योग जगवायचा असेल तर अशा घटना टाळल्या पाहिजेत. यासाठी गोव्याचे उदाहरण़ देता येईल. गोव्याने आपला संपूर्ण किनारा एका कंपनीच्या ताब्यात दिला आहे. या कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी जीवरक्षक उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षात समुद्रात पोहायला जाणार्‍यापैकी एकही जीवीत हानी झालेली नाही. अलिबागच्या किनार्‍यावरही गेल्या काही वर्षात जीवरक्षक ठेवलेले असल्याने तेथील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर अलिबागच्या किनार्‍यावर जिकडे धोक्याचा भाग आहे तेथे खांब रोऊन लोकांना तेथे न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वी किनारपट्टीवर एक पोलिस चौकीही उभारण्यात आली होती. आता मात्र तेथे पोलिस नसले तरीही जीवरक्षकांमुळे अलिबागचा किनारा सुरक्षित म्हणून ओळखला जातो. मात्र रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सर्वच ठिकाणी अशा प्रकारे जीवरक्षक नेमण्याची गरज आहे. त्यासाठी एखाद्या स्वतंत्र संस्थेला काम देण्याची आवश्यकता आहे. यातून किनारपट्टीवर राहाणार्‍या लोकांपैकीच काही तरुणांना प्रशिक्षण देऊन जीवरक्षक दल उभारण्याची गरज आहे. केवळ पर्यटक नव्हे तर अनेकदा वादळी वार्‍यामुळे भरकटलेल्या कोळ्यांचे जीव वाचविणे शक्य होणार आहे. एखादी घटना घडल्यावर मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देऊन सरकार आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकते. आता मात्र अशा घटना होणारच नाहीत यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.
--------------------------------------------------------------------  

0 Response to "हृदयद्रावक घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel