-->
कोकण रेल्वेचे एक पाऊल पुढे

कोकण रेल्वेचे एक पाऊल पुढे

संपादकीय पान मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकण रेल्वेचे एक पाऊल पुढे
कोकणातील चाकरमन्यांना नेहमी चकवा देणार्‍या कोकण रेल्वेने यंदा सुखद धक्का दिला आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या कोकणवासीयांसाठी पनवेल-चिपळूण डेमू अनारक्षित पहिली ट्रेन सुरु झाली आहे. या प्रवासासाठी पनवेल-चिपळूणसाठी ५० रुपये मोजावे लागतील. या ट्रेनला एक एसी डबाही जोडण्यात येणार असून, त्याचे तिकीट ३९५ रुपये असेल. एसी डब्यातून प्रवास करण्यासाठी आरक्षण करता येणार आहे. मध्य रेल्वेने पहिल्यांदाच पनवेल-चिपळूण अनारक्षित डेमू ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून, ही ट्रेन ४ सप्टेंबरपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. या ट्रेनच्या ४० फेर्‍या होणार आहेत. एसी प्रवासासाठी पनवेल ते खेडसाठी ३४५ रुपये, पेण-चिपळूसाठी २२१ रुपये आणि पेण-खेडसाठी १८० रुपये भाडे आकारण्यात येईल. पनवेल-चिपळूण अनारक्षित ट्रेन पनवेलहून निघाल्यावर पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अजनी असे थांबे घेत चिपळूणला पोहोचेल. भर गणपतीत पनवेलहून ही ट्रेन सुरु झाल्याने व त्याचे आरक्षण नसल्यामुळे एक मोठी सोय गणपतीत गावाला जाणार्‍यांची झाली आहे. प्रामुख्याने रत्नाागिरीत जाणार्‍या प्रवाशांना या ड्रेनचा फायदा होऊ शकतो. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. कोकण रेल्वेने टाकलेल्या या महत्वाच्या पावलामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल. आजवर अनेक बाबतीत कोकण रेल्वे ही आपल्यासाठी नाहीच असे चाकरमन्यांना वाटत आले आहे. त्यामागची कारणेही तशीच सबळ होती. अनेक गाड्या या जिल्ह्यातच एक थांबा घेत पुढील राज्यात जात असल्यामुळे आपल्याला हात करीत ही रेल्वे बाहेरच्या प्रवाशांसाठी चालली अशी समजूत होती. अर्थात ते काही खोटे नाही. कोकणासाठी म्हणून जेमतेम चारच गाड्या आहेत आणि त्या पुरेशा नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कोकण रेल्वेही स्वतंत्र असली तरी तिची अर्धी पावले ही मध्य रेल्वेमध्ये अडकली आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचा कारभार हा दिल्लीच्या केंद्रीय मंत्रालयातून होतो व तेथे महाराष्ट्राचा विचार करण्याऐवजी संपूर्ण रेल्वे मार्गावर असलेल्या सर्व राज्यांचा विचार करण्याकडे प्राधान्य असते. यातून कोकणावर नेहमीच अन्याय होत गेला. कोकण रेल्वेसाठी आपण आपल्या जमीनी दिल्या व त्यासाठी त्याग केला, मात्र याचा फायदा आपल्याला न मिळता अन्य राज्यातल्या लोकांना मिळतो ही सल कोकणवासियांच्या मनात होतीच. आता मात्र डेमू चिपळूणपर्यंत धावू लागल्याने ही समजूत कमी होण्यास मदत होईल. कोकण रेल्वेवर आता भविष्यात अनेक चांगल्या बाबी सुरेश प्रभू यांच्यामुळे येऊ घातल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरविले आहे. मध्यंतरी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तसे सुतोवाच केले होते. त्यादृष्टीने जोरदार पावले पडत आहेत. सध्या एक मार्ग असूनही कोकण रेल्वेवरुन दररोज जर सुमारे ६० गाड्या धावत असल्या तर हा मार्ग दुहेरी झाल्यास सध्यापेक्षा दुपटीहून जास्त गाड्या धावतील. सध्या कोकणरेल्वेची प्रवासी वाहतूक तोट्यात असली तरीही माल वाहतुकीमुळे कोकण रेल्वेचा जमा व खर्चाचा ताळमेळ साधला जातो. कोकण रेल्वेने कोलाडहून सुरु केलेल्या रो-रो सेवेमुळे ट्रकच थेट गाडीवर चढवून थेट कोचीपर्यंत नेता येतो. या सेवेचा मालवाहुतीस मोठा फायदा होत आहे व ही सेवा लोकप्रिय झाली आहे. ही जशी रो-रो सेवा आहे त्याच धर्तीवर प्रवाशांसाठी या मार्गावर ठिकठिकाणी डेमू सेवा सुरु करता येऊ शकते. यात प्रवाशांची जशी सोय होऊ शकते तसेच रेल्वेचा महसूलही वाढू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कोकण रेल्वेच्या किनारपट्टीवर आता अनेक बंदरे विकसीत करण्याची योजना आहे. यातील जयगड बंदराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हे बंदर रेल्वेने जोडण्याची महत्वाकांक्षी योजना सध्या हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारे बंदरे रेल्वेने जोडली गेली की, कोकणाचे चित्र पालटण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर कोल्हापूरला कोकण रेल्वे नेण्याचा एक प्रस्ताव आहे. नजिकच्या काळात तसे झाल्यास कोकण व घाट हे एकत्र येण्यास मोठी मदत होईल तेथील उद्योगधंद्यांसाठी निर्यात करण्यास थेट बंदरांचा उपयोग करता येणार आहे. रेल्वे व त्याला जोडलेले बंदर आले की, त्या भागाचा कायापालट होतो हे जगातील अनेक देशांतील उदाहरणे आहेत. आपल्याकडे आपण कोकण रेल्वे बांधली परंतु ही रेल्वे अधिक बळकट होण्यासाठी व व्यावसायिकदृष्टया स्वबळावर उभी राहाण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. आता कोकणातील सुपुत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही.
-------------------------------------------------------------

0 Response to "कोकण रेल्वेचे एक पाऊल पुढे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel