-->
पोयनाड दरोड्याचा छडा लावा

पोयनाड दरोड्याचा छडा लावा

संपादकीय पान बुधवार दि. ९ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पोयनाड दरोड्याचा छडा लावा
पोयनाड येथे पडलेल्या धाडसी दरोडा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: लक्ष घालून या दरोड्याचा त्वरीत छडा लावण्याचे आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना दिले आहेत. या दरोड्याचा त्वरीत छडा लावावा अशी मागणी करीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक हक यांना दूरध्वनी करून दरोड्याचा त्वरीत तपास लावण्याचे निर्देश दिले. पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास धाडसी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यावेळी दुकानदाराशी झालेल्या झटापटीनंतर एका दरोडेखोरास पकडण्यात गावकर्‍यांना यश आले. मात्र, इतर दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. या दरोड्याच्या घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच माणगाव येथेही ज्वेलर्सवर आणि त्याच रात्री पोलादपूर येथील टपाल कार्यालयावरही दरोडा पडला होता. जिल्ह्यात वाढत्या दरोड्याच्या घटनांनी ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत असताना या दरोड्याचा शोध घेण्यात मात्र, पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. सध्या जिल्ह्यात पडत असलेले दरोड्यांचे सत्र व रायगडमधील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झालेली असताना सर्व नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. व्यापारी समाजात अस्वस्थता आहे. रात्री उशीरापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास आजवर व्यापार्‍यांना कधी धोका वाटत नव्हता. परंतु आता मात्र त्यांना रात्री उशीरापर्यंत व्यवसाय करणे धोकादायक वाटू लागले आहे. अशा प्रकारे व्यापारी समाजात भीती निर्माण होणे ही चांगली बाब नाही. पोयनाड येथील दरोडा पडून आता पंधरा दिवस होतील. त्यातील एक गुन्हेगार लोकांच्या दक्षतेमुळे तेथेच पकडला गेला आहे. मात्र त्याच्याकडून माग घेत अन्य आरोपी पकडण्यासाठी पोलिसांना अपयश येत आहे ही बाब काही पोलीस खात्यास शोभनीय नाही. गेल्या दोन-तीन महिन्यात रायगड जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे यांचे प्रकार झपाट्याने वाढले आहेत. पोलिसांच्या ढीलेपणामुळे आरोपी सहजरित्या पोलिसांना तुरी देऊन पसार होत आहेत. भर बाजारपेठेतील दुकाने जर अशा प्रकारे लुटण्यास सुरुवात झाली तर अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्‍या या विभागात दहशतीच्या अशा प्रकारच्या घटना घडतात. यातील चोर हे परप्रांतातून आले आहेत व काही स्थानिक चोरांच्या मदतीने त्यांनी हे कारस्थान रचले. गेले चार दिवस ते या भागात रेकी करीत होते अशी माहिती आता उघड झाली आहे. हा सर्व प्रकार पाहता पोलिस खाते किती दुबळे झाले आहे याचे उत्तम उदाहरण ठरावे. पेझारीच्या कोपर्‍यावरच पोलिसांचा तपास नाका आहे. येथील पोलिस काय काम करीत असतात असा सवाल उपस्थित होतो. येथे फक्त हाप्ता वसुलीची कामे केली जातात अशी चर्चा आहे. केवळ हीच घटना याचे द्योतक आहे असे नव्हे तर गेल्या महिन्याभरात मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. माणगावपासून केवळ १८ कि.मी. अंतरावर मध्यरात्री कारमधून प्रवास करणार्‍या एका जोडप्यास बाहेर काढून त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा प्रकार झाला. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही दुसरी घटना होती. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन महामार्ग व एक्स्पेस वे जातात. या रस्त्यांवर आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था हवी ती कुठे दिसत नाही. तसेच गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात मोटार सायकली जाळीताची प्रकरणे वाढली आहेत. याबाबत पोलीस फारसे लक्ष घालताना दिसत नाहीत. त्यातच सध्या देशात गाजत असलेल्या इंद्राणी मुखर्जी प्रकरणी हत्या झालेल्या शीना बोरा हिचा मृतदेह देखील रायगड जिल्ह्यातच तीन वर्षांपूर्वी गाडण्यात आला होता. केवळ हेच नव्हे तर रायगड जिल्ह्यात दोन दिवसाआड एक अशा प्रमाणात बेवारस मृतदेह सापडतात. जिल्ह्यातील पर्यटकांना खुणावणारे हिवरेगार जंगल, निर्मनुष्य समुद्रकिनारे गुन्हेगारांनाही आकर्षित करीत आहेे. रायगड जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार हा ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि मुंबईपर्यंत विस्तारलेला आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेने येथील लोकसंख्या कमी असल्याने अनेक ठिकाणी मोकळ्या जागा, शुकशुकाट असतो. कार्लेखिंड, सुकळी खिंड, कर्नाळा, तांबरी, कशेडी घाट, अंबेनळी घाट, बोरघाट ही ठिकाणे लोकवस्तीपासून दूर असल्याने याठिकाणांवर गुन्हेगारी कारवायांनंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात येते. हे टाळण्यासाठी पोलिसांची रात्रंदिवस गस्त आवश्यक आहे. परंतु पोलीस पूर्णपणे ढिलडे पडले आहेत. विद्यमान पोलिस अधिक्षक सुवेझ हक हे नक्षली भागातून कामगिरी करुन आलेले आहेत व एक कार्यक्षम पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांना रायगडमधील गुन्हेगारांची नस पकडून त्यांचा ठावठिकाणा लावता आलेला नाही, ही दुदैवी बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानंतर आता तरी पोलिस खात्याने कार्यक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "पोयनाड दरोड्याचा छडा लावा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel