-->
शहरी मतदारांचा कौल

शहरी मतदारांचा कौल

संपादकीय पान मंगळवार दि. ०३ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शहरी मतदारांचा कौल
कल्याण-डोंबिवली या मुंबईला जाडून असणार्‍या महानगरपालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळण्यासाठी दहा जागा कमी पडल्या आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिकेत कॉँग्रेसने सर्वाधिक जागा बळकावून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीच्या सहकार्याने कॉँग्रेस तेथे सत्ता स्थापन करु शकते. एकूणच पाहता या दोन महानगरातील नागरिकांनी शिवसेनेला व कॉँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे, मात्र त्यांच्या हाती संपूर्ण एकहाती सत्ता देण्यास नकार दिला आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाच्याबद्दलची नाराजी उघडपणे या निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर झाली आहे. शहरी मतदार हा देशातील एक सुशिक्षीत मतदार आहे व तो सर्वात जागृत आहे त्यामुळे त्याच्या मतदानाच्या कौलाला विशेष महत्व असते. लोकसभेला याच मतदाराने आपले पारडे भाजपाच्या व नरेंद्र मोदींच्या दिशेने झुकविले होते. आता मात्र त्याची निराशा झाल्याने त्याने आपला कौल बदलला आहे. कल्याण-डोंबिवलीत २० वर्षांच्या राजवटीत साडेसतरा वर्षे शिवसेना सत्तेत आहे. त्यातील साडेबारा वर्षे भाजप त्यांच्यासोबत आहे. शहरी मतदारांनी आपला कौल अंशत: शिवसेनेच्या बाजूने एकीकडे दिला आहे तर दुसरीकडे कोल्हापूरात त्यांनी कॉँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या देऊन पुन्हा एकदा संधी दिली आहे. शहरी मतदाराला गृहीत धरुन चालत नाही. तो विकासासाठी कोणत्याही पक्षाला संधी द्यायला तयार आहे, हेच यावरुन सिध्द होते. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला टार्गेट करायचे, तेथे सत्तापालट करायचा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत दीड वर्ष सतत शिवसेनेला कोंडीत पकडायचे, ही भाजपची व्यूहरचना होती. मुंबईतील नालेसफाई असो, रस्त्यांचा दर्जा असो, रस्त्यावरील दिवे कोणते लावण्याचा प्रश्‍न असो, नाईट लाइफ असो की पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम व क्रिकेटचा खेळ काहीही असो; मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली कुरघोडी, तणातणी, तेथील सत्तेचा खेळही रोजचाच झाला आहे. एकमेकांची उणीदुणी काढायची, राज्याच्या सत्तेत धुसफुस चालू ठेवायची, परस्परांना सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या द्यायच्या आणि प्रत्यक्षात सत्तेचे लाभ उठवत कारभार सुरू ठेवायचा, असा खेळ युतीत सुरू आहे. यासाठीच भाजपाने शिवसेनेला कल्याण-डोंबिवलीतून सत्तेतून बाहेर ठेवण्याचा डाव आखला होता. मात्र त्यात भाजपा यशस्वी ठरला नाही. म्हणजे भाजपाचा हा एकतर अति आत्मविश्‍वास नडला किंवा लोकांनीही त्यांना नकारात्मक मतदान केले आहे. गेल्या वेळी लोकसभेला व विधानसभेला नरेंद्र मोदींनी जी आश्‍वासने दिली आहेत त्यातील आश्‍वासनपूर्तीच्या दिशेने एकही पाऊल टाकण्यात आलेले नाही. त्यामुळेच भाजपाच्या पदरी निराशा आली आहे. एकीकडे प्रचार सभांचा धडाका लावणार्‍या राज ठाकरे यांनाही पदरी अपयशच आले आहे. मात्र कल्याणमध्ये एमआयएम पक्षाने आपले खाते उघडले हे एक आश्‍चर्य म्हटले पाहिजे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीदेखील एमआयएमने विजय मिळवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकतीच केंद्रातील व राज्यातील सत्ता गमावल्यावर अनेक नकारात्मक घटक असतानाही कोल्हापूर महापालिकेची सत्ता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. कॉंग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. येथेे शिवसेनेचे नुकसान अधिक झाले आहे. त्यांच्या जागा कमी झाल्या असून भाजपाने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. या निवणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशीच लढाई होती. महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार पाहिला तर भाजपा-ताराराणी आघाडी विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनाच अशी लढाई झाली. काहीही करून महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला सत्तेपर्यत पोहचू द्यायचे नाही, असा चंगच बांधला होता. त्यानुसारच सर्व व्यूहरचना करण्यात आली. कॉंग्रेसच्यावतीने माजी मंत्री पाटील यांनी एकाकीच लढत दिली. त्यामध्ये त्यांनी यश मिळवल्याचे दिसते. पाटील विरुद्ध महाडिक अशी पारंपरिक राजकीय इर्षा असल्याने काहीही करून पाटील यांना महाडिक यांना सत्तेपासून रोखायचे होते. त्यानुसार त्यांनी निवडणुक लढवून सत्तेची चावी आपल्याकडेच ठेवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ताराराणी आघाडीचा जबर फटका बसला. गेल्या वेळी त्यांच्या २६ जागा होत्या. यावेळी केवळ १५ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेना-भाजपा नेहमी महापालिका निवडणूक एकत्र लढत आली होती, यंदा मात्र भाजपाने ताराराणी आघाडीशी युती करून शिवसेनेची काडीमोड घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने केलेल्या या प्रयत्नामध्ये भाजपाला आपल्या जागा वाढवून घेण्यामध्ये यश आले. त्याचा फटका शिवसेना बसला आहे. शिवसेनेला केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अपेक्षा मोठ्या असल्याने भाजपासाठी ही निवडणूक नकारात्मक ठरली, तर मनसेची पिछेहाट काही थांबत नाही असेच सध्यातरी चित्र आहे. नुकत्याच झालेल्या राज्यातल्या पराभवानंतर कॉँग्रेससाठी कोल्हापूरमधील विजय हा आशेचा किरण ठरु शकतो. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पराभवाच्या छायेतून सावरण्यास सुरुवात झाली आहे असे या निकालावरुन दिसते.
--------------------------------------------------------------------  

0 Response to "शहरी मतदारांचा कौल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel