-->
ई खरेदीची धूम

ई खरेदीची धूम

संपादकीय पान बुधवार दि. ०४ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ई खरेदीची धूम
-------------------------------------
जग आता झपाट्याने बदलत चालले आहे. जग हे एक ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने जगाची पावले पडत आहेत. गेल्या काही वर्षातील इंटरनेट क्रांतीने जगाचा एकूणच चेहरा मोहरा पार बदलून टाकला आहे. कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी आता तासन-तास दुकानात खर्ची घालण्याचे दिवस आता संपले आहेत. सध्याच्या ई खरेदीने जी आपल्याकडे धूम सुरु केली आहे ते पाहता खरेदीच्या पारंपारिक सर्व कल्पनांना छेद तर दिला गेलाच आहे शिवाय खरेदी करणे अतिशय सुलभ झाले आहे. सुरुवातीला ज्यावेळी इंटरनेट आले त्यावेळी हे एका क्लिकवर माहिती पुरविणारे अशी त्याची ओखळ सर्वांना झाली होती. परंतु आता इंटरनेटव्दारे व्यवहार पध्दतीमुळे आपण काही क्षणात व्यवहार करु शकतो. मग बँकांचे पैसे पाठविण्याची प्रक्रिया असो किंवा एखाद्या पुस्तकाची खरेदी असो. आपण हे सर्व व्यवहार संगणावर घरी बसूनही एका क्षणात करु लागतो. आता कोणत्याही वस्तू ई मार्गाने खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाल्यापासून बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. दसरा झाला की सर्वत्र खरेदीचे वेध लागतात. दिवाळीला ही खरेदी एक सर्वोच्च शिखर गाठते. आता फ्लिपकार्ट, स्नँपडिल, अँमेझॉन, जबॉन्ग या इ खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या कंपन्यांनी दिवाळीच्या निमित्ताने सध्या बाजारात धूम केली आहे. येथे ४० ते ८० टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदी करता येत असल्यामुळे त्याच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. या कंपन्या आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी जबरदस्त सवलतीच्या दरात माल विकत आहेत. अर्थात हे सर्व अमेरिकन भांडवलशाहीचे अर्थकारण त्याच्यामागे आहे. लोकांना सवलतीच्या दरात आता माल द्या नंतर त्याचे व्यसन लावा आणि मग महागड्या दरात माल विका, व नंतर फायदा कमवा, असे ते सूत्र आहे. याच सूत्रावर आधारित इ विक्री करणार्‍या या कंपन्या सवलतीत माल देऊन आपल्याकडे ग्राहक वळविण्यासाठी आपला खिसा खाली करीत आहेत. यंदा या कंपन्यांनी दिलेल्या सवलतींमुळे जवळपास एक हजार कोटी रुपयांचा तोटा त्यांना होऊ शकतो. मात्र नंतर कही वर्षानंतर आपल्या पदरी हे ग्राहक जोडून या कंपन्या करोडो रुपयांचा नफा कमवितील. या कंपन्यांना २०२०च्या पुढे नफा कमविण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी या कंपन्यांना सुमारे ६लाख ५० हजार कोटी रुपयांचा नफा कमविता येईल असा एक सर्व्हे सांगतो. सध्या नुकतीच ई व्यवहारांची ही बाजारपेठ बाळसे धरीत आहे. आपल्याकडे इंटरनेचे वापर करणारेही झपाट्याने वाढत आहेत. याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा या कंपन्यांना होईल. सध्या ऑनलाईन खरेदी करण्यात ७० टक्के वाटा हा विमान, रेल्वे व अन्य तिकिटांच्या खरेदीचा आहे. परंतु आता या कंपन्या ज्या पध्दतीने आक्रमकरित्या जाहीराती करुन ग्राहक आपल्याकडे खेचत आहेत ते पाहता त्यांचा खरेदीतला वाटा वाढत जाईल यात काही शंका नाही. अर्थात याकडे केवळ शहरी लोक आकर्षीत झाले आहेत असे नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणही आता ऑनलाईन खरेदी करु लागले आहेत. सध्या इंटरनेटव्दारे खरेदी करणार्‍या या कंपन्यांना प्रत्येक रुपयामागे ३५ पैसे हे दळणवळणासाठी खर्च करावे लागत आहेत. हे सर्व पाहता भविष्यातील बाजारपेठांचे स्वरुप झपाट्याने बदलत जाणार आहे नक्की. इ व्यापारामुळे ग्राहक हा राजा झाला आहे. एक तर त्याला आपल्या पसंतीचा माल कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे व दुसेर म्हणजे त्याचा खरेदीचा वेळ वाचणार आहे. अनेकदा खरेदीसाठी गेल्यावर विनाकारण वेळ फुकट जातो व अनावश्यक खरेदीही होते. इकडे तुम्ही काय खरेदी करणार याबाबत ठाम असता त्यामुळे तेवढीच खरेदी करता ही ग्राहकांची मानसिकता आहे. सध्या तरी तरुण वर्ग अशा प्रकारच्या खरेदीकडे जास्त वळला आहे. तसे होणे स्वाभाविकच आहे कारण नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करण्यात हाच वर्ग पुढे असतो. एक प्रश्न या नवीन तंत्रज्ञानामुळे जाणवतो व तो म्हणजे यामुळे लहान-मध्यम व्यापारी, उद्योजक मरणार की काय. पण तसे होणार नाही. कारण या इंटरनेट कंपन्यांवर याच दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचाच माल या कंपन्या विकत आहेत. अँमेझॉनशी ५० हजार व स्नॅपडिलशी दोन लाख विक्रेते जोडले गेले आहेत. ज्यावेळी रिटेल कंपन्या आल्या व अनेक मोठ्या भांडवलदारांनी मॉल उभे केले त्यावेळीही किरकोळ दुकानदार मरेल अशी भीती वाटत होती, परंतु ती भीती खोटी ठरली. आता देखील तसेच होईल. छोट्या व्यापार्‍यांनी इ प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास ते या स्पर्धेत टिकू शकतील.
----------------------------------------------

0 Response to "ई खरेदीची धूम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel