-->
मोदींचे मौन सुटले

मोदींचे मौन सुटले

संपादकीय पान शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मोदींचे मौन सुटले
सोशल मिडियापासून ते विविध मार्गांनी जनतेच्या संपर्कात राहून आपण सर्वसामान्यांच्या भोवती कसे आहोत हे दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले काही दिवस देशातील अतिशय महत्वाच्या अशा दोन मुद्यांवर दीर्घ काळ म्हणजे तब्बल १८ दिवस मौन बाळगून होते. अखेरीस बुधवारी त्यांनी राजधर्म पाळत आपले मौन सोडले. मोदी काय बोलतात याकडे देशातील जनता तसेच त्यांचे घटक पक्ष लक्ष ठेवून होते. अखेरीस त्यांनी दादरी व गुलाम अली ही दोन्ही प्रकरणे दुदैवी असल्याचे म्हटले. असे बोलत असताना त्यांनी या घटनांना केंद्र सरकार जबाबदार नाही असे सांगितले. त्यामुळे या दोन घटना घडल्या त्या उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांची जबाबदारी आहे असे त्यांनी सूचित केले. यातील महाराष्ट्रात तर त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे केंद्रात सत्तास्थानी असलेला भाजपा महाराष्ट्रातही सत्तेत आहे. व त्यांच्या या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेनेच गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. तसेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात अनेक विघ्न उत्पन्न करुन हा कार्यक्रम उधळण्याचा त्यांचाच डाव होता. अर्थात राज्य सरकारने हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडून दाखविलाच. मात्र त्यांच्या या राज्य मंत्रिमंडळातील सहकार्‍याचे काय? मोदींनी अशा प्रकारे मौन सोडले खरे परंतु मर्यादीत भाष्य करुन तसेच आपल्याला सोयीस्कर आहे तसाच राजधर्म पाळला आहे. पूर्वी मोदी सत्तेत नसताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा उल्लेख ते मौनी बाबा असा करीत. अर्थातच मनमोहनसिंग यांचा शांत स्वभाव पाहता ते फार कधीच बोलत नव्हते. मात्र त्यांचे मौनही प्रदीर्घ काळ असायचे. आता मनमोहनसिंगांच्या पावलावर पाऊल टाकून मोदी देखील मौनी बाबा बनले आहेत. खरे तर दादरी व गुलाम अली यांच्यासारख्या घटनांमुळे मोदी अडचणीत आले आहेत. मोदींचा खरा मुखवटा हा हिंदुत्वाचा आहे आणि ते कट्टर स्वयंसेवक आहेत. असे असले तरी त्यांना आपला हा मुखवटा दाखवायचा नसतो. त्यांना आपला विकासभिमुख मुखवटा दाखवायचा असतो. जगभरात ते जातात त्यावेळी आपण कसे विकासाचे गमक आहोत ते दाखवित असतात. त्यातच शिवसेनेने त्यांच्या विषयी विधान करुन त्यांचे खरे रुप उघड केले. मोदींनी ज्यावेळी दादरी-गुलाम अली प्रकरणे दुदैवी आहेत असे म्हटले त्याला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही गोध्रा व गुजरात दंगलीमुळे ओळखणारे मोदी असा त्यांचा उल्लेख केला. गोध्रा म्हटले की मोदींना आपल्या अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. कारण गुजरात दंगल असो किंवा गोध्रा त्यात मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे हात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रक्ताने माखलेले आहेत. त्यावेळी त्यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचे आवाहन केले होते ते काही चुकीचे नव्हते. परंतु मोदी व शहा यांनी या गोष्टीची कधीच क्षमा मागितली नाही किंवा खेदही व्यक्त केला नाही. यामागचे खरे कारण म्हणजे ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्ववादी असण्यामागे काही चुकीचे नाही. परंतु त्यांनी सत्तेत बसल्यावर आपला हिंदुत्ववाद बाजूला ठेवून घटनेचे पालन करावे. आपली घटना ही सर्वधर्मसमभाव मानते. कोणत्या धर्मियांनी कोणते खाणे खावे हे ठरविण्याचा अधिकार दुसर्‍या धर्मियांना दिलेला नाही. दादरी येथे एका मुस्लिमास त्याने गोमांस खाल्ले म्हणून जीवे मारले जाते ही घटना केवळ दुदैवी नाही तर आपल्या निधर्मी चौकटीस आव्हान देणारी आहे. अशा प्रवृत्तींची ताकद ही मोदी सत्तेत आल्यापासून बळावली आहे. एवढेच नव्हे तर दाभोलकरांचा खून हा पूर्वीच्या राजवटीत झाला. मात्र पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या या मोदी सरकारच्या काळातील आहेत. अर्थात मोदी केवळ हा प्रश्‍न राज्याचा आहे असे सांगून हात वर करु शकत नाहीत. त्यांची या घटनांची नैतीक जबाबदारी स्वीकारणे त्यांना भाग आहे. मोदी व शहा यांनी जे हिंदू कट्टरतेचे जे बीज रोवले आहे ते गुजरातमध्ये जोरात फोफावले आहे. म्हणूनच यंदा नवरात्रीला केवळ हिंदुना प्रवेश देण्यापर्यंत तेथील विश्‍व हिंदू परिषदेची मजल पोहोचली आहे. अशा शक्ती या सत्तेच्या आश्रयाखाली वाढतात, फोफावतात. मोदींनी एक प्रकारे उशीरा मौन सोडले असले तरी त्यांनी या घटना दुदैवी आहेत असे म्हणण्यासाठी जो कालावधी घेतला ते पाहता त्यांचे असली रुप उघड झाले आहे.
-------------------------------------------------------------  





0 Response to "मोदींचे मौन सुटले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel