-->
वरुणराजाची यंदाही नाराजी?

वरुणराजाची यंदाही नाराजी?

संपादकीय पान गुरुवार दि. ४ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वरुणराजाची यंदाही नाराजी?
दुष्काळ, अवकाळी पाऊस व त्यापाठोपाठ उष्म्याने गाठलेल्या नव्या उचांकामुळे देशातील जनता कातावलेली असल्यामुळे कधी एकदा वरुणराजाचे आगमन होते असे प्रत्याकास वाटत आहे. यावर्षी केरळात मान्सून वेळेच्या अगोदरच येईल असे सुरुवातीला भाकीत होते. मात्र हे भाकित खोटे ठरले आणि वरुणराज आता विलंबानेय येत असल्याची नवीन वार्ता आहे. त्यामुळे यंदाही वरुणराज आपल्यावर रुसणार आहे असेच चिन्ह दिसत आहे. हवामानशास्त्रीय निकषानुसार देशाच्या पातळीवर सरासरीच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यास ते वर्ष दुष्काळी मानले जाते. देशात गेल्या वर्षी ८८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ते दुष्काळी वर्ष ठरले. त्यापाठोपाठ आता या वर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट आहे. नवे सहस्रक सुरू झाल्यापासून गेल्या १५ पैकी चार वर्षे दुष्काळी ठरली आहे. त्यात २००२ (८१ टक्के पाऊस), २००४ (८७ टक्के), २००९ (७८ टक्के) आणि २०१४ (८८ टक्के) या वर्षांचा समावेश आहे. यंदा कमी मान्सून होण्याच्या नव्या अंदाजाने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स कोसळला. कमी पावसाचा केवळ शेतकर्‍यावरच नव्हे तर उद्योगंधंद्यांवर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेअर निर्देशांक कोसळणे स्वाभाविक होते. देशभरातील पर्जन्यमान या वर्षी ८८ टक्के (चार टक्के कमी किंवा अधिक) म्हणजेच सरासरीपेक्षा कमी राहील. तसेच वायव्य भारतातील राज्यांत; म्हणजे राजस्थान, पंजाबमध्ये तर पाऊसमान ८५ टक्क्यांवर (आठ टक्के कमी किंवा अधिक) राहण्याची शक्यता आहे आणि केरळमधील मान्सूनचे आगमनही उशिराने म्हणजे पाच जूनपर्यंत होण्याची शक्यता आता नव्याने वर्तविण्यात आली आहे. ही बातमी जर खरी ठरली तर ही मोठी चिंतेची बाब ठरावी. नव्वद टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता असल्यास त्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे मानले जाते. त्यामुळे यंदा पूर्ण देशासाठी जो ८८ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे, तो डेफिशियंट म्हणजेच अत्यंत कमी किंवा सरासरीपेक्षाही कमी असेल. यंदाच्या कमी पावसाचा सर्वाधिक फटका वायव्य भारताला बसणे अपेक्षित आहे. वायव्य भारतातील पाऊसमान ८५ टक्के, त्याखालोखाल मध्य भारतात ही टक्केवारी ९० असेल, तर दक्षिण भारतात ही टक्केवारी ९२ टक्के असेल. ईशान्य भारतातील पाऊसमान ९० टक्के राहील. या टक्केवारीत आठ टक्के कमी किंवा अधिक पावसाची शक्यता गृहीत धरली जाते. परंतु एकंदर आकडेवारी पाहता यंदा पाऊस हा मोठ्या प्रमाणात कमी राहील अशी चिन्हे आहेत. महिन्याच्या सरासरीनुसार जुलैमध्ये देशातील पर्जन्यमान ९२ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९० टक्के राहण्याची शक्यता आहे. यामध्ये नऊ टक्के कमी किंवा अधिक प्रमाण गृहीत धरले जाते. एप्रिल २०१५ पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागरी प्रदेशातील एल निनो घटक कमकुवत असल्याची नोंद होती. यालाच पूरक असे वातावरणातील बदलही विकसित झाले होते. हीच स्थिती आणखी बळकट किंवा मजबूत होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या काळातच एल निनोची परिस्थिती ही ९० टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे व त्याचाच प्रतिकूल परिणाम देशातील एकंदर पावसावर होण्याची शक्यता आहे. पावसाचा सुधारित अंदाज मंगळवारी जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार या वर्षीच्या पावसाळयात सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ देशावर दुष्काळाचे सावट असेल. प्राथमिक अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्यापेक्षाही कमी पाऊस पडण्याचा हा अहवाल आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करणार्‍या एल-निनो या घटकाचा या पावसाळयात प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एप्रिल महिन्यापासून एल-निनोचा हलका प्रभाव होता. भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संस्था (आयआयटीएम) यांच्या निरीक्षणानुसार पावसाळयाच्या हंगामात ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसावर एल-निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता तब्बल नव्वद टक्के इतकी जास्त आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण आणखी घटण्याची चिन्हे आहेत. शेतीसाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील पावसाचा अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार देशात जुलै महिन्यास सरासरीच्या ९२ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध उपविभागांमध्ये किती पाऊस पडेल याबाबतही या अंदाजात भाष्य करण्यात आले आहे. त्यानुसार पंजाब, हरयाणासह वायव्य भारतात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ८५ टक्के पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात सरासरीच्या ९० टक्के, ईशान्य भारतात ९० टक्के, तर दक्षिण भारतात ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अच्छे दिन आणण्याचा दावा करणार्‍या नरेंद्र मोदींसाठीही ही वाईट बातमी ठरावी. कारण ज्यावेळी मोदी सत्तेत आले त्यावेळी जागतिक पातळीवर व खनिज तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या त्यावेळी मोदी मी नशिबवान पंतप्रधान आहे असे म्हणाले होते. परंतु त्यांचे नशिब फारच कमी काळ उपयोगी पडले, कारण गेल्या तीन महिन्यात खनिज तेलाच्या किंमती चढू लागल्या. आता तर यंदाही सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळ पडणार असल्याने मोदींचे व त्यांच्या सरकारचे नशिब फुटके आहे असेच दुदैवाने म्हणावे लागते.
-----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "वरुणराजाची यंदाही नाराजी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel