-->
चाळीस वर्षांपूर्वी...

चाळीस वर्षांपूर्वी...

संपादकीय पान गुरुवार दि. २५ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चाळीस वर्षांपूर्वी...
आजपासून बरोबर चाळीस वर्षांपूर्वी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली आणि देशाच्या राजकारणाची दिशाच पार बदलून गेली. ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली त्यावेळी देशातील परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. देशाने स्वातंत्र्यानंतर दोन युध्दे पाहिली होती. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. ७२चा भीषण दुष्काळ देशाने पाहिला होता. रेल्वे कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली झाल्याने देशात एकूणच संपाचे वातावरण होते. देशाला शिस्त लावायची असेल तर आणीबाणी लादल्याशिवाय पर्याय नाही असे इंदिरा गांधींच्या विश्‍वासातील असलेले पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे व देवकांत बारुआ यांनी पटवून दिले होते. आणीबाणी जारी केल्यावर लगेचच रातोरात विरोधकांना प्रामुख्याने सरकारच्या विरोधात असलेल्या उजव्या, डाव्या विचारांच्या सर्व नेत्यांना जेलमध्ये घालण्यास सुरुवात केली. अर्थात हीच मोठी चूक इंदिरा गांधींची ठरली. विरोधकांची पुढे जी एकजूट झाली त्याची मुळे ते जेलमध्ये असतानाच रोवली गेली. आणीबाणीच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले. यात डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारसारणीला मानणारे होते. आणीबाणी उठल्यावर निवडणुका जाहीर झाल्या आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचा जन्म झाला. अशा प्रकारे देशात स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी असलेल्या कॉँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याची ऐतिहासीक घटना घडली. यामागचे महत्वाचे कारण होते ते म्हणजे इंदिरा गांधींनी केलेली लोकशाहीची गळचेपी. आपल्याकडे तोपर्यंत लोकशाहीची पाळेमुळे चांगलीच रुजली होती. लोकशाहीचा प्रयोग आपल्याकडे चांगलाच यशस्वी झाला होता. मात्र मतपेटीतून सत्तांतर होण्याची पाळी केंद्रात कधीच आली नव्हती. राज्यात असे पहिले सत्तांतर केरळात कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली झाले होते. परंतु आणीबाणीनंतर केंद्रातील सरकार लोकांनी झिडकारले. सत्ताधारी कॉँग्रेसला व इंदिरा गांधींना तो मोठा धक्का होता. आपण आणीबाणीच्या काळात जे वीस कलमी कार्यक्रम हाती घेतले त्या आधारावर लोकांची मने जिंकून पुन्हा सत्तेत येऊ असा इंदिरा गांधींचा कयास होता. त्यावेळी गुप्तचर खात्याचा अहवालही पुन्हा कॉँग्रेस पक्षच सत्तास्थानी येणार असाच होता. त्याकाळी आतासारखा एक्झिट पोल हा प्रकार नव्हता. मात्र गुप्तचर खात्याच अहवाल हा संपूर्णपणे झूठच ठरला आणि देशात सर्वात प्रथम मतपेटीच्या माध्यमातून सत्तांतर केंद्रात झाले. आपल्या लोकशाही मूल्यांचा तो एक मोठा विजय होता. जर देशातील विरोधकांची, त्यांच्या विचारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच लोकशाहीलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्यास देशातील जनता ते सहन करणार नाही हे या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने दाखवून दिले. कॉँग्रेस व इंदिरा गांधींसाठी तो एक मोठा इशाराच होता. अर्थात अनेकदा इंदिरा गांधीच्या समर्थकांचीही मोठी गोची आणीबाणी व त्यानंतरच्या सत्तांतराने झाली. त्या काळातील कायदामंत्री हरिभाऊ गोखले, बॅरिस्टर रजनी पटेल, कॉंग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुआ व सिध्दार्थ शंकर राय हे गाधींचे समर्थक होते. हरिभाऊ गोखले व रजनी पटेल हे महाराष्ट्रातील होते. गोखले हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले. रजनी पटेल हे मूळचे कम्युनिस्ट. मुंबई प्रदेश कॉंग्रेस समितीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. कॉंग्रेसमध्ये जाऊन त्या पक्षाच्या धोरणाला डावी दिशा देण्याची रणनीती कम्युनिस्टांच्या एका गटानं आखली होती. त्यानुसार मोहन कुमारमंगलम, रजनी पटेल हे नेतेे कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. आसामचे देवकांत बरुआ हे प्रकांड पंडित होते.  त्यांनी इंदिरा इज इंडिया हे विधान केले आणि ते देशाच्या चर्चेत आले. हे नेते अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी विचारसरणी पेक्षा राजकीय डावपेचांना महत्त्व दिलं आणि इंदिरा गांधींचे गुलाम झाल्यासारखे झाले. कालांतराने संजय गांधी यांनी पक्षात वर्चस्व स्थापन केल्यावर या सार्‍यांची अवस्था मोठी बिकट झाली. त्यावेळी त्यांना मात्र आपल्या विचारसारणीशी घात केल्याचा साक्षात्कार झाला. आणीबाणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या परिस्थितीमुळे (महत्वाचे म्हणजे अटकांमुळे) अनेक नेते राजकीय क्षितीजावर आले. यात लालूप्रसाद, नितीशकुमार पासून अडवाणी, वाजपेयी यांचा समावेश होता. आणीबाणीनंतर आजवर गेल्या ४० वर्षात त्यांनी विविध काळात सत्तेचा लोभ घेतला. आजच्या ६५ ते ७० वयोगटातील प्रत्येक विरोधी पक्षाचे नेते आणीबाणीतून घडले आहेत. आणीबाणीत त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. आणीबाणी हा एकूणच एकाधीकारशाहीचा प्रकार होता. गेल्या ४० वर्षात कॉँग्रसेची वा अन्य पक्षांची सरकारे केंद्रात सत्तेत आली. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारही सत्तेत होते. आता तर भाजपाला संपूर्ण बहुमत मिळून हा पक्ष सत्तेत आला. परंतु नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापर्यंत कुणाचीही देशात पुन्हा एकाधीकारशाही करण्याची मजल झाली नाही. आता नरेंद्र मोदी मात्र इंदिरा गांधींच्या एकाधीकारशाहीच्या मार्गावरुन जात आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आणीबाणीला ४० वर्षे पूर्ण होत असताना ही बाब आता प्रामुख्याने जाणवते. आणीबाणी नंतर जनता पार्टी केवळ दीड वर्षात फुटली. नंतर त्याची शकले झाली. दोन वर्षांच्या आता इंदिरा गांधी बहुमताने निवडून आल्या. जनता पार्टी दुहेरी सदस्यांच्या मुद्यावरुन फुटली. तसेच इंदिरा गांधींचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर ज्या कारवाया केल्या त्यातून इंदिरा गांधींना पुन्हा लोकप्रियता कमावता आली. ज्या जनता पार्टीने एकेकाळी इतिहास घडवला तो पक्ष ४० वर्षांनी आज नावालाही अस्तित्वात नाही. सध्याच्या राजकारण्यांना व तरुण पिढीला या इतिहासातून बरेच काही शिकता येईल. आणीबाणी व त्यानंतरचे पर्व हे इतिहासातून कधीच फुसले जाणार नाही, हे मात्र एतिहासिक सत्य आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "चाळीस वर्षांपूर्वी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel